Monday, October 5, 2020

सांब सदाशिव तुजला वंदन

सांब सदाशिव तुजला वंदन
स्मशानवासी पापहरा
सोऽहं सोऽहं डमरू वाजे, अज्ञानाचा कर निचरा ! ध्रु. 

वामांगी पार्वती बैसली
तत्त्वचिंतनी पुरती रमली
आदिनाथ हे, आदिगुरुच तू योगिराज हे महेश्वरा !१

शिव शिव म्हणता शांत वाटते 
निवांत निश्चल काया होते
अभ्यासा साधका बसविशी, शिक्षक प्रेमळ कुशल खरा !२

जटेतुनी तर गंगा उसळे
त्रिविधताप हे विलया गेले
क्रोधनाग तुज वश झालेला, रुळतो कंठी उमाहरा !३

कुठली थंडी ऊनहि कसले
मुसळधार जरि मेघ बरसले
हिमाचलासम तूही अविचल,  वंदनीय म्हणुनी रुद्रा !४

भस्म तुझे लावताच भाळी
काम न शिवतो कधी अवेळी
चंद्रकोर जी विलसे भाळी, प्रसन्न करिते वसुंधरा !५

संहारातुन नवी निर्मिती
इकडे मृत्यू तिथे निर्मिती
चिरंतना हे, निरंजना हे, प्रणाम घे रे उमाहरा !६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१४.०८.१९८९

No comments:

Post a Comment