सोडुनिया गणगोत मागुती
ज्ञानदेव चालले, चालले! ध्रु.
ज्ञानदेव चालले, चालले! ध्रु.
आज्ञा द्यावी गुरुमाउली
आळी माझी तुम्ही पुरवली
गुरुकृपेने मीपण सगळे
क्षणी स्वरूपी मिनले मिनले! १
वोसंडुनिया निवृत्तीने
उरी लावले बाळ देखणे
स्फुंदस्फुंदला विरक्तयोगी
उफाळुनी कढ वरती आले! २
पांडुरंग सामोरा आला
कर धरुनि प्रेमे चालवला
पायाजवळी घ्या हो देवा
अपूर्व सुख भोगले भोगले! ३
बसे आसनी योगीराजा
पावनता ये विकसित तेजा
विशाल लोचन मिटुनी घेता
एक अनामिक गंध दरवळे! ४
तोची कैवल्याचा पुतळा
ज्ञान मूर्त तो परम जिव्हाळा
आता ऐसे होणे नाही
परब्रह्म ते निघून गेले! ५
विश्व सकल पोरके जहाले!
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(श्री संत ज्ञानेश्वर कथाकाव्य)
No comments:
Post a Comment