मागावे ते ऐसे मागणेच सरो
अंतकाळी मात्र नाम मुखि उरो!ध्रु.
अंतकाळी मात्र नाम मुखि उरो!ध्रु.
तरीच जगावे, अंतकाळ साधे
नामस्मरणाने कलीही न बाधे
प्राणासम नाम अंतरात स्फुरो!१
नाम घेता प्रेम जडतसे नामी
आठवीता राम चित्त रमो रामी
नामप्रेम अंगी सर्वथैव मुरो!२
भक्ति हे साधन मूल ईश्वराचे
राम दृष्टिआड न व्हावा नाम घेइ वाचे
आसक्ति विषयी तीळमात्र नुरो!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २६, (२६ जानेवारी) वर आधारित काव्य.
अंतकाळी नामस्मरण होणे म्हणजेच अंतकाळ साधणे, व हा अंतकाळ साधत असल्यास आणखी जगून काय करायचे? व तो साधत नसल्यास आणखी जगून काय उपयोग? अंतकाळ साधण्यासाठीच जगावे. देवापाशी, "मला तू आपला म्हण, माझे मन तुझ्या चरणी अर्पण केले, आता मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा न होवो" असे मागावे. परमेश्वर आपल्या मागेपुढे आहे असे अखंड मानावे. त्याचे स्मरण करणे म्हणजे, जे काही घडत आहे ते त्याच्याच इच्छेने घडत आहे असे समजणे, प्रपंच देवाचा मानून अभिमानरहितपणे तो करणे हा परमार्थ व परमात्म्यावाचून आपल्यास कोणी नाही याचा दृढनिश्चय होणे याचे नाव ज्ञान. नामाचा सहवास पुष्कळ करावा, म्हणजे विषयाची आसक्ती कमी होऊन नामावर प्रेम जडते. भगवंतास दृष्टीआड होऊ न देणे हीच खरी भक्ति, हेच खरे अनुसंधान, हाच खरा परमार्थ व हेच आपले सर्वस्व आहे.
No comments:
Post a Comment