Tuesday, November 11, 2025

तू असता जवळी रामा, खंत मला कसली?

तू असता जवळी 
रामा, खंत मला कसली?ध्रु.

ज्यासि म्हणावे मी अन् माझे
त्यावरती सत्ता नच गाजे 
खूण अशी पटली!१

तुझिया हाती सत्ता असता
मानवगति किस झाड का पत्ता
मानित तुज माउली!२

उपासनेमधि मजला ठेवी 
बाळ आईच्या पानी जेवी 
अमृत नामावली!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३१५ (१० नोव्हेंबर) वर आधारित काव्य.

Sunday, November 9, 2025

भक्तसखा भगवंत भूवरी पुन्हा पुन्हा आला!

भक्तसखा भगवंत भूवरी पुन्हा पुन्हा आला!ध्रु.

ब्रह्मदेव संकटिं सापड‌ले 
मत्स्यरूप तात्काळ घेतले 
संकटांतली साद पोचते सपदि जगत्पाला!१

धरा बुडतसे जलाभीतरी 
कासव होउनि घे पाठीवरी
बुडणारे जग जगन्नायका देखवे न डोळा!२ 

तत्पर ऐसा जगत् रक्षणी
अवतरला हा वराह म्ह‌णुनी
असा कळवळा, असा जिव्हाळा, कुठे कुणा दिसला?३
  
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
०६.०१.१९७५

खालील श्लोकावर आधारित काव्य.

विधीकारणे जाहला मत्स्य वेगी।
धरी कूर्मरूपें धरा पृष्ठभागीं॥
जना रक्षणाकारणे नीच योनी। 
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥

विधीकारणे म्हणजे ब्रह्मदेवासाठी देवाने मत्स्यावतार घेतला, पृथ्वी समुद्रांत बुडू नये म्हणून कूर्माचा (कासवाचा) अवतार घेतला आणि पृथ्वी आपल्या पाठीवर धरली. लोकांच्या रक्षणासाठी देवाने वराह अवतार घेतला. असा हा देव आपल्या भक्ताची उपेक्षा करीत नाही.

Saturday, November 8, 2025

नाम घेता गोड वाटे, अंतरीच राम भेटे!

नाम घेता गोड वाटे 
अंतरीच राम भेटे!ध्रु. 

रामनामाचा जयघोष 
करित असतो आशुतोष 
नाम घेता कंठ दाटे!१ 

मागणे माझे सरावे 
रामचंद्रा हे वदावे 
मायासरिता सत्वर आटे!२

कीर्तनाचा हेतु भक्ती 
कीर्तनाने रामी प्रीती 
रामरूप झालो वाटे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३१३ (८ नोव्हेंबर) वर आधारित काव्य.

विषयाचा आनंद खरा नसतो, तर खरा आनंद कशात मिळेल हे पहावे. कीर्तन करणे झाल्यास ते मी व देव एवढेच आहोत ही भावना ठेवून करावे, म्हणजे जो आनंद होईल तो खरा आनंद होईल व तो मिळवण्याचा प्रयत्न करावा.
रामरायास काय मागावे? मला तुमच्याजवळ काही मागण्याची इच्छाच होऊ नये, हेच द्या.

Thursday, November 6, 2025

भगवंताची कृपा! पाहिजे भगवंताची कृपा!

भगवंताची कृपा! पाहिजे भगवंताची कृपा!ध्रु.

तारक जगती एकचि राम
भवभयहारक राजाराम
ध्यानी आणुनि रघुपति राघव प्रेमें करूं या जपा!१

वत्स झटतसे जसे गाईला
खात्री पक्की पाजिल मजला
अनन्यतेने तैसे भजुनी नाम मागु या नृपा!२

असो ऊन वा पाऊस वारा
सुखसुम मिळु दे, दुःखनिखारा 
समाधान मिळण्या केव्हाही आपण बसु या तपा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३११ (६ नोव्हेंबर) वर आधारित काव्य.

खरोखर भगवंताच्या कृपेशिवाय बाकी सर्व गोष्टी असून व नसून सारख्याच आहेत. ज्याच्यावर भगवंताची कृपा झाली त्याचे काम पूर्ण झाले. भगवंताची कृपा सर्वांवर अर्थात आपल्यावरही आहेच, कृपा आपल्यावर आहे अशी आपली खात्री झाली की ती प्रगट होते. कृपा म्हणजे भगवंताशी एकरूपताच. मी पिईन तर आईचेच दूध पिईन असे म्हणून वासरू गाईला ढुसण्या मारते आणि गाय त्याला पाजते; त्याचप्रमाणे आपण भगवंताशी अनन्यतेने वागलो आणि त्याचे नामच मागितले तर तो कृपा करतोच करतो. असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय. जो लायक नाही त्याच्यावर कृपा कशी होईल? भगवंताच्या प्रार्थनेचा प्रतिध्वनी त्याच्या कृपारूपाने येतो. भगवंताच्या कृपेनेच त्याचे नाम आपल्या मुखात येते. त्या नामात राहणारा पुरुष खरोखर फार थोर असला पाहिजे. नाम हे अत्यंत देवाजवळचे असल्याने फार सोपे साधन आहे.

Tuesday, November 4, 2025

सांब सदाशिव सांब सदाशिव सांब सदाशिव शांतव रे

सांब सदाशिव सांब सदाशिव सांब सदाशिव शांतव रे
देही दडलेल्या देवाला दीनदयाळा दाखव रे!१

अजुनि का न ये करुणा तुजला काशीनाथा विश्वेशा 
श्वसनक्रिया अडखळे दमत मी हे मदनांतक परमेशा!२

शिव शिव म्हणता मन शिव व्हावे हे शिवशंभो इतके दे
तू रामेश्वर, तू कृष्णेश्वर उद्धरशील असा वर दे!३

हे गंगाधर पापनाशिनी भागीरथीचे जळ पाज
अडलो, पडलो, रडलो, कुढलो आता तरी राखी लाज!४

नंदीवर आरूढ असा तो उमामहेश्वर ये वेगे
सुधारणेला विलंब नाही सुहास्य त्याचे हे सांगे!५

देहदशा तव असो कशी ही न गायचे रे रडगाणे
तनामनाहुन असशि वेगळा आपआप‌णा ओळखणे!६

समंजसपणा शिवा केशवा गणरायाला आवडतो
सहन करावे हसत जगावे अनुग्रहच शिष्या मिळतो!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
सोमवार १२/४/०४ ची पहाट