Saturday, December 16, 2023

मोगऱ्याचा वेलू नभावरि गेला !

तुझा जन्म ज्ञाना सुफलित झाला!
मोगऱ्याचा वेलू नभावरि गेला ! ध्रु.

खेद मज वाटे तुझ्या विरहाचा 
सखा गमावला जिवाचा भावाचा
मुखी हरिनाम परी अंतरात कळा ! १

ज्ञानमार्ग ज्ञाना तुवा दाविलासी 
समाधीची वाट स्वये चाललासी
करूनि दाखवीला भोगांचा सोहळा ! २

आवतण दिले तुवा पांडुरंगा
इंद्रायणी आता ठरे चंद्रभागा
काय म्यां बोलावे गळा दाटलेला ! ३

सुखात वेदना वेदनेत सुख
कसे आकळले तुला आपसूक 
तुझ्या सुखासाठी घोट दुःखाचा गिळला!४ 

म्हण नाम्या वेडा, म्हण तू भाबडा
माझ्या अंगणात प्राजक्ताचा सडा
आत्माराम माझा धाय मोकलला ! ५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment