आम्ही ज्ञानार्थी, विद्यार्थी
बालवयातच या शाळेतच
घालू आयुष्याचा पाया!ध्रु.
विकास अमुचा साधायाचा
मार्ग आमुचा परिश्रमाचा
विश्वासे विश्वास वाढतो
चंदनसम झिजु दे काया!१
निर्णय अमुचा आम्ही घेऊ
कर्तव्यास्तव सिद्धच राहू
सावधान हा मंत्र जपावा
वेळ न जवळी दवडाया!२
भावी जीवन विशाल मंदिर
कळस तयाचा गाठे अंबर
निढळाचा या घाम गाळुनी
प्रगतिपथावर पुढे धावु या!३
शाळेहुन ही मोठी शाळा
विशाल जग हे मोठी शाळा
अनुभवातुनी ज्ञान लाभते
हवी कसोटी उतराया!४
विघ्ने आली येऊ देत ती
जीवनवीरा कसली भीती?
अभ्यासाने घडते प्रगती
क्षण क्षण लावू या कार्या!५
योगाभ्यासे आवरते मन
व्यायामाने कणखर हो तन
हीच शिदोरी आयुष्याची
जीवनभर ती पुरवू या!६
प्रयत्न म्हणजे शिक्षण आहे
शिक्षणातुनी विकसन आहे
आळसास त्या जरा न थारा
इतिहासाला घडवू या!७
एक एक गुण जोडत जाणे
हवे हवेसे सकलां होणे
योगेश्वर श्रीकृष्ण सारथी
रथात आरुढ होऊ या!८
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०३.०९.१९८९
No comments:
Post a Comment