Monday, December 25, 2023

अरे मना का भितोस तू? तुझ्या सारखा समर्थ तू!

अरे मना का भितोस तू? 
तुझ्या सारखा समर्थ तू! ध्रु. 

विघ्ने येतिल 
निघून जातिल 
कशास धरसी तू किंतू ?१ 

भय कोणाचे 
बाळगण्याचे ? 
धीर धरी हो निश्चल तू!२ 

समर्थ मालक 
समर्थ सेवक 
प्रेम होतसे जणु सेतू !३ 

रामा भजले 
पापी तरले 
कंकण करि घे बांधुनि तू !४ 

राघव सन्निध 
सिद्ध सदोदित 
कृपादृष्टि धर ध्यानी तू!५ 

भाव जसा रे 
देव तसा रे 
देशिल त्याहुनि घेशिल तू!६ 

बलोपासना 
ध्यानधारणा 
चालव चालव अविरत तू!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०७.०९.१९७९

(समर्थांचा मनास बोध या वि.गो. आपटे यांच्या पुस्तकाच्या आधारे लिहिलेलं हे काव्य)

No comments:

Post a Comment