Saturday, January 6, 2024

मातृभूमि ना मुक्त जोवरी -

मातृभूमि ना मुक्त जोवरी तोवरि बंधनि व्यक्ती व्यक्ती!ध्रु.

अंदमानच्या नरकपुरी
रत्नागिरि अब्धिकिनारी
दोन्हि ठिकाणी कोंडतात मनदास्याच्या उंचच भिंती!१

सरे लढाई युद्ध ना सरे
पराक्रमाते बाहु फुरफुरे
तळमळते मन प्राणवायुविन तया न पळभर विश्रांती!२

हाल अपेष्टा खर्ची घालू
आय काय ते जाणू बोलू
सत्यार्थाने मुक्त न झालो देशा जोवरि ना मुक्ती!३

मातृभूमि ही जणु शक्‍ती
जलसिंचन देशी भक्ती
पडेल कधि मग करी आपुल्या स्वातंत्र्याचा तो मोती!४

अशी मुक्तता मोद न देते.
देशदास्य प्रतिपली डाचते
देशबंधु जरि हर्षित झाले मना छळतसे ही खंती!५

देव न मी कुणि भक्त भाबडा
युद्धभूमिचा वीर रांगडा
खरा विजय जोवर ना लाभे तोवर तगमग या चित्ती!६
 
येइल का कधि दिन सोनेरी
श्यामल मेघा कडा रुपेरी
स्वतंत्रतेचे स्वप्न पाहणे तेच फुलविणे दिनराती!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

अंदमान मधून मुक्तता झाल्यावर ६ जानेवारी १९२४ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांना रत्नागिरीत स्थानबद्धतेत ठेवण्यात आले. त्या प्रसंगावर आधारित हे काव्य.

No comments:

Post a Comment