सांब सदाशिव सांब सदाशिव सांब सदाशिव शांतव रे
देही दडलेल्या देवाला दीनदयाळा दाखव रे!१
देही दडलेल्या देवाला दीनदयाळा दाखव रे!१
अजुनि का न ये करुणा तुजला काशीनाथा विश्वेशा
श्वसनक्रिया अडखळे दमत मी हे मदनांतक परमेशा!२
शिव शिव म्हणता मन शिव व्हावे हे शिवशंभो इतके दे
तू रामेश्वर, तू कृष्णेश्वर उद्धरशील असा वर दे!३
हे गंगाधर पापनाशिनी भागीरथीचे जळ पाज
अडलो, पडलो, रडलो, कुढलो आता तरी राखी लाज!४
नंदीवर आरूढ असा तो उमामहेश्वर ये वेगे
सुधारणेला विलंब नाही सुहास्य त्याचे हे सांगे!५
देहदशा तव असो कशी ही न गायचे रे रडगाणे
तनामनाहुन असशि वेगळा आपआपणा ओळखणे!६
समंजसपणा शिवा केशवा गणरायाला आवडतो
सहन करावे हसत जगावे अनुग्रहच शिष्या मिळतो!७
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
सोमवार १२/४/०४ ची पहाट
No comments:
Post a Comment