Sunday, November 9, 2025

भक्तसखा भगवंत भूवरी पुन्हा पुन्हा आला!

भक्तसखा भगवंत भूवरी पुन्हा पुन्हा आला!ध्रु.

ब्रह्मदेव संकटिं सापड‌ले 
मत्स्यरूप तात्काळ घेतले 
संकटांतली साद पोचते सपदि जगत्पाला!१

धरा बुडतसे जलाभीतरी 
कासव होउनि घे पाठीवरी
बुडणारे जग जगन्नायका देखवे न डोळा!२ 

तत्पर ऐसा जगत् रक्षणी
अवतरला हा वराह म्ह‌णुनी
असा कळवळा, असा जिव्हाळा, कुठे कुणा दिसला?३
  
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
०६.०१.१९७५

खालील श्लोकावर आधारित काव्य.

विधीकारणे जाहला मत्स्य वेगी।
धरी कूर्मरूपें धरा पृष्ठभागीं॥
जना रक्षणाकारणे नीच योनी। 
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥

विधीकारणे म्हणजे ब्रह्मदेवासाठी देवाने मत्स्यावतार घेतला, पृथ्वी समुद्रांत बुडू नये म्हणून कूर्माचा (कासवाचा) अवतार घेतला आणि पृथ्वी आपल्या पाठीवर धरली. लोकांच्या रक्षणासाठी देवाने वराह अवतार घेतला. असा हा देव आपल्या भक्ताची उपेक्षा करीत नाही.

No comments:

Post a Comment