Thursday, November 6, 2025

भगवंताची कृपा! पाहिजे भगवंताची कृपा!

भगवंताची कृपा! पाहिजे भगवंताची कृपा!ध्रु.

तारक जगती एकचि राम
भवभयहारक राजाराम
ध्यानी आणुनि रघुपति राघव प्रेमें करूं या जपा!१

वत्स झटतसे जसे गाईला
खात्री पक्की पाजिल मजला
अनन्यतेने तैसे भजुनी नाम मागु या नृपा!२

असो ऊन वा पाऊस वारा
सुखसुम मिळु दे, दुःखनिखारा 
समाधान मिळण्या केव्हाही आपण बसु या तपा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३११ (६ नोव्हेंबर) वर आधारित काव्य.

खरोखर भगवंताच्या कृपेशिवाय बाकी सर्व गोष्टी असून व नसून सारख्याच आहेत. ज्याच्यावर भगवंताची कृपा झाली त्याचे काम पूर्ण झाले. भगवंताची कृपा सर्वांवर अर्थात आपल्यावरही आहेच, कृपा आपल्यावर आहे अशी आपली खात्री झाली की ती प्रगट होते. कृपा म्हणजे भगवंताशी एकरूपताच. मी पिईन तर आईचेच दूध पिईन असे म्हणून वासरू गाईला ढुसण्या मारते आणि गाय त्याला पाजते; त्याचप्रमाणे आपण भगवंताशी अनन्यतेने वागलो आणि त्याचे नामच मागितले तर तो कृपा करतोच करतो. असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय. जो लायक नाही त्याच्यावर कृपा कशी होईल? भगवंताच्या प्रार्थनेचा प्रतिध्वनी त्याच्या कृपारूपाने येतो. भगवंताच्या कृपेनेच त्याचे नाम आपल्या मुखात येते. त्या नामात राहणारा पुरुष खरोखर फार थोर असला पाहिजे. नाम हे अत्यंत देवाजवळचे असल्याने फार सोपे साधन आहे.

No comments:

Post a Comment