Sunday, November 20, 2022

जीवनात या आहे राम अंतरातुनी बोले श्‍याम!


जीवनात या आहे राम 
अंतरातुनी बोले श्‍याम!ध्रु. 

भला जन्‍म हा तुला लाभला 
जीवनहेतु कळेल तुजला 
रामनाम घे कर रे काम! १

जो रडका रे तो अपशकुनी
भार भुईला कर्म न करुनी 
घाम गाळता प्रसन्न श्‍याम!२ 

सत्‍यमार्ग श्रीरामे वरिला 
कर्मयोग श्रीकृष्‍णे कथिला 
तो अनुसरिता मन सुखधाम!३ 

हिंमत धरता विघ्‍ने पळती 
चिंतन करता कोडी सुटती 
आदर्शच ते राम नि श्‍याम!४ 

विजयपताका श्रीरामाची 
गीतामुरली श्रीकृष्‍णाची 
पहा, ऐक दे दे अवधान!५ 

करि परिशीलन उजळे जीवन 
उजळे जीवन विरता मीपण 
आनंदाचे स्‍वरूप राम!६ 

कसली चिंता तुजला जाळी 
आठ्यांचे का जाळे भाळी 
हसत जगावे शिकवी श्‍याम!७ 

या देहातच देव नांदतो 
स्‍फूर्ती देतो कार्य करवितो 
सूत्रधार तो सांगे राम!८ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०८.०७.१९८९

No comments:

Post a Comment