Wednesday, November 23, 2022

देव हवा मज वाटतसे

देव हवा मज, देव हवा मज, देव हवा मज वाटतसे 
प्रेम करावे, प्रेम करावे, प्रेम करावे वाटतसे! ध्रु.  

देवाशी संवाद करावा, देवच माझा प्राणविसावा 
देव पहावा, देवच ध्‍यावा देव भुलतसे भक्तिभावा 
देवाशी सहवास घडावा स्‍वप्‍न मनी मी रेखितसे! १  

सरळपणाच्‍या व्‍यवहाराने मनास काही ना खुपते 
देव दयाघन करतो पावन आतुन कोणी हे वदते 
संकटकाळी देव धाव घे सदा सर्वदा जाणतसे! २  

प्रेमभाव जर नित्‍य ठेवला कुणास पडते कुठे कमी 
देणारा तो देतच राहे देव सर्वदा देत हमी 
उपेक्षा न देवाची व्‍हावी लीन अपेक्षा हीच असे! ३ 

नामच आहे अमोघ साधन भगवंताला स्‍मरावया 
अशी प्रार्थना शिकवी प्रेमा सर्वाभूती करावया 
दयापूर तो देतो लोटुन जाणताच हे जाणतसे! ४ 

स्‍मरणे निघते अंतर उजळुन अवघड ते सोपे होते 
हृदयमंदिरी त्‍याची स्‍वारी रहावयाला ती येते 
अपूर्व अनुभव अनुपम अनुभव साधकास नित येत असे! ५
  
रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
१७.१०.१९८९
(ब्रदर लॉरेन्स यांच्या जीवनावर आधारित हे काव्य)

No comments:

Post a Comment