आईवेड्या लेकराची हाक वाया चालली
हुंदके अन् आसवांची घेउनी श्रद्धांजली!
आई निघाली! आई चालली! ध्रु.
आई निघाली! आई चालली! ध्रु.
पोरका शिवाजी झाला
छत्रहीन राजा झाला
सांत्वनास शब्द न सुचती कुणा अशा काली! १
प्रेमास किनारे नव्हते
ते होते अद्भुत नाते
पक्व पान अलगद गळले दिशा ओस झाली! २
मृत्युपुढे हतबल सगळे
इथे कुणाचे ना चाले
कर्तव्यपूर्ति साधुनिया माय चालली! ३
अखेरचे दर्शन घेता
उमाळा न ये आडविता
दयासिंधु ऐसी आई निर्विकार झाली! ४
सोहळा सुखाचा सरला
दु:खपूर धावत आला
दु:खसागरी शिव बुडला, मातृशोक भाली! ५
बालपणा सरला सरला
राजधर्म केवळ उरला
पोरका शिवाजी राजा मूक अश्रु ढाळी! ६
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment