ब्रह्मानंदी जणु लागे लय
सागर नाचत था थय था थय ! ध्रु.
बुलंद किल्ला येथ असावा
धाक रिपूच्या मनी वसावा
सीमेवरच्या प्रजाजनांचा संसारहि राहू दे निर्भय! १
स्वराज्य दुबळे नव्हे नव्हे हे
वीरश्रीयुत वर्तन राहे
शिवपदस्पर्शे कणकण द्वीपी जणू जाहला शिवमय शिवमय! २
वाजंत्री वाजती, वेदघोष चालला
श्यामल पाषाणा पातली आज सुवर्णी कळा
स्वर वाद्यांचा स्वर वेदांचा घुमू लागला जय स्वराज्य जय! ३
सूरत लुटली सोने मिळले
प्रजारक्षणा कामी आले
समाजसेवक शिवरायांचे जीवन अवघे होते यज्ञमय! ४
सिंधुदुर्ग या नावापोटी
स्वप्ने दडली कोटी कोटी
सागर शिवमय, शिव सागरमय लाटा गाती था थय था थय! ५
जलदेवींनो शिव हा झुकला
राज्य हिंदवी हे सांभाळा
गोब्राह्मणप्रतिपालनकार्यी शिवनृपाचा लागतसे लय! ६
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment