युद्ध का केले पाहिजे? हा विचार अर्जुनाच्या मनात पुरता बिंबला नव्हता. अर्थात् त्याचे शंकानिरसन होई पर्यंत तो युद्ध करणार नव्हता.
देहाच्या अन्य अवस्थांप्रमाणे मरण हीही एक स्वाभाविक अवस्था आहे हे भगवंतांनी सांगितलेच होते.
दु:ख काय किंवा सुख काय – त्यांच्या शोक आणि हर्ष या परिणामांना शहाणा माणूस आवर घालत असतो.
अर्जुनाला भगवंतांनी आत्मज्ञान करून दिले आणि त्याच्या जोडीलाच जगावे कसे किंबहुना मरावे कसे याचा बीजमंत्र सांगितला.
त्यांनी सांगितलेला कर्मयोग हा तुलनात्मकदृष्ट्या आचरण्याला सोपा – कल्याणाचा मार्ग समजावून सांगताना भगवंतांची रसवंती फुलून आली. जणु अर्जुनाच्या मस्तकी पारिजातकाच्या फुलांची वृष्टीच झाली.
***********
जीवनवीरा, हो युद्धोन्मुख, वृथाच का थबकला?
पार्था, जाणुन घे ही कला! ध्रु.
सुखदु:खांच्या झंजावाती
स्थिरचित्ताची निश्चल पणती
प्रकाश वितरत – धनंजया मग, उचल उचल पाउला! १
अल्प कृति नच जाते वाया
परमार्थाचा ती तर पाया
निश्चित बुद्धी हितैषिणी ती अनुसरतो तिज भला! २
कर्म आचरुन, फल न विचारी
अनासक्त हो, हो अविकारी
ऐसी समता येता चित्ती कोलाहल शमला! ३
कर्माहुनि ही प्रधान बुद्धी
तिच्याच ठायी आश्रय शोधी
हेतु फलाचे अतीव दुर्बल घातक मनुजाला! ४
पाप असो वा असो पुण्यही
स्थितप्रज्ञ नित अलिप्त राही
योग साधण्या व्हावे उत्सुक – ती तर जीवनकला! ५
पाऱ्यासम तव बुद्धि चंचला
समता मिळता होइल अचला
तटतट तुटतिल कर्मबंधने – चल उठ समराला! ६
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गीत गीता)