करवुनि घ्यावी सेवा, गुरुदेवा!ध्रु.
अजाण लेकरु मी तर तुमचे
बोल बोबडे वदतो वाचे
कृपादृष्टि तुम्हि ठेवा!१
कथिता तैसे घडो आचरण
तुम्हीच घ्यावे करवुनि पूजन
भ्रांति मनाची मिटवा!२
माझे ‘मीपण’ विलया जावे
ज्ञानकमळ अळुवार फुलावे
गंध आगळा पुरवा!३
कथिले साधन मजसि रुचावे
आलस्ये मज नच स्पर्शावे
तथास्तु बोला देवा!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज प्रवचन १८४ (२ जुलै) वर आधारित काव्य
गुरुसेवा करणे म्हणजे काय?
गुरु सांगेल तसे वागणे हीच त्यांची खरी सेवा होय. माझ्याजवळ येतात ते कोणी मुलगा मागतो, कोणी संपत्ती मागतो, कोणी रोग बरा करा म्हणून मागतो, यावरून माझी सेवा करण्यास तुम्ही येता? का मीच तुमची सेवा करावी म्हणून येता? माझ्याजवळ येऊन मनुष्यदेहाला खरे सार्थक होईल असे करा. गुरुस अनन्य शरण जाणे म्हणजे इतके की त्याचे मन व आपले मन एक झाले पाहिजे. मनाने त्याच्याशी संलग्न असल्यावर आपण त्याच्यापाशीच असतो. तुम्ही जी जी गोष्ट कराल त्यात मला आठवा, म्हणजे यापेक्षा दुसरे साधन नाही.
No comments:
Post a Comment