Saturday, October 17, 2020

जय माताजी

।। जय माताजी।।

तुझ्या दारी आलो   माते रेणुके
पाखर तू धरी         आम्हांवरी १
सकाळी सकाळी   ओढ लागे जीवा
वळती पावले         येथे येण्या २
जी जी सुखदुःखे     कोंदली मनात
येती ती ओठात      आपोआप ३
अदृश्य तो हात       फिरे पाठीवर
वाढतसे धीर          अधीराचा ४
दुःखे सरतील        सुखे भेटतील
विश्वास मनाचा      बळावतो ५
तुझ्या दर्शनाने       हुरूप वाढतो
उत्साह साठतो      अंतरात ६
माते रेणुके गे         सातही दिवस
आणव पायाशी     आस साधी ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१६.१०.१९९३

।।जय माताजी।।

रेणुके माऊली कृपेची सावली
वत्सासी गाउली तैसी आम्हां १
आले नवरात्र जागवले तूच
तूच सुचविले लिही काही २
काय चुका झाल्या मनाशी विचार
सुधार आचार येथुनी तू ३
उतावीळ मन तेणे अविचार
नामे सुविचार सुचतील ४
सारेच आपले दुजे कोण येथे?
मीच येथे तेथे पाहा मला ५
कन्या पत्नी सून माझीच ती रूपे
भेद नच खपे अणुमात्र ६
दुरावा संपव उचल पाऊल
मीहि दे चाहूल ऐक बाळा ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
१७.१०.१९९३

।।जय माताजी।।

रेणुके रेणुके दयाळे अंबिके
बाहतो कौतुके येई वेगे १
पूस पदराने कोमेजले मुख
देई प्रेमसुख माय माझे २
नाते न आताचे कितीक जन्माचे
म्हणोनिया वाचे स्फुरे नाम ३
लाविलास लळा गाता झाला गळा
बहरला मळा भक्तीचा हा ४
सारा परिवार तुझिया छायेत
नेमाने तो येत नकळत ५
तिमिर घालव प्रकाश आणव
आम्हा गोडी लाव अध्यात्माची ६
ताई भाऊ आम्ही तुझिया पायाशी
सिद्ध श्रवणासी करी बोध ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१८.१०.१९९३

।।जय माताजी।।

आई रेणुके गे शरण मी तुला
कवितेच्या फुला गंध हवा १
वासना नसावी भावना असावी
साधना घडावी नित्यनेमे २
अंतरी निर्मळ दृष्टीने प्रेमळ
वाणीने रसाळ करी भक्ता ३
सौभाग्याचे लेणे हळद नि कुंकू
अशिवाला जिंकू शक्ति देई ४
सुहास्य वदन राजीव लोचन
अतीव मोहक रूप तुझे ५
तूच ज्ञानेश्वरी तुकोबांचा गाथा
नाथ भागवत त्यातही तू ६
पहात राहावे बोलणे सरावे
मनाने रिघावे स्वरूपात ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१८.१०.१९९३

।।जय माताजी।।

रेणुके माऊली तुझ्या उत्‍सवात
आनंद मनात मावेनासा १
शशिसूर्यप्रभा उजळवी नभा
चैतन्‍याचा गाभा परि तूच २
आई सुहासिनी तूच सुभाषिणी
राग नि रागिणी संगीतात ३
पक्ष्‍यांचे कूजन भृंगांचे गुंजन
वाऱ्याचे विंझण स्‍तोत्र तुझे ४
योगियांचे ध्‍यान मुनींचे चिंतन
भक्‍तांचे वंदन तुजलागी ५
कैसे गे भारिले वेड गे लाविले
तूच लिहविले येथवर ६
ललितापंचमी रंगाची पंचमी
आश्विनात आली जणु आज ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१९.१०.१९९३

।।जय माताजी।। 

रेणुका आई गे अशी तू दूर का
अंतर दुस्तर भेटीआड १
कधी तो पाऊस वाटेत ती ओल
पावले ती खोल रुतताती २
तुझे हे देऊळ वाटते बोलवी 
प्रेमाने खुणावी बाळांनो या ३
देहाचा चिखल पाण्याने जाईल
मनाच्या शुद्धीला तुझे नाम ४
रेणुके तुकाई माझे तू विठाई 
कृष्णाई ज्ञानाई अंतरी ये ५
हाच धावा माझा हात दे सावर 
माया तू आवर माय माझे ६
अहंता जाऊ दे दृष्टीला दिसू दे 
हिताचे होऊ दे विनवणी ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२१.१०.१९९३

।।जय माताजी।।

तुला आठविता रेणुका माऊली
काया थरारली आनंदाने १
तुझ्या स्‍मरणाने सार्थक जन्‍माचे
फळ पूजनाचे भक्तिभाव २
जेथे तेथे आई जेव्‍हा तेव्‍हा आई
जैसी तैसी आई दिसशी तू ३
देह ही घागर घालुनी फुंकर
सोऽहं चा सुस्‍वर ऐकव गे ४
फुगडी खेळावी जिवाने शिवाशी
सर्वसुखराशी प्राप्‍त झाल्‍या ५
तुझे हे मंदिर सर्वांना माहेर
भक्‍तीचा आहेर माहेराचा ६
जो तो प्रेमे वागो ऐक्‍यभाव जागो
दुजे काय मागो तुझ्यापाशी? ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२२.१०.१९९३



No comments:

Post a Comment