Saturday, January 27, 2024

सोऽहं भजना परमेशा । बैसवी तू।

ॐ नमो जी गणेशा। हृदयस्था दे आदेशा। 
सोऽहं भजना परमेशा । बैसवी तू।१
 
गुरुशिष्याची हे गोठी । बरेच सांगे मजप्रती । 
मार्ग क्रमी रे पुढती पुढती । नेटानें तूं ।२

देहबुद्धि त्वां सोडावी । सन्मति प्रेमें जोडावी । 
सद्‌गुरु कीर्ति त्वां गावी । नित्यनेमे ।३

स्वामी गेले सांगून । आसन सदनी घालून ।
मन पवना दे जोडून । गगनी जा ।४

ऊर्ध्वदृष्टि तोच सुखी । गगनपथी जो विचरे की। 
आपण अपणा अवलोकी । नियमाने ।५ 

द्यावा घ्यावा आनंद । हाच हाच तो परमार्थ । 
निववावा नित जो आर्त । भक्तिच ती।६

जें कळलें ते तूं विवरी। परमार्थाची कास धरी । 
गाता ध्याता नित्य हरी । हरि होई।७

कर्तव्यांतच परमार्थ । ज्ञानी तुज हे कथितात।
संपविशीं जर तूं स्वार्थ । ईश्वर तू।८

'मी माझे' हे, विसरावे । तू तुझे हे उमलावे। 
स्वरूपनाथे बोधावे। भजनांत।९

नवरत्नांचा हा हार । सद्‌गुरुलागी प्रिय फार । 
साधनेस येता धार । धन्यच तू ।१०

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
१५/१०/८१ नंतर रात्री १ ला पूर्ण.

हे गुरुशिष्याची गोठी या स्वामी माधवनाथांच्या पुस्तकावर लिहिलेले हे काव्य.

No comments:

Post a Comment