Friday, December 1, 2023

क्षमाशील असतो धर्म..

ध्यानि धरा इतुके मर्म
क्षमाशील असतो धर्म!ध्रु.

स्वभावेच विकसन पावे
अंतरंग जाणुनि घ्यावे
बाह्यरंग टरफल नुसते, ज्ञानहीन कर्म!१

सामावुनि सकला घेतो
चुचकारुनि पुढती नेतो
क्रोधयुक्त जर तो असता, मानला अधर्म!२

भूति पाहणे भगवंत
दयायत्त त्याचे चित्त
चुकलेल्या जो सावरितो तोच तोच धर्म!३

दुरुनि वंदितो तुम्हासी
एक मागतो देवासी
कळो तरी अंती अपणा न्यायनीतीमर्म!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

(इंद्रायणीकाठी या रविंद्र भटांच्या कादंबरी वर आधारित ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रावर रचलेल्या काव्यामधील एक काव्य)

No comments:

Post a Comment