दे हवा तसा आकार !
मी तुझ्या करातिल माती
दे हवा तसा आकार ! ध्रु.
तू तुडव तुडव चरणांनी
तू थापट दोन करांनी
नच करीन मी तक्रार ! १
ना कसलीही मज चिंता
तू दिधली श्रद्धा ऋजुता
हा थोर थोर उपकार! २
नच हट्ट धरिन कसलाही
कुरकुर ना करिन जराही
तू एकमेव आधार ! ३
सांगते घेउनी आण
तव करीच मम कल्याण
तू निर्माता कुंभार ! ४
हे फिरते चाक कधीचे
मी त्यावर बैसायाचे
ना स्वतंत्र काहि विचार! ५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३०-१०-७८
मातीचा धर्म ! या लेखावर आधारित (पुस्तक हृदयोद्गार - फादर वॅलेस)
No comments:
Post a Comment