"कृष्ण, गोविंद गोविंद" गाई मना!
"कृष्ण, गोपाल गोपाल" ध्याई मना !ध्रु.
श्वास साथी तुझा सख्य त्याशी करी
श्याम कैसी तनी वाजवी बासरी
आणवी तू मनी लाडक्या मोहना!१
काय दुःखात तू? पूस रे आसवे
हास थोडा तरी कृष्ण बोले सवे
वेद झाल्या पहा पूर्विच्या वेदना !२
गाई राखे कसा, देह राखी तसा
धार काढे कसा, बोध घेई तसा
संयमी तो सुखी आवडे सज्जना !३
काम हा कालिया क्रोध हा कालिया
मत्सरू कालिया दंभ ही कालिया
ठेच त्याची फणा देवकीनंदना !४
कंस मामा जरी क्रूरकर्माच तो
आप्त झाला जरी वध्य आहेच तो
तूच निर्धार दे चेतवी चेतना !५
कर्म जे कोठले 'यज्ञ' म्हणुनी करी
श्रेय त्या अर्पिता तोषतो श्रीहरी
यज्ञचक्रास तो देतसे चालना !६
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
९.८.१९८९
कृष्ण गोविंद गोविंद (ऑडिओ)
No comments:
Post a Comment