Friday, December 29, 2023

तुझा आधार असता रामा

तुझा आधार असता रामा, 
भोग सोईने भोगेन!ध्रु.

तूं करविशीं तें तें घडते 
तू देशी- घेणे पडते 
जिथे तुझा मी झालो रामा 
देह प्रारब्धि टाकेन!१

प्रारब्ध न चुकतें कोणा 
मग व्यर्थच देणे वेणा 
देहबुद्धि काढिसी तर रामा
सुखधामासि पोचेन!२

लागुं दे तुझा मज ध्यास
अभ्यास करिन अभ्यास 
हृदयांगणि यावे रामा ऽऽ
अवगुणांसि झाडेन!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचन क्रमांक २९५, २१ ऑक्टोबर वर आधारित काव्य.

माणसालादेखील आलेले भोग भोगावे लागतात. पण भगवंताचा पाठिंबा ज्याला आहे तो मागेपुढे सोयीने भोग भोगू शकतो. 

म्हणून प्रारब्धाने देहभोग आला असता त्यामध्ये मनाची वृत्ती कशी ठेवावी हे स्वातंत्र्य आपल्याला आहे. ते प्रारब्धावर अवलंबून नाही.

जोपर्यंत आपल्या अंत:करणात अवगुण आहेत तोपर्यंत आपली प्रगती होणे फार कठीण आहे. भगवंताचे प्रेम येण्यासाठी आपले अंत:करण दुर्गुणांपासून स्वच्छ केले पाहिजे.

No comments:

Post a Comment