भगवंताचे नाम स्मरता विकल्प जरि उठले -
भिऊ नये साधके कार्य सुरु नामाचे जाहले!ध्रु.
भिऊ नये साधके कार्य सुरु नामाचे जाहले!ध्रु.
धास्ती घेउन विकल्प चळवळ करताती बापडे
नामापुढती काहि न चालुनि गाडे त्यांचे अडे
प्रभुनामाच्या नौकेतुनि नर भवसागर तरले!१
सुचिन्ह समजा, नका गांगरू, नाम जपा हो जपा
दिवाभिते तर घाबरताती सूर्याच्या आतपा
विकल्प उच्चाटना प्रखरतर साधन सापडले!२
विकल्प वेधिति लक्ष तरीही नामा नच सोडणे
नामचि शंका निरशिल सगळ्या हे ध्यानी घेणे
सत्संकल्पा प्रवेश मिळता ध्येय प्राप्त झाले!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक ९ वर आधारित काव्य (९ जानेवारी).
मनुष्य नाम घेऊ लागला की विकल्पांना असह्य होते, आणि आता हा नाम घेऊ लागला, आता आपली धडगत नाही, अशा धास्तीने त्यांची चळवळ चालू होते, आणि मनुष्याला नामापासून परावृत्त करण्याचा ते प्रयत्न करतात. विकल्प हे अती सूक्ष्म आहेत. त्यांचे उच्चाटन करायला त्यांच्यापर्यंत पोहोचणारा आणि तितकाच सूक्ष्म असा उपाय पाहिजे. तो उपाय म्हणजे भगवंताचे नाम.
नाम घेऊ लागल्यावर विकल्प येऊ लागले तर गांगरून न जाता, हे सुचिन्ह आहे असे समजून, विकल्पांच्या उच्चाटनाची गुरुकिल्ली मिळाली अशा जाणिवेने, जास्त आस्थेने नाम घेण्याचा निश्चय करावा.विकल्प जाऊन भगवंताचे संकल्प उठू लागले की आपले काम झाले. आपण रस्त्याने चाललो की नको ती माणसे भेटायचीच; पण आपण आपले चालणे चालू ठेवावे. तसे, विकल्प आले तरी आपण आपले नाम सोडू नये.
No comments:
Post a Comment