रूपाआधी नाम, रूपा अंति नाम
नाम आळवीता तोषताहे राम! आत्माराम!ध्रु.
नाम आळवीता तोषताहे राम! आत्माराम!ध्रु.
रूपाचे ते ध्यान राहो वा न राहो
नामाच्या उच्चारे फोडायचा टाहो
म्हणू राम राम! स्मरू रामनाम!१
नामस्मरणाचा अट्टाहास ठेवा
साधकासि नाम अनमोल ठेवा
अरूपासी रूप देत असे नाम!२
रूपास व्यापते, मना शांतवीते
भाव फुलवीते - भाविका भारते
रत्न रामनाम! रत्न रामनाम!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०६.०१.१९७४
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ६ (६ जानेवारी) वर आधारित काव्य.
नाम घेत असता रूपाचे ध्यान आवश्यक आहे का? वास्तविक नाम आणि रूप ही भिन्न नाहीतच. नाम तेचि रूप, रूप तेचि नाम, नाम रूप भिन्न नाही नाही! नाम हे रूपाच्या आधीही आहे व नंतरही उरते. नाम रूपाला व्यापून असते. रूप अस्तित्वात येण्यापूर्वी नाम होते. व रूप गेल्यानंतरही नाम आज शिल्लक आहे. तेव्हा नाम घेणे हे मुख्य आहे. नाम घेत असताना रूपाचे स्मरण सूक्ष्म रूपाने असते. ध्यानी येत नाही म्हणून अडून बसू नये. भगवंताचे रूप तरी निश्चित कुठे आहे? एक राम काळा तर एक राम गोरा असतो. एक राम लहान तर एक मोठा असतो. एक राम उग्र तर एक सौम्य असतो. पण सर्व रूपे एका रामाचीच असतात. भगवंत स्वतः अरूप आहे; म्हणून जे रूप आपण त्याला द्यावे तेच त्याचे असते. यासाठी आपण कोणत्याही रूपामध्ये ध्यान केले तरी चालते.
No comments:
Post a Comment