Wednesday, October 7, 2020

भूपाळी श्री गुरुदत्तांची

श्रीगुरुदत्ता मला प्रभाती आपण जागविले 
दत्त दत्त जप आतुन चाले आपण ऐकविले!

औदुंबर वृक्षाच्या खाली जाउन बैसावे
मिटता डोळे दत्त दिगंबर पुढती ठाकावे 
माझ्या माथी हात आपला हे मज जाणवले! 

भस्म लाविले माझ्या भाळी कृपा आगळी ही 
नित्य नवा दिन मला दिवाळी कृपा वेगळी ही 
परमार्थाचे सौख्य लुटावे कसे मला कळले! 

सत्य शिवाच्या सुंदरतेच्या मार्गावर चाल 
त्रिगुणातीतच  तुला व्हायचे उजळ भावि काल 
वैराग्यासम कुणी न साथी मजला बोधविले!
 
प्रासादाहुन पर्णकुटी ही किती तरी छान 
दूर जनांहुन वनात कर रे ध्यानामृतपान
तुझ्यात मी अन् मदंतरी तू वच कानी आले!

दानासाठी हात आपला चिंतनास हे मन
नामासाठी रसना आहे कर्मा कर दोन
सावध संचारास लाभली दोन्ही ही पाउले!

साधेपण जे तनामनाचे त्यातच आनंद
नको अमीरी बरी फकीरी तो परमानंद
जगदाधारा उपदेशाने पावन मन केले!

गुरुचरिताची गोडी ऐसी साधकास गीता
जीवनयात्रा सोपी होते सरताती चिंता
वत्सा मी पाठीशी आहे अभयदान दिधले!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२९.११.१९८९

No comments:

Post a Comment