Sunday, May 18, 2025

ध्यानि घ्यावे हे नराने वृत्ति कोठे गुंतते!

ध्यानि घ्यावे हे नराने
वृत्ति कोठे गुंतते!ध्रु.

ती स्थिरावो
शांत होवो
हाचि वर मन मागते!१

वृत्ति बदले
जगहि बदले
अंधता ही बाधते!२

राम स्मरणे
शरण जाणे
गूढ सगळे उकलते!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १३९ (१८ मे) वर आधारित काव्य.

माझा देह परमार्थाच्या आड येतो हे म्हणणे काही खरे नाही. मी सुखी कशाने होईन? हे आपण आपल्या कल्पनेनेच ठरवले, पण या जगात पूर्ण सुख व पूर्ण दुःख असं काही आहे का? जे खरं असेल किंवा खोटं असेल याची आपल्याला खात्री नाही, त्याबाबतीत आपण रिकाम्याच कल्पना करत बसतो. दुसरा मनुष्य ज्यावेळी आपल्याला त्रास देतो, त्यावेळी त्यामध्ये पन्नास टक्के आपली कल्पना असते, आता उरले पन्नास टक्के, त्याबद्दल त्याने दिलेला त्रास मी करून घेणार नाही ही वृत्ती असावी, म्हणजे संपले. आपली वृत्ति सारखी बदलत आहे आणि जगही सारखे बदलत आहे त्यामुळे अमुक परिस्थितीमुळे सुख किंवा अमुक परिस्थितीमुळे दुःख होते हे वाटणे खरे नव्हे, कारण सुखदुःख अस्थिर असते. भजन, पोथीवाचन वगैरे गोष्टी जर वृत्ती सुधारण्यासाठी न केल्या, तर ती नुसती करमणूक होते, त्यापासून खरा फायदा होत नाही. गाडी रोज काशीला जाते पण तिला काही काशीयात्रा घडत नाही, यात्रा घडते ती आत बसलेल्या लोकांना, त्याचप्रमाणे देहाने नुसता पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही, आपली वृत्ति भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे. वृत्ति स्थिर होणे, शांत होणे याचे नाव समाधान आणि भगवंताकडेच वृत्ति सारखी राहणे याचे नाव समाधि होय. भगवंतापासून वेगळे न राहणे, त्याचे विस्मरण न होऊ देणे, त्याच्या स्मरणात राहणे, त्याच्या नामात राहणे यातच खरे समाधान शांति व सुख आहे.

Monday, May 12, 2025

दिसे कसा भगवान? आड जर येताहे अभिमान!

दिसे कसा भगवान?
आड जर येताहे अभिमान!ध्रु.

अभिमानाची वाढे हरळी
गढूळले मन, वृत्ती मळली
देहोऽहं ही भ्रांती करिते जिवालागी बेभान!१

प्रभुनामाची कास धरावी
भगवद्भजनी गोडी यावी
सोऽहं सोऽहं अनुभव येण्या गावे प्रभुगुणगान!२

कोणाविषयी द्वेष नसावा
सर्वांभूती राम दिसावा -
भगवंताचा विसर न व्हावा तारक भाव महान!३

रचयिता  : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १३३ (१२ मे) वर आधारित काव्य

वाचेने कोणाचे मन दुखवू नये, व देहाने परपीडा करू नये. दुसऱ्याचे दोष सांगणे हे हीनपणाचे लक्षण आहे. नेहमी सत्य व गोड बोलावे आणि खाण्याच्या बाबतीत जीभ आपल्या ताब्यात ठेवावी. अभिमानाचे विष जेथे येते तेथे नामाची आठवण ठेवावी. मी रामाचा आहे असा अभिमान धरावा. नामाची कास धरावी. कोणाविषयीही वाईट विचार मनात आणू नये, त्यापासून आपलेच मन गढूळ होते. तुमचा विसर मला पडू देऊ नका, असे परमेश्वराला अनन्यतेने म्हणावे. तो तुमच्या सहाय्यास आल्यावाचून राहणार नाही.

Sunday, May 11, 2025

थोडे वाचावे परी ते कृतीत आणावे!

थोडे वाचावे परी ते कृतीत आणावे!ध्रु.

नको वदाया केवळ उक्ती 
कृती घडविते जगती प्रगती 
वेदांताचे मर्म आचरणि सहजपणे यावे!१

स्वतःस शिकवा जग सुधारले 
दुर्गुण विसरा जग सुखावले
कृतीविना जे बोल बुडबुडे जलात समजावे!२

कर्म घडू दे नको फलाशा 
सेवा करता सुटु दे आशा
कर्मफुलांनी पूजन करूनी धन्य धन्य व्हावे! 

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १३२ (११ मे) वर आधारित काव्य.

थोडेच वाचून समजून घ्यावे व ते कृतीत आणावे, नाही तर जन्मभर ज्ञान संपादनात वेळ जातो आणि कृती न झाल्याकारणाने पदरात काहीच पडत नाही. म्हणून नुसते वाचितच बसू नये. थोडेच वाचावे पण कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. नुसत्या वाचनाने किंवा विषय समजावून घेण्याने प्रगती होत नसून ते कृतीत आणण्याने प्रगती होते. आपले आकुंचित मन विशाल करणे, आपण स्वार्थी आहोत ते निस्वार्थी बनणे हेच खऱ्या वेदांताचे मर्म आहे.  जग सुधारायच्या नादी लागू नका; स्वतःला सुधारा की त्यामानाने जग सुधारेलच. वस्तु ही सुखाचे साधन असून आपण भ्रमाने तिलाच सुख-रूप मानतो. कर्मास सुरुवात करताना, फळ मिळते किंवा नाही म्हणून काळजी आणि दुःख होते; कर्म करीत असताना फळाकडे चित्त लागल्याने कर्माचे कष्ट होतात म्हणून दुःख होते. कर्म करीत असतानाच मनाला समाधान प्राप्त होते. म्हणून परमार्थामध्ये रोकडा व्यवहार आहे उधारीचा नाही असे सर्व संतांचे सांगणे आहे.

Saturday, May 10, 2025

देह रामाचा, मन रामाचे आठी प्रहरी वद वद वाचे!

देह रामाचा, मन रामाचे
आठी प्रहरी वद वद वाचे!ध्रु.

भगवंताची उपासना
दूर करिते यातना
येता जाता उठता बसता -
नाम घ्यावे राघवाचे!१

शीण आला जरि तना
जोर करिती वासना
वादळा शमवावयासी -
ध्यान करणे राघवाचे!२

होणारे ते चुकत नाही
तदिच्छेने घडत राही
भक्ति याविण वेगळी ना -
चरण स्मरणे राघवाचे!३

राम देता राम घेता
राम आहे भोवता 
त्याविना जगती न कोणी -
होउनी निःशंक नाचे!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १३१ (१० मे) वर आधारित काव्य.

Thursday, May 8, 2025

जे जे घडते ते समजावे, इच्छा भगवंताची!

जे जे घडते ते समजावे, इच्छा भगवंताची!ध्रु.

रामाचे नित स्मरण असावे
देहांतरि मन नच गुंतावे
विषयांचे भय सरेल घडता कृपा रामचंद्राची!१

जिथे जिथे वावरते वृत्ती
तिथे तिथे देवाची वस्ती
शरण गेलिया श्रीरघुनाथा वार्ता नुरे भ्रमाची!२

रामाविण सुख कशात नाही
अनुभव कथिती असे प्रत्यही
मन गुंताया राघवचरणी धार धरा नामाची!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १२९ (८ मे) वर आधारित काव्य.

शरीर जीर्ण झाल्यावर त्याला काही ना काही तरी होतच राहते. दुरुस्त केलेल्या जोड्यातील एखादा खिळा जर पायाला टोचू लागला तर मात्र त्याला जपावे तसे, आजारामुळे मनाला टोचणी लागली तर जपावे व त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये. ज्या ज्या गोष्टी होत असतात त्या त्या भगवंताच्या इच्छेनेच होत आहेत ही जाणीव ठेवून वृत्ति आवरण्याचा प्रयत्न करावा. परमार्थाच्या आड आपले आपणच येत असतो. आपण नेहमी आपल्या उपास्य देवतेचे स्मरण करीत असावे. हे भगवंता, तुझ्या आड येणारे हे विषय तुझ्या कृपेशिवाय नाही दूर होणार. आजवर जगाचा मी अनुभव पाहून घेतला, तुझ्या प्राप्ती शिवाय कशातही सुख नाही असे भासू लागले तरी वृत्ति आड आल्याशिवाय राहात नाही. हे भगवंता, माझे मन तुझ्या चरणी राहो असे कर.

Wednesday, May 7, 2025

देव आणि भक्त यात आड येत मान

काय ऐसे जवळी, ज्याचा अभिमान?
देव आणि भक्त यात आड येत मान!ध्रु.

देहबुद्धि नाचवीते 
देहबुद्धि भ्रमवीते 
देह नव्हे आपण याचे उरे कुठे भान?१

म्हणो जग भला, भला 
म्हणो दे वा वेडा खुळा 
देवाचरणी वहावा मान - अपमान!२

देव कर्ता करविता 
देव एकच चालवीता 
गुरुकृपा देते शिष्या विवेकाचे दान!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १२८ (७ मे) वर आधारित काव्य.

मानाला कारण अभिमान होय. हा अभिमानच भगवंताच्या व आपल्यामध्ये आड येतो. खरे पाहता अभिमान बाळगण्यास आपल्याजवळ असे आहे तरी काय शक्ती? की पैसा? की कीर्ती? जगात आपल्यापेक्षा कितीतरी लोक मोठे आहेत.   हा अभिमान ही काय चीज आहे याचा शोध आपण घ्यायला पाहिजे. याला अगदी मूळ कारण देहबुद्धि ही देहबुद्धि नाहीशी झाली पाहिजे. चांगले, वाईट मान अपमान सर्व देवाला अर्पण करावा. ही देहबुद्धि, हा अभिमान जायला सद्गुरुचे होऊन राहावे. निदान बळजबरीने तरी, मी त्यांचा आहे असे म्हणावे. सद्गुरु तुम्हाला नकळत तुमचा अभिमान दूर करतील. ज्याचे मन नेहमी भगवंतापाशी आहे, अशांचे ऐकण्यात विशेष आहे. सगुणोपासना आपल्या सवयीच्या आड येते म्हणून मनुष्य ती करीत नाही; फारच सोपे म्हणून तो भगवंताचे नाम घेत नाही; आणि फुकट काय जेवायला घालायचे म्हणून तो अन्नदान करीत नाही. असा मनुष्य फुकटच जायचा. देहबुद्धीला ताळ्यावर आणण्यासाठी संतांच्या ग्रंथाच्या वाचनाची गरज आहे. देहबुद्धीच्या अंधारात भगवंताच्या स्मरणाचा किंचित उजेड आहे, हा देहबुद्धीचा अंधकार जाऊन पूर्ण प्रकाश दिसायला भगवंताच्या अनुसंधानासारखा दुसरा कोणता उपाय असणार?

Friday, May 2, 2025

प्राणमोल द्यावे गावे - ॐ राम कृष्ण हरि!

 ॐ

प्राणमोल द्यावे गावे -
ॐ राम कृष्ण हरि! 
ॐ राम कृष्ण हरि!ध्रु.

विकार जे दंगा करती 
पुरी पुरी फजिती करती 
चला करू गुरुचा धावा 
ॐ राम कृष्ण हरि!१

विसंगती जेथे तेथे 
मनी येत भलते सलते 
चित्तशुद्धि होण्या गाऊ 
ॐ राम कृष्ण हरि!२

वस्त्र वासनांचे फिटू दे, 
अहंसर्पिणी ती मरु दे 
ममत्व ते सरण्या गाऊ 
ॐ राम कृष्ण हरि!३

सहा अक्षरी हे नाम 
सफल करी मंगल काम 
प्रेमदीप शिकवी जप हा 
ॐ राम कृष्ण हरि!४

दत्त अंश स्वामी माझे 
विश्वरूप स्वामी माझे 
शिरोधार्य आदेशच हा 
ॐ राम कृष्ण हरि! ५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
१९ जानेवारी १९९४

Thursday, May 1, 2025

नामस्मरणे मन निर्मळ होते

नामस्मरणे, नामस्मरणे मन निर्मळ होते 
गंगाजळ बनते!ध्रु 

तम मावळते 
सत्त्व उगवते 
बुद्धि शुद्ध होते!१ 

स्वार्थ संपतो 
परार्थ सुचतो 
"मी तूपण" सरते!२ 

नाम मला दे 
असे जो वदे 
त्या शुचिता वरिते!३ 

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १२२ (१ मे) वर आधारित काव्य 

दुष्ट बुद्धी हा तमोगुणाचा परिणाम आहे. परंतु भगवंताच्या नामाने बुद्धी स्वच्छ करण्याची सोय मनुष्याच्या ठिकाणी आहे. यासाठी पुष्कळ नामस्मरण करावे म्हणजे सत्वगुणाचा उदय होतो आणि बुद्धी शुद्ध बनते. देहाला कष्ट दिले असता भगवंत वश होतो हे काही खरे नाही. भगवंताचे लक्ष आपल्या देहापेक्षा मनाकडे असते. उपवास घडावा याची मौज आहे, ती उपवास करावा यामध्ये नाही. पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतपासून दूर नेतात पण ज्याचे अनुसंधान मजबूत असते त्याला जगातल्या ऐश्वर्याची किंमत नसते. निष्काम कर्माचे फार फार महत्त्व आहे भगवंतासाठीच भगवंत हवा अशी आपली वृत्ती असावी. प्रत्यक्ष भगवंत समोर उभा ठाकला आणि तुला काय पाहिजे असे त्यांनी विचारले तर, "तुझे नामच मला दे" हे त्याच्याजवळ मागणे याचे नाव निष्कामता होय. जेथे नाम तेथे राम हा ठेवावा विश्वास! कृपा करील रघुनाथ खास..

Sunday, April 27, 2025

समर्था स्वीकारा वंदना!

समर्था स्वीकारा वंदना!ध्रु.
 
विषयासी आधीच जाणले 
सावधपण आचरणी आले 
केले पलायना!१ 

अंतरात या कुठला काम? 
माझा दाता एकच राम! 
ऐकविले वचना!२ 

अंगी अपुल्या खरी विरक्ती 
मनी उमलली कोमल भक्ती
लाजविले चंदना!३ 

प्रपंच जैसा काळा फत्तर 
त्यातुनि परमार्थाचे अत्तर 
काढुनि दिधले जना!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ११८ (२७ एप्रिल) वर आधारित काव्य 

हुन्नरी लोक निरनिराळ्या वस्तूंमधून अत्तरे काढतात. पण मातीतून अत्तर काढणारा म्हणजे प्रपंचामध्ये परमार्थ करायला शिकवणारा कोणी असेल तर ते समर्थच होत. समर्थांनी विषयाला खरे ओळखले म्हणून "सावधान" म्हटल्या बरोबर ते पळून गेले. समर्थांनी प्रपंची लोकांना तुच्छ केले नाही, परंतु प्रपंचात सुख मिळणार नाही हे सांगितल्याशिवाय ते राहिले नाहीत. उपासना चालवत असता जगण्यासाठी म्हणून भिक्षा मागायला हरकत नाही, दुसऱ्या कशासाठी भिक्षा मागणे पाप आहे.  समाजातील ज्या वर्गामध्ये परमार्थाच्या शिकवणीची जरुरी आहे, त्यामध्ये जाऊन त्याला अनुरूप अशी शिकवण देणे हेच प्रत्येक संताचे काम आहे. समर्थांसारखे समतोल वृत्तीचे संत प्रापंचिकांना जास्त उपयोगी असतात.

Thursday, April 24, 2025

संतग्रंथ बहुमोल ठेवा..

संतग्रंथ बहुमोल ठेवा -
प्राणपणाने जतन करावा!ध्रु.

व्यवहारी वेदान्त आणिला
आचरिला मग सहज विवरिला
बोध त्यातला सुमधुर मेवा!१

मृत्युपत्रसम लेखन त्यांचे 
आचारास्तव वाचायाचे
लाभ घडिघडी करुनी घ्यावा!२

तळमळ त्यांच्या अंतरि उत्कट
थापटण्याने थोपटती घट
उद्धरिण्यासी या जड जीवां!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ११४ (२३ एप्रिल) वर आधारित काव्य.

आपल्याला आपल्या परीने जो मोठा वाटतो त्याचे अनुकरण करण्याचा आपण प्रयत्न करतो. जगात नाना प्रकारचे लोक असतात. जगातील सर्व सुख आपल्याकरिताच आहे, कशाचेही आपल्यावर बंधन नको असे एक जण म्हणतो; तर दुसरा म्हणतो शास्त्राप्रमाणे राहावे व आपले हित साधावे;  कुणाचेही नुकसान करू नये. तिसरा म्हणतो लोकांचे नुकसान झाले तरी चालेल आपले हित साधावे; तर चौथा म्हणतो प्रपंच परमार्थाची पायरी आहे, व भगवंत आपला कसा होईल हे पाहावे. एकंदरीत कोणीही माणूस असू द्या मी आनंदात असावे असे प्रत्येकाला वाटते. संतांचे ज्ञान स्वतंत्र असते व ते साक्षात भगवंतापासून आलेले असते. त्यामध्ये अर्थात मागील ग्रंथकारांनी सांगितलेल्या काही गोष्टी येणारच. संतांनी लिहिलेले हे ग्रंथ हे त्यांच्या मृत्युपत्रासारखे आहेत. आपल्यासारख्या जड जीवांचे कल्याण व्हावे ही तळमळ त्यांना होती, म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिले. पोथी, पुराणे, सत्पुरुषांचे ग्रंथ यांचा आपल्या जीवनाशी निकट संबंध असतो. असल्या ग्रंथांमध्ये, ज्याचा व्यवहारामध्ये उपयोग करता येतो असा वेदांत सांगितलेला असतो.

Monday, April 21, 2025

गीतेसंगे जीवन रंगे श्रीकृष्णाची ही मूर्ती!

गीताध्याने गीताभ्यासे आनंदाची हो प्राप्ती 
गीतेसंगे जीवन रंगे श्रीकृष्णाची ही मूर्ती!ध्रु.

घरात गीता, करात गीता मनात नांदे गोविंद 
सुरात गीता, लयीत गीता अभ्यासाचा हा छंद 
गाता गीता कळते गीता विश्रांतीची विश्रांती!१ 

तनु ही येई तैशी जाई शोक कशाला देहाचा
अनादि आत्मा, अनंत आत्मा घोष असे हा गीतेचा 
अशाश्वताचा मोह नसावा, फली नसावी आसक्ती!२

कृष्णच कर्ता कृष्ण करविता राहो द्यावे हे भान 
मनापासुनी कर्मे करता अंतरात प्रकटे ज्ञान
त्या ज्ञाने संतोष मनाला, राहावयाला ये शांती!३

स्वभाव अपुला बदले गीता धनंजयाला पहा पहा
विषाद जाउन प्रसन्नता ये चमत्कार हा पहा पहा
चिंतन करता तत्त्वार्थाचे कळते जगण्याची युक्ती!४

असो कोठला प्रश्न तयाचे उत्तर देते श्रीगीता
पडता रडता कडेवरी घे ऐसी प्रेमळ ही माता
उदात्त उन्नत मंगल जीवन जगण्यासाठी दे स्फूर्ती!५

जगण्या मरण्यासाठी लागे सत् तत्त्वाचा आधार
म्हणून निर्गुण सगुण जाहले निराकार हो साकार
आनंदे श्रीराम वंदितो गीतादेवी सप्तशती!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१३.०१.१९८५

Saturday, April 19, 2025

नामस्मरणाचा उपाय हा साधा!

संत वैद्य घालवीती भवरोगबाधा!
नामस्मरणाचा उपाय हा साधा!ध्रु.

कृपावंत थोर 
सद्गुरु उदार 
स्वये माय होती दीना अनाथा!१

संतसंग देती
नामी ठेवताती
पथ्य सांगताती सुखविण्या आर्ता!२

संत मायबाप
निवारिती ताप
वरदहस्त त्यांचा स्पर्शितसे माथा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ११० (१९ एप्रिल) वर आधारित काव्य.

वैद्याने सांगितलेले औषध व पथ्य एखाद्या मनुष्याने पाळले नाही तर त्यात त्या वैद्याचे काहीच नुकसान होत नसते त्याप्रमाणेच आपणास गुरु सांगत असतो, संत लोक जे आपणास करण्यास सांगतात त्यात त्यांना स्वतःला काही मिळवावयाचे नसते. त्यांचे ऐकल्याने आपलाच फायदा होत असतो. ते आपणास भवरोग झाला आहे असं सांगतात, व त्याकरिता संतसंग करा व नामात राहा म्हणून सांगत असतात. ते जे सांगतात ते स्वतः अनुभव घेऊनच सांगत असतात. संत तुकारामांनी आपल्या उपासनेची शपथ घेऊन सांगितले आहे की नामस्मरणासारखे सोपे साधन नाही. त्यांनी तुमच्या कल्याणाकरताच ते साधन सांगितले आहे; हे तुम्ही न कराल तर त्यात त्यांचे काहीच नुकसान नाही, नुकसान तुमचेच आहे.

Friday, April 18, 2025

संत आपणा हेच सांगती "तू देवाचा!तू देवाचा!

नाम घ्यावे मना वदावे "मी देवाचा! मी देवाचा!
संत आपणा हेच सांगती "तू देवाचा!तू देवाचा!ध्रु.

विषयाचा मी कुणी नसे
भगवंताहुनि भिन्न नसे
विभक्त नाही "त्याच्यापासुनि" घोष चालु दे नित्याचा!१

नाम घ्यावे हे स्मरण्यासी
नाम घ्यावे अभिषेकासी
नामजलाच्या धारा करतिल प्रसन्न आत्मा शंभूचा!२

झुळझुळेल मग अंतरि गंगा
मनातला शिव होइल जागा
हातुनि घडते ते देवाचे विषयच ईश्वर ध्यानाचा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०८ (१७ एप्रिल) वर आधारित काव्य.

नाम घेताना आपण नाम कशाकरिता घेतले, त्याची अखंड जाणीव असावी. ही जाणीव अखंड ठेवणे, मी भगवंताचा आहे हे जाणणे याचे नाव अनुसंधान ठेवणे. संत, तू विषयाचा नाहीस भगवंताचा आहेस, असे सांगतात हीच संतांची खरी कामगिरी, व याकरिता ते नाम घ्यायला सांगतात.  नाम घेणे म्हणजे मी विषयाचा नाही, भगवंताचा आहे असे मनाला सांगणे. रामास पक्के ओळखता आले पाहिजे. याकरिता अंत:करणाची पवित्रता पाहिजे; शुद्ध भाव पाहिजे. सर्व काही साधने केली, पण भाव नसेल तर ती व्यर्थ होतात. कालांतराने त्यामुळे भाव उत्पन्न होईल हे खरे पण भाव ठेवून साधने केली म्हणजे प्राप्ती लवकर होते. वास्तविक जे जे काही तुम्ही करीत आहात ते मीच करीत आहे माझी इच्छा तशी आहे असे मनी दृढ करून वागावे. तुम्ही असे भेदबुद्धीने का वागता? मीच तुमच्या हृदयात असून तुमच्या बुद्धीस प्रेरणा करतो असे का मानत नाही?

Wednesday, April 16, 2025

देहात न असती संत त्या शोधावे वचनांत!

देहात न असती संत
त्या शोधावे वचनांत!ध्रु.

निर्विषयच चित्त तयांचे
ते केवळ रघुनाथाचे
ते जनी बघति एकांत!१

मातेसम करिती माया
माथ्यावर धरिती छाया
निरपेक्ष कर्म ही रीत!२

उपदेशासम वागू या
दृढनिश्चय तो मागू या
हृदयात वसे भगवंत!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०७ (१६ एप्रिल) वर आधारित काव्य.

भगवंताची भेट घ्यायची असल्यास संत जेथे राहतात तेथे आपण जावे. संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून वचनांत आहे. शिष्य केलला खरा पण साधनांत त्याची जर प्रगती होत नसेल तर संतांना वाईट वाटते. संतांना ओळखण्याकरता जे गुण सांगितले आहेत ते त्यांची परीक्षा करण्याकरता सांगितले नसून त्यांचा त्या दृष्टीने उपयोगी होत नाही; त्या गुणांचे आपण आचरण करावे म्हणून ते सांगितलेले आहेत. संतांजवळ राहणाऱ्याने ते सांगतील तसे वागावे. मानाची अपेक्षा करू नये. संतांची आज्ञा प्रमाण मानणे हेच प्रचिती येण्याचे साधन आहे. व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात हे ओळखून आपण त्यांची संगत करावी.

Thursday, April 3, 2025

सर्व ठिकाणी दिसे देव त्या साधु समजावे!

सर्व ठिकाणी दिसे देव त्या साधु समजावे!ध्रु. 

चराचरी भगवंतचि भरला 
ऐसा अनुभव संतत आला 
मातृप्रेमा ज्याच्या हदयी त्याला संत म्हणावे!१

देहधारी परि असे विदेही 
हीण सुवर्णी लवही नाही
चोखट सोने असे वागणे त्याला साधु म्हणावे!२

"चित्त शुद्ध कर" देवा विनवी
सोऽहं बोधी स्वतःस रमवी
लोकांकरिता जगतो मरतो त्यासी- संत म्हणावे!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ९४ (३ एप्रिल) वर आधारित काव्य.

संतांना कसे ओळखावे?
साधु देहात नसतात हे खरे; परंतु म्हणून ज्यास देह आहे तो साधु नाहीच असे होत नाही. जो सर्व ठिकाणी देवास पाहतो तो साधु. आपण जेव्हा दुसऱ्याचे दोष पाहतो,  त्यावेळेस तेच दोष आपल्याजवळ सूक्ष्मरूपाने असतात असे समजावे व आपण लगेच देवास शरण जाऊन "हे माझे दुर्गुण काढून टाक" म्हणून त्याची करुणा भाकावी. म्हणून आपण कोणाचे दोष पाहू नयेत. आपण आपल्या स्वतःस आधी सुधारावे. चित्तशुद्धी केल्याशिवाय आपल्याला सर्व ठिकाणी भगवद्भाव उत्पन्न होणार नाही. आपण परमात्म्याची करुणा भाकून त्यास शरण जावे व माझे चित्त शुद्ध कर अशी त्यास विनंती करावी. वासनेतून वृत्ती, वृत्तीमधून उर्मी आणि उर्मीमधून कृती असा क्रम आहे. माझ्याकरता जगत् नसून मी जगताकरिता आहे ही वृत्ती आपण ठेवावी.

Tuesday, April 1, 2025

साधुसंतांची संगत, करी चित्तास उन्नत!

साधुसंतांची संगत, करी चित्तास उन्नत!ध्रु.

ज्याशी घडते संगत
त्याचे गुण अंगी येत
असू द्यावे नाम मुखी, तेच करील सोबत!१

अन्न ऐसेचि सेवावे
भक्ती अंतरी बळावे
संतसदनीचे अन्न याचसाठी सेवितात!२

संतसंगे लाभ होतो
देव आटोक्यात येतो
मग रामाशी घडते नित्य अंगत पंगत!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ९२ (१ एप्रिल) वर आधारित हे काव्य.

मनुष्याच्या आयुष्यात संगतीला फार महत्त्व असते. संतसंगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे ती पूर्व पुण्याईमुळे लाभते. ज्याच्याशी आपण संगत धरावी त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात हे आपण पाहतो. अन्नाने वासना बनते, म्हणून संतांच्या घरचे अन्न आपण मागून घेऊन खावे. संतांच्या देहाची संगती सगळ्यांनाच लाभते असे नाही. सत्पुरुषांची संगत ही उत्तम होय. सत्संगतीपासून सद्‍वासना आणि सद्विचार ही शिकायची असतात. नामाची संगत हीच सर्वात उत्तम सत्संगत होय.

Sunday, March 30, 2025

धरोनी रामाचा आधार करावा आनंदे संसार!

धरोनी रामाचा आधार
करावा आनंदे संसार!ध्रु.

पत्नी लक्ष्मी, पति नारायण
दोघेही जण धर्मपरायण
देत नित प्रेमाचा उपहार!१

शांति मनाची सांभाळावी
सेवा काही अशी घडावी
वहावा कर्मसुमांचा हार!२

मने राखणे ज्याला जमले
त्या मनुजाला सौख्य लागले
तृप्तिचा परिमळ दरवळणार!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ९० (३० मार्च) वर आधारित काव्य.

भगवंताचा धरावा आधार। सुखाने करावा संसार।

Thursday, March 20, 2025

राम आहे रक्षिता ..

राम आहे रक्षिता, राम आहे रक्षिता!ध्रु.

काळजी कसली नको
भीति चित्ती लव नको
राम नाही तो निजेला, राम आहे मागुता!१

यत्न तो सोडू नये
गर्व शिरि वाहू नये
"मीपणा"सी सोडता, राम आहे रक्षिता!२

मीपणाने दुःख येते
देहबुद्धी त्रास देते
देहबुद्धी भंगिता, राम आहे रक्षिता?३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ८० (२० मार्च) वर आधारित काव्य.

भीति न बाळगावी चित्ती। रक्षण करणार आहे रघुपति।।
न करा काळजीला। राम नाही तो निजला।।
म्हणावा प्रपंच रामाचा झाला।।
जे जे मीपणाने केले। ते ते दुःखाला कारण झाले।।
देहबुद्धी धरून राही। त्याला कोठे सुख नाही।।
जेथे मीपणाचे ठाणे। तेथे दुःखाचे साम्राज्य असणे।।
ज्याला म्हणावे मी माझे। त्यावर सत्ता न माझी गाजे।।
म्हणून माझे मीपण। हेच दुःखाला कारण।
रामाचे होण्याने होईल निवारण ।।

Tuesday, March 18, 2025

सुखासाठी खटपट व्यर्थ व्यर्थ जाते

सुखासाठी खटपट व्यर्थ व्यर्थ जाते
भुलोनिया मृगजळा हरिण धाव घेते!ध्रु.

मुळात प्रपंच खोटा
त्यात सुख शोधू जाता -
कण ही न गवसे हाती, निराशाच होते!१

प्रपंच हा नाही माझा
असे केवळ रामाचा
मनी वागविता भाव, वृत्ति शांत होते!२

ईशकृपा करिते काम
आळविता आत्माराम -
शरण गेलिया रामाते कृतार्थता भेटे!३

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ७८ (१८ मार्च) वर आधारित काव्य.

प्रत्येक जण सुखासाठी खटपट करीत असतो. प्रपंचात सुख मिळावे असे सर्वांस वाटत असते व त्याकरिता जो तो प्रयत्न करीत असतो. परंतु आजपर्यंत प्रपंचात कोणास सुख झाले आहे? आपली लोभाची हाव कधीच तृप्त होणे शक्य नाही. मृगजळ पिऊन कोणी कधी तृप्त झाला आहे का? प्रपंचच जेथे खोटा तेथे सुख कसले मागता? प्रपंच माझा नाही, तो रामाचा आहे, असे म्हणा म्हणजे झाले. हे दिसण्यास सोपे आहे, पण आचरणात आणण्यास अत्यंत कठीण आहे. ते परमात्म्याची कृपा झाल्याशिवाय साधायचे नाही. याकरिता रामाला अनन्य भावाने शरण जावे म्हणजे त्याची कृपा होईल. त्याच्या कृपेला तुम्ही देहबुद्धीचा बंधारा घालू नका. सर्व विसरून भगवंताला आळवावे. सुखाने प्रपंच करा, पण त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवा. खरोखर राम तुम्हांस सुखी करील.

Monday, March 17, 2025

सोड प्रपंचाची चिंता, शरण जाय भगवंता!

सोड प्रपंचाची चिंता, शरण जाय भगवंता!ध्रु.

निजकर्तव्या पाळावे
घडी घडी नाम घ्यावे
उपासना हीच थोर आवडते अच्युता!१

चित्ति असो समाधान
सखा मान नारायण
तोच पाठिराखा भक्ता तोच एक त्राता!२

नामस्मरणी रंगावे
देहभान विसरावे
लेकुराची चिंता वाहे सदोदित माता!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ७७ (१७ मार्च) वर आधारित काव्य.

सत्वगुणात भगवंत असतो, तेव्हा त्या मार्गाने जावे. सर्व कर्मे चांगल्या प्रकारे केली, तरी ती भगवंतार्पण बुद्धीने करावी. जे फळ येईल ते भगवंताच्या इच्छेने आले या भावनेने समाधान मानायला पहिल्यांदा आपण शिकावे. मागील आठवणींनी आणि उद्याच्या भीतीने आपण काळजी करीत बसतो. ही काळजी आपल्याला भगवंतापासून दूर करते. उद्याच्या काळजीने आजची भाकरी आपल्याला गोड लागत नाही याला काय करावे? यावर रामबाण असा एकच उपाय आहे, तो म्हणजे आजपासून आपण काळजी करण्याचे अजिबात सोडून देऊन, तेवढा वेळ भगवंताच्या नामस्मरणात घालविणे.  असले तर असू दे व नसले तर नसू दे, अशा मनाच्या अवस्थेत जो राहील त्यालाच काळजी सुटेल.

Saturday, March 15, 2025

माझी ओळख पटु दे मजला!

"मी देवाचा" कळू दे मजला
माझी ओळख पटु दे मजला!ध्रु.

सत्यावरती पडली छाया
तीच तीच झालीसे माया
ब्रह्म कसे संबोधू तिजला?१

नासे माया, उपजे माया
उपजे तैसी नासे माया
भला भलाही तिने भुलविला!२

उपाधीविना मी भगवंत
भोगत ठायी सौख्य अनंत
केव्हां अनुभव येईल मजला?३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
चाल : गमते सदा (भीमपलास)
 
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ७५ (१५ मार्च) वर आधारित काव्य.

खोट्यावरून खऱ्याची परीक्षा करता येते, तसे माया ज्याला कळली त्याने ब्रह्म जाणले म्हणून समजावे. सत्यावर छाया पडली तीच माया झाली. वस्तू आहे तशी न दिसता विपरीत दिसणे म्हणजे माया. जे विपरीत दिसते ते ब्रह्म कसे म्हणावे? म्हणजे माया ही नासणारी आहे भंगणारी आहे. भगवंतापासून मला जी दूर सारते ती माया. एक भगवंत फक्त सत्यस्वरूप आहे, त्याच्यासाठी जे जे करणे ते ते सत्य होय. "मी देवाचा आहे" हे कळणे, याचे नाव आत्मनिवेदन होय. आत्मनिवेदन म्हणजे देवाला ओळखणेच होय; म्हणजेच मायेला दूर सारणे. वास्तविक उपाधिरहित जो "मी" तोच भगवंत आहे. आपल्या वाट्यास येणारी चांगली अगर वाईट करणे ही ईश्वराचे मनोगत आहे असे समजावे.

Friday, March 14, 2025

आपलेपणा संसाराचा ईश्वराकडे वळवा

आपलेपणा संसाराचा ईश्वराकडे वळवा-
रामा भजने आळवा! ध्रु. 

"मीपण" विसरा, विश्वी पसरा 
कुणी न दुसरा, राम सोयरा!
प्रभु निजकर्मी पहावा!१

स्वार्थ साधता, प्रेम आटते 
लोभ टाकिता, सौख्य लाभते -
त्यागी देव दिसावा!२

भगवंताविण अपुले नडते,  
सहवासा त्या मन धडपडते- 
हृदयी राम वसावा!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ७४ (१४ मार्च) वर आधारित काव्य.

प्रेम हे लहानपणापासून सर्वांना उपजत येत असते. एकदा आपले मानले की आपोआप प्रेम निर्माण होते. परमार्थ हा काही प्रपंचापासून वेगळा नाही. स्वार्थाच्या प्रेमापासून सुख कसे लागेल? प्रपंचात आपण कर्तव्य बुद्धीने वर्तावे. प्रत्येक गोष्ट घडायला योग्य वेळकाळ यायला लागतो, तेव्हा कर्तव्यबुद्धीने वागून काय ते करा, आणि भगवंता हा प्रपंच तुझ्या इच्छेने चालला आहे म्हणा, म्हणजे आपोआप भगवंताचे प्रेम लागेल. प्रपंचातील जे आपलेपण आहे ते भगवंताकडे वळवा. घरातल्या मंडळींवर निस्वार्थ बुद्धीने प्रेम करायला शिका, म्हणजे परमार्थ आपोआप साधेल व आपलेपणा भगवंताकडे वळवल्यामुळे भगवंतावर प्रेम जडेल याकरता काही वेगळे करणे नको. हा आपलेपणा निर्माण होण्यासाठी भगवंतावाचून आपले नडते ही भावना झाली पाहिजे. याकरिता आपण त्याच्या अखंड सहवासात राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याच्या नामस्मरणानेच ही गोष्ट सहज शक्य आहे.

Wednesday, March 12, 2025

आनंदरूप परमात्मा, अनुभव हा घ्यावा घ्यावा!

आनंदरूप परमात्मा, 
अनुभव हा घ्यावा घ्यावा!ध्रु.

रघुनाथ देत विश्रांती 
चित्तासी मिळते शांती 
विषयाचा संग सुटावा!१ 

सत्कर्मे हातुनि घडता 
हळुहळु गळू दे ममता 
याकरिता राम स्मरावा!२ 

कर्मे नच कोणा टळती 
बांधते जनां आसक्ती 
प्रभु कर्ता बोध ठसावा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ७२ (१२ मार्च) वर आधारित काव्य 

परमात्मा हा आनंदरूप आहे. भगवंताकडून येणारी शांति हेच समाधान होय. आपण विषयातून आनंद घेऊ पाहतो आणि तो बाधक होतो. आपण सत्कर्मे करताना पोटात विषयाचे प्रेम ठेवून ती केली तर त्यामुळे विषयच पोसला जाऊन, त्यापासून त्याला समाधान लाभू शकत नाही. कर्म कसे करावे तर त्याच्यातून वेगळे राहून. कर्माशिवाय कोणालाच राहता येत नाही. परंतु ती कर्मे "राम कर्ता" ही भावना विसरून केल्यास बाधक होतात, आणि मरणापर्यंत माणूस पुढील जन्माचीच तयारी करीत राहतो. तेव्हा, देहाने कर्म करतानाही "कर्ता मी नव्हे" हे जाणून कर्म करावे.

Sunday, March 2, 2025

नामी राहुनि स्वयें दुजाते नामा लावावे

नामी राहुनि स्वयें दुजाते नामा लावावे 
रामाचे व्हावें।ध्रु.

राम कर्ता, राम दाता
राम भोक्ता, राम त्राता 
ऐसे जाणावे!१

विषयाचे खत वाढवि मीपण
संकट येते अतीव दारुण
ते तर टाळावे!२

सर्वांभूती नम्र जाहला 
अहंपणा सोडतो तयाला
स्वतःस विसरावे!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ६२ (२ मार्च) वर आधारित काव्य.

खरोखर जगात माझे जर कोणी अनहित करणारा असेल तर तो मीच. विषयाचे खत घालीत गेले की मीपणा वाढत जातो. प्रापंचिकांत व संतांत फरक हाच की, ते कर्तेपण रामाकडे देतात व आम्ही आपल्याकडे घेतो. विषयाच्या लालचीने विषयाला बळी पडून आपले अनहित आपणच करून घेत असतो. खरे सांगतो मी, मनुष्याने जन्मास येऊन एकच करावे आपण नामात राहावे व दुसऱ्याला नामाला लावावे. भगवंताच्या स्मरणात स्वतःला विसरावे. राम कर्ता म्हणावे की सुख, कल्याण, सर्व काही आलेच. त्याच्याकडे सर्व सोपवा व आनंदात राहा, त्यातच खरे हित आहे. आकाशाचे छत्र जसे सर्वांवर आहे, तसे भगवंताचे छत्र सर्वांवर आहे अशी खात्री बाळगा.

Wednesday, February 26, 2025

लाभण्या समाधान चित्ता स्मरावे रामा भगवंता!

लाभण्या समाधान चित्ता 
स्मरावे रामा भगवंता!ध्रु.

स्मरायचे जर असेल देवा
परिस्थितीचा कुठला केवा
उकलण्या देहभावगुंता!१ 

देह जरी हा विकल जाहला
नामस्मरणा आड न आला 
साक्ष ही देते श्रीगीता!२ 

परमार्थामधि द्रव्य अडथळा
स्वर्णमृगा त्या पामर भुलला 
खरोखर श्रीरामच त्राता!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ५७ (२६ फेब्रुवारी) वर आधारित काव्य.

मनुष्याची सर्व धडपड शाश्वत समाधान मिळवण्यासाठी चालू असते. ते समाधान फक्त भगवंताजवळ असल्याने त्या समाधानासाठी प्रत्येक माणसाला भगवंताची गरज आहे.  देहाची अवस्था कोणतीही असली तरी, त्यामध्ये नामस्मरण करता येत नाही हे म्हणणे काही बरोबर नाही. प्रकृतीला कितीही क्षीणत्व आले तरी अंतकाळी भगवंताचे स्मरण करता येते असे भगवंताने गीतेत सांगितले आहे. तेव्हा प्रकृती आड येते असे म्हणणे कितपत संयुक्तिक ठरेल?आपल्याजवळ पैसा नसणे हे भगवंताच्या प्राप्तीच्या आड येते, हे म्हणणे बरोबर नाही. उलट पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो. सुख, समाधान हे पैशावर अवलंबून नाही. भगवंताची स्वारी निघाली की त्याच्याबरोबर दया क्षमा व जिकडे तिकडे आनंदी वृत्ती ही असायची.  त्याप्रमाणे पैसा आला, की त्याच्याबरोबर तळमळ, लोभ, असमाधान, ही यायचीच.

Saturday, February 22, 2025

चिंता करितो विश्वाची!

जय जय रघुवीर समर्थ ॐ

आई गं, चिंता करितो विश्वाची!ध्रु.

चित्तासी या नसे स्वस्थता 
ध्यानी रमलो म्हणुनी आता
जाण मग सरली काळाची..!१

तू सांगितले, मिया ऐकिले 
निश्चल बसुनी डोळे मिटले 
आकृती दिसली तेजाची..!२

खोड्या करणे विसरुनि गेलो
रामरंगि रंगलो, रंगलो
ओढ मज लागत रामाची..!३

प्रभुराया मज मार्ग दाखविल 
सहजच सगळा गुंता उकलिल
आस का पुरी न व्हायाची..?४

विस्फारिसि का ऐसे डोळे? 
नवल कशाचे तुला वाटले? 
लागली गोडी ध्यानाची..!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०७.०२.१९७४

Friday, February 21, 2025

श्रीराम म्हणा श्रीकृष्ण म्हणा

॥ श्रीगजानन प्रसन्न ।।

श्रीराम म्हणा जयराम म्हणा जय जय जय जय राम म्हणा
श्रीकृष्ण म्हणा जयकृष्ण म्ह‌णा जय जय जय जय कृष्ण म्हणा!ध्रु.

गाता गाता सापडेल स्वर 
प्रसन्न दर्शन देइल शंकर 
भैरव वा केदार कधी कुणि मल्हारहि तो आळवा ना!१

निराशेतुनी उमले आशा 
आरंभच अशिवाच्या नाशा
आशावादी असतो आस्तिक सदा सिद्ध तो हरिभजना!२

शिवलीलामृत वाचत जावे
हरिविजयी वा मन रमवावे 
ओवी अथवा अभंगवाणी संतांच्या पाऊलखुणा!३ 

देह भले हा राहो जावो 
हरिचरणी मन सुस्थिर होवो 
गाय न सोडी पाठ हरीची रसग्रहण हे रुचो मना!४

ज्ञाना एका नामा तुकया 
रामदास बरवाच स्मराया
नाम जिभेवर, प्रेम पोटभर उरू न देते उणेपणा!५ 

एकांताच्याही एकांती 
गुरुशिष्यांच्या घडती भेटी
समाधान ये माहेराला, फुले मोगरा क्षणक्षणा!६

साध्य नि साधन नामच आहे
दास नि राघव नामच आहे  
स्वरूपीच श्रीराम विसावे गती अन्य त्या उरेचि ना!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
१८.०३.१९९७

Wednesday, February 19, 2025

मनी निरंतर भाव असू दे - रामाचा मी, रामाचा!

मनी निरंतर भाव असू दे -
रामाचा मी, रामाचा!ध्रु.

नाम स्मरा हो नाम स्मरा 
स्मरा स्मरा त्या रघुवीरा 
बोध असे हा संतांचा!१

भाव धरा हो भाव धरा 
अपुलासा तो राम करा 
अपार महिमा नामाचा!२

घट्ट धरावे नामासी
पोचविते रामापाशी 
धरा भरवसा नामाचा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ५० (१९ फेब्रुवारी) वर आधारित काव्य.

मी कोणीतरी आहे असे वाटण्यापेक्षा मी कोणाचा तरी आहे असे वाटणे हिताचे आहे. विषयात राहणे हा आडमार्ग आहे नामात राहणे हा सरळ मार्ग आहे. आपण भगवंताच्या नामात पडून राहावे, त्यात राहिले की कोणीतरी संत भेटतो व आपले काम करतो. संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते. आपण नाम घट्ट धरले तर सुखाने भगवंतापर्यंत जाऊन पोहोचू. कोणत्याही नावाने हाक मारली तरी एकच भगवंत ओ देतो. खरेदीपत्रातील नामनिर्देशाने निरनिराळ्या गावी असलेल्या सर्व इस्टेटीची मालकी मिळते, तसे सर्वव्यापी असलेल्या देवाची प्राप्ती त्याच्या नामाने होते. खरोखर, नाम ही कधीही नाहीशी न होणारी इस्टेटच आहे.

Sunday, February 16, 2025

नामाची मनाशी संगत जोडावी!

नामाची मनाशी संगत जोडावी!ध्रु.

"माझे माझे" सोडावे 
भजनानंदी डोलावे 
"मी रामाचा" अशी भावना - अंगी बाणावी!१ 

कर्तव्यासी चुकू नये 
हाव ऐहिकी धरू नये 
नामस्मरणे तीर्थयोग्यता तनुलागी यावी!२ 

जाणुनिया वृत्ती 
संत जसे सांगती 
तनु गुरुकार्यी तुलसीदलसम मोदे अर्पावी!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ४७ (१६ फेब्रुवारी) वर आधारित काव्य.

ज्या स्थितीत परमात्मा ठेवतो त्यात आनंद मानावा. मिळण्याची व मिळवण्याची हाव वाढल्यामुळे आपल्याला खरे दुःख होते. आपण जगात वागताना सर्व माझे माझे म्हणतो पण प्रत्यक्ष आपल्या वाटणीस किती येते याचा कधी आपण विचार करतो का? भगवंताकडे चित्त गुंतवून ठेवणे हाच खरा धर्म मानावा. नामात जो राहिला सो सत्संगतीत राहिला. मनाची व नामाची संगत जोडून द्यावी. आपण भगवंताच्या आधाराने रहावे. नेहमी लीनता ठेवावी. भगवंतांना ज्या रीतीने समाधान होईल त्याप्रमाणे आपण वागावे. संत ज्याची त्याची वृत्ति ओळखून मार्ग सांगतात. आपण फक्त संत आपल्याला सांगतील त्याप्रमाणे वागावे.

Saturday, February 15, 2025

नाम घ्यावे, नाम गावे, आनंदासाठी

नाम घ्यावे, नाम गावे, आनंदासाठी!ध्रु.

निष्ठेने जो नाम घेतसे
उद्दिष्टाते तो गाठतसे
अगाध महिमा नामाचा त्या संत सांगताती!१

उगमच नामी मोदाचा
वासच नामी मोदाचा
नित्य दिवाळी त्याला ज्याची नामि रमे वृत्ती!२

अनन्य देवासी व्हावे
नामी मीपण ओतावे
आनंदी आनंद वितरते नामाची संगती!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ४५ (१४ फेब्रुवारी) वर आधारित काव्य.

पारंपारिक प्रगतीच्या मार्गात प्रत्येक व्यक्तीतील ज्या गुणदोषांमुळे अडथळा येतो ते गुणदोष दूर करून प्रगतीचा मार्ग भगवंताचे नाम मोकळा करते. म्हणून कोणात कोणतेही गुणदोष असोत, त्याने निष्ठेने नाम घेतले की त्याचे बिनचूक काम होऊन तो ध्येय गाठतो, ज्याला आनंदरूपी नंदादीप हवा असेल त्याने सतत नामरूपी तेलाचा पुरवठा करीत राहिले पाहिजे. थोडक्यात म्हणजे ज्याला आनंद हवा असेल, त्यांनी सतत नाम घेतले पाहिजे. आनंदाचा उगमच नामात आहे. येईल त्या परिस्थितीमध्ये आपण आनंद निर्माण करावा. रोज अगदी पाच मिनिटे का होईना, भगवंताशी अनन्य व्हायला शिका. जगण्यामध्ये आनंद आहे ही गोष्ट खरी, म्हणून ज्यांना जगायचे आहे त्याने नाम घ्यावे. जिथे भगवंत तेथे आनंदी आनंद असतो. आनंद रोख दुःख उधार अशी वृत्ती ठेवावी. ज्याचा आनंद नामात टिकेल त्याला नित्य दिवाळीच आहे.

Tuesday, February 11, 2025

माया भगवंताची छाया..

माया भगवंताची छाया 
का घाबरशी वाया?ध्रु.

रामनाम प्रेमाने घेणे 
तरीच मायेमधुनी सुटणे 
आळवि रे प्रभुराया!१ 

भगवंतावर तिची न सत्ता 
रामाची आगळी महत्ता 
प्रभुच्या आधिन माया!२ 

अवघी दुनिया आहे माया 
श्रीरामाची आहे छाया 
स्मर प्रभुनाम तराया!३


रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले.

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ४२ (११ फेब्रुवारी) वर आधारित काव्य.

मायेला बाजूला सारून भगवंतापर्यंत कसे पोहोचायचे? माया ही भगवंताच्या सावली सारखी आहे. या प्रश्नाचे उत्तर एकच, भगवंताचे नाव घेणे. जसे व्यक्तीशिवाय सावलीला अस्तित्व नाही, तसे मायेला स्वतंत्र अस्तित्व नाही, तसेच तिला स्वतंत्र शक्तीही नाही. मायेची सत्ता भगवंतावर नाही. माया भगवंताच्या आधीन आहे. सर्व विश्व हे मायारूप आहे; म्हणजे ती परमेश्वराची छाया आहे. याचा अर्थ या विश्वाला आधार परमेश्वरच आहे. आता या मायेच्या तावडीतून सुटून परमेश्वराकडे कसे जायचे? भगवंताचे नाव, म्हणजे भगवंताच्या सहीचे पत्र, जर आपण घेऊन गेलो तर मायारूपी रखवालदार ती सही पाहून आपल्याला आत सोडील व भगवंताची भेट होईल. म्हणून माया तरून जाण्यास भगवंताचे नामस्मरण हाच रामबाण उपाय आहे.

Wednesday, February 5, 2025

घडत ना प्रत्यक्षच दर्शन!

दिवसांमागुनि दिवस लोटती व्यर्थ गमे जीवन 
घडत ना प्रत्यक्षच दर्शन!ध्रु.

अश्रूसरिता वाहु लागते 
हृदिची तळमळ ना आवरते
विरह व्याकुळ मम चित्ताचे कसे करू सांत्वन?१ 

रूप अलौकिक दिसु दे डोळा 
ध्यास जिवा लागला लागला 
स्वास्थ्य न लाभे तिळभर चित्ता का न गळे मीपण?२  

दुर्बळ शरीर होउनि बसलो
प्राप्तिसाधना वाटे मुकलो
खंत हीच जाळते निशिदिनी जलावीण मीन!३

ही बेचैनी साहू कैशी 
धावत येई हे हृषिकेशी 
मी ऐकियले रडत्या वत्सा माय घेत उचलुन!४ 

अनेक भक्तांसाठी शिणला
माझा का नच तुला कळवळा
सत्यस्थिति मी माझी केली तुज‌ला निवेदन!५ 

एकदाच दे हरी दर्शना 
लोटांगण घालू दे चरणा
सुहास्यवदना दयाघना मी कधी तुला पाहिन?६

मला न कसली दुसरी आशा 
तुला पाहता मूकच भाषा
पुरव पुरव रे माझी मनिषा त्वत्पादे मी लीन!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(स्वामी स्वरूपानंदांच्या जीवनावर आधारित काव्य)

Sunday, February 2, 2025

स्वामींनी तुज नाम दिले

स्वामींनी तुज नाम दिले 
ॐ राम कृष्ण हरि! ॐ राम कृष्ण हरि!
नाम सदा हे गात रहा 
ॐ राम कृष्ण हरि ! ॐ राम कृष्ण हरि!ध्रु.

गाता गाता वाढू दे लय 
वाढू दे लय बाणो निश्चय
आत्मारामच कैवारी!१ 

इथे कुणाचे भय कोणाला? 
इथे कुणाचा द्वेष कुणाला? 
सोऽहं हा दृढभाव धरी!२

निजधामाला स्वामी गेले 
नाम होऊनी अंतरि आले 
पूजेचा क्षण साध तरी!३

पावसची ही ज्ञानमाउली 
सर्वांच्या शिरि धरी सावली 
वरप्रार्थना ध्यानि धरी!४

अभंग ज्ञानेश्वरी वाच तू 
हरिपाठांतरि जा रंगुनि तू
अमृतधारा झेल शिरी!५

कण कण नामाने भारू दे
नामरसायन तनी भिनू दे 
कायापालट होय तरी!६

सात अंतरे सप्तपदी ही
वज्रकवच तू चढवुन घेई
श्रीगुरुरक्षा हीच खरी!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१७.०१.१९९४
[श्री स्वामींच्या (स्वामी स्वरूपानंद, पावस) खोलीतून बाहेर आल्यावर]

Saturday, February 1, 2025

नाम हे स्मरा चला, देहबुद्धि विस्मरा!

नाम हे स्मरा चला, देहबुद्धि विस्मरा!ध्रु. 

देह मी कधी नव्हे 
देहदास मी नव्हे -
छाती ठोकुनि म्हणा रामदास मी खरा!१ 

मीच राम राम मी
नाम सूर्य या तमी
भाव नामि राहण्या करा त्वरा, त्वरा करा!२

स्वतः स्वतःस ओळखा
सुवर्ण नीट पारखा 
राम हाच रक्षिता भाव अंतरी धरा!३

रचयिता  : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३२ (१ फेब्रुवारी) वर आधारित काव्य.

आपली स्वतःची ओळख करून घेण्याला नामस्मरण हाच उपाय आहे. प्रत्येक प्राणिमात्राच्या ठिकाणी परमेश्वराचा अंश आहे पण हे जाणण्याची बुद्धी मात्र फक्त मनुष्य प्राण्याचेच ठिकाणी आहे. प्रथम मी तो परमेश्वर आहे येथपासून घसरगुंडीला सुरुवात होते. नंतर मी त्याचा (परमेश्वराचा) आहे व शेवटी त्याचा माझा काही संबंध नाही येथपर्यंत आपण खाली येतो. याला कारण देहबुद्धीचा पगडा बसत जाऊन शेवटी, देह म्हणजेच मी अशी भावना होते. आपण स्वतः म्हणजे माझा देहच असे तो आपल्या स्वतःच्या बाबतीत समजतो.  याला कारण मी ज्याचा आहे त्याचा विसर पडून देहबुद्धि बळकट होत गेली. याकरिता उपाय म्हणजे ज्या मार्गाने खाली घसरत आलो त्याच मार्गाने पुन्हा वर जाणे. म्हणजेच पहिली गोष्ट, आता मी देहरूपच बनलो आहे, तो मी त्याचा  (परमेश्वराचा) आहे ही जाणीव करणे. दुसरी गोष्ट, या जाणीवेची परमावधी म्हणजे मी तोच परमेश्वर आहे ही भावना होणे. यावर उपाययोजना म्हणजे, ज्याच्या विस्मरणामुळे ही अधोगती झाली त्याचे स्मरण करणे ही होय. स्मरणाला उत्तम साधन म्हणजे भगवंताचे नाव. म्हणजे नामस्मरणाचा ध्यास ठेवला की मी कोण हे कळेल; व स्वतःची ओळख होईल. भगवंताच्या स्मरणामध्ये देहबुद्धीचे मरण आहे.

Friday, January 31, 2025

नाम हा देवाचा अवतार!

नाम हा देवाचा अवतार!ध्रु.

जितकी नामे तितकी रूपे
महिमा परि नामाचा लोपे -
फोडावा नामाचा टाहो
प्रतीति मग येणार!१

कुवासनेते पळवुनि लावी
सद्भावाच्या वृक्षा रुजवी
भक्ता करि नामाची झारी
वर्षत अमृतधार!२

नामचि घेणे ना विस्मरणे
श्रद्धा नामी अचल ठेवणे
सूक्ष्म कारणा उपाय सूक्ष्मच
अमोघ तो ठरणार!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३१, (३१ जानेवारी) वर आधारित काव्य.

नाम हा भगवंताचा अवतार आहे. सुष्टांचे रक्षण व दुष्टांचा नाश करण्याकरिता मी अवतार घेतो असे भगवंतांनी गीतेत म्हटले आहे. दुष्टांकडून सुष्टांना त्रास होण्यातच भगवंताच्या अवताराची उत्पत्ती आहे. ज्यांचा छळ झाला असता भगवंताने अवतार घ्यावा ते सुष्टच नामशेष झाल्याकारणाने अवतार तरी कसा व्हावा? पूर्वी सद्वासना जिवंत होती, पण ती उघडपणे कृतीत आणणे कठीण होते. आता सद्वासनाच नाहीशी झाली आहे. म्हणजे पायाच ढासळला आहे, तेथे कृतीचा प्रश्नच उद्भवत नाही. आत्ताचा प्रश्न दुर्वासना जाऊन सद्वासना कशी उत्पन्न होईल हा आहे; म्हणजेच कार्य सूक्ष्मातले आहे. म्हणून जसा रोग, तसे औषध किंवा काट्याने काटा काढावा या न्यायाने उपाययोजना सूक्ष्मातीलच असली पाहिजे. वासना बदलण्याला वासनेइतका जबरदस्त इलाज पाहिजे व तो म्हणजे भगवंताचे नाम. सर्वांनी भगवंताच्या नामाचा टाहो फोडणे जरूर आहे. हे कार्य भगवंताने सगुण रूप धारण करून होणे कठीण आहे; ज्याअर्थी कारण सूक्ष्मातले आहे त्याअर्थी त्याचा इलाजही सूक्ष्मातीलच पाहिजे. म्हणूनच नामावताराची आज गरज आहे. प्रत्येक नामागणिक त्याचा अवतार आहे व त्याची कास धरणे हेच आमचे आजचे मुख्य कर्तव्य आहे.

Wednesday, January 29, 2025

नामसाधनाने जाई अभिमान!

नामसाधनाने जाई अभिमान!ध्रु.

देहबुद्धि जाते 
वृत्ति लीन होते 
नकळत गळते अवघे "मीपण"!१

नामाचे उदक 
अतिव पावक
अंतरंगालागी नाम संजीवन!२

नाम राम घेई
राम क्षेम देई 
भक्तिभावे व्हावे रामपदी लीन!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २८ (२८ जानेवारी) वर आधारित काव्य.

साधन अभिमान घालविण्याकरिता करायचे की वाढविण्याकरिता? अभिमान घालविण्याकरिता म्हणून जे साधन करायचे, त्या साधनाचाच जर तुम्ही अभिमान धरला तर तो तुमचा अभिमान जाईल कसा? आजपर्यंत जे नामस्मरण झाले ते परमात्म्यानेच तुमच्याकडून करवून घेतले व आता तुमच्या हिताकरिताच त्याच्या मनातून तुमच्याकडून करवून घेण्याचे नाही. तुमचे हित त्याला तुमच्यापेक्षा जास्त कळते. नामस्मरण करणारे असे तुम्ही कोण? जे काही होत आहे ते परमात्म्याच्या इच्छेनेच होत आहे. त्यात तुम्ही आपला मीपणा कशाला मिरविता? हा मीपणा, हे कर्तेपण, हे प्रपंचाच्या व परमार्थाच्या जबाबदारीचे ओझे, श्रीसद्गुरूचरणी अर्पण करून खुशाल आपल्या आनंदात मोकळेपणाने का राहात नाही? देहबुद्धी गेली म्हणजे तिच्याबरोबर सर्व कर्मे नष्ट होतात. देहबुद्धी आपल्याला भगवंताचा विसर पाडते. या देहबुद्धीवर आपण नामाच्या मंत्राचे पाणी शिंपडू या, म्हणजे तिची वाढ होणार नाही.

Sunday, January 26, 2025

मागावे ते ऐसे मागणेच सरो अंतकाळी मात्र नाम मुखि उरो!

मागावे ते ऐसे मागणेच सरो
अंतकाळी मात्र नाम मुखि उरो!ध्रु.

तरीच जगावे, अंतकाळ साधे
नामस्मरणाने कलीही न बाधे
प्राणासम नाम अंतरात स्फुरो!१

नाम घेता प्रेम जडतसे नामी
आठवीता राम चित्त रमो रामी
नामप्रेम अंगी सर्वथैव मुरो!२

भक्ति हे साधन मूल ईश्वराचे
राम दृष्टिआड न व्हावा नाम घेइ वाचे
आसक्ति विषयी तीळमात्र नुरो!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २६, (२६ जानेवारी) वर आधारित काव्य.

अंतकाळी नामस्मरण होणे म्हणजेच अंतकाळ साधणे, व हा अंतकाळ साधत असल्यास आणखी जगून काय करायचे? व तो साधत नसल्यास आणखी जगून काय उपयोग? अंतकाळ साधण्यासाठीच जगावे. देवापाशी, "मला तू आपला म्हण, माझे मन तुझ्या चरणी अर्पण केले, आता मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा न होवो" असे मागावे. परमेश्वर आपल्या मागेपुढे आहे असे अखंड मानावे. त्याचे स्मरण करणे म्हणजे, जे काही घडत आहे ते त्याच्याच इच्छेने घडत आहे असे समजणे, प्रपंच देवाचा मानून अभिमानरहितपणे तो करणे हा परमार्थ व परमात्म्यावाचून आपल्यास कोणी नाही याचा दृढनिश्चय होणे याचे नाव ज्ञान.  नामाचा सहवास पुष्कळ करावा, म्हणजे विषयाची आसक्ती कमी होऊन नामावर प्रेम जडते. भगवंतास दृष्टीआड होऊ न देणे हीच खरी भक्ति, हेच खरे अनुसंधान, हाच खरा परमार्थ व हेच आपले सर्वस्व आहे.

Saturday, January 25, 2025

रामाचे - रामाचे ऽऽ अनुसंधान राहू दे!

रामाचे - रामाचे ऽऽ
अनुसंधान राहू दे!ध्रु.
 
राम स्मरता 
भोग भोगता 
सुशांत होऊ दे!१

रामच कर्ता
तोच करविता 
दर्शन देऊ दे!२ 

राम कीर्तनी 
मुळास पाणी 
विकास साधू दे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२५.०१.१९७९ 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २५ (२५ जानेवारी) वर आधारित काव्य.

नामस्मरण हे प्रपंचाकरिता, म्हणजे तो चांगला व्हावा म्हणून नाही तर प्रपंचाची आसक्ती कमी करण्यासाठी आहे. आपल्याच कर्माचे भोग आपल्याला भोगावे लागतात हे खरे, पण भोग आले की आपल्या मनाला चैन पडत नाही. म्हणून मनाला भगवंताच्या स्मरणात गुंतवून ठेवले असता आपले समाधान टिकते. आपल्या सध्याच्या अवस्थेमध्ये भगवंताच्या इच्छेने घडायचे ते घडते, असे मानणे किंवा भगवंत चांगले करील असा विश्वास ठेवून वागणे हेच सोपे जाईल. विषय कसा सुटेल? मन एकाग्र कसे होईल? हे न कळले तरी चालेल. सोडण्याच्या गोष्टीचा अभ्यास करण्यापेक्षा धरण्याच्या गोष्टीचा म्हणजे अनुसंधानाचा अभ्यास करावा. झाडाच्या मुळाला पाणी घातले की त्याच्या सर्व भागांना ते पोहोचते, तसे भगवंताचा विसर पडू न दिला तर सर्व काही होते. दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे, तसे भगवंताचे अनुसंधान सारखे राहण्यास त्याचे नामस्मरण आपण सतत करीत असावे.

Thursday, January 23, 2025

नामाचा तुज छंद लागला चाल पुढे पथि अडू नको!

जे झाले ते होउनि गेले
कुढू नको रे, रडू नको!
नामाचा तुज छंद लागला
चाल पुढे पथि अडू नको!ध्रु.

विषय त्यागता
रामी रमता
शांति लाभ तू सोडु नको!१

उठता, बसता
जाता, येता
नित्यनेम तू टाळु नको!२

नाम औषधी
नुरवी व्याधी
शंका कसली धरू नको!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४.०२.१९७९

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ५५ (२४ फेब्रुवारी) वर आधारित काव्य.

आपल्या हातून वारंवार चुका होतात असे श्रींना म्हटले तेव्हा श्री म्हणाले लहान मुलगा चालताना अडखळतो, पडतो किंवा बोबडे बोलतो त्याचे आई-बापास मोठे कौतुक वाटते. त्याप्रमाणे मला या तुमच्या चुकांचे कौतुक वाटते. तसेच चुका सावरण्याच्या तुमच्या प्रयत्नांचेही मला कौतुक वाटते. खरा भक्त कधीही दुःखी कष्टी असत नाही. नेहमी आपल्या समाधानात असतो. भक्तास कसलीही आस नसते त्यामुळे त्याला दुःख नसते. परमात्म्याची इच्छा हीच त्याची इच्छा असते. सगुणाची भक्ती करता करता त्याला मी चा विसर पडत जातो. मी नसून तूच आहेस ही भावना दृढ होत जाते. प्रापंचिकाने सगुण भक्तीने तरून जावे. देहबुद्धी असणाऱ्या माणसाला सगुणावाचून भक्ती करताच येत नाही. भगवंतांना आपण सांगावे की भगवंता तुझी कृपा मजवर असू दे, आणि कृपा म्हणजे तुझे स्मरण मला अखंड राहू दे. आपल्या हातून होणाऱ्या चुकांचे परिमार्जन नामच करू शकते. भगवंताचे नाम हे सर्व रोगांवर रामबाण औषधच आहे. नामाचे हे औषध सतत थेंब थेंब पोटात गेले पाहिजे. गुरुने एकदा सांगितले की तुझे मागचे सर्व गेले पुढे मात्र वाईट वागू नकोस तर शिष्याने ते श्रद्धेने खरे मानावे.

Wednesday, January 22, 2025

संसाराच्या सागरात घालू नामरूपी होडी!

संसाराच्या सागरात घालू नामरूपी होडी!ध्रु. 

नको भोगांची लालसा 
घेऊ विरक्तीचा वसा 
अहंकार छिद्र बुजवू करू तातडी तातडी!१ 

हाती विवेकाचे वल्हे 
संतसद्‌गुरूंनी दिले 
वेगे वल्हवू ही होडी जावयाचे पैलथडी!२

नामासाठी घेऊ नाम 
सखा एक आत्माराम
घेऊ देवाजीचे नाम आम्ही भाबडे नावाडी!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २२, (२२ जानेवारी) वर आधारित काव्य.

आपण ऐहिक सुखाचे प्राप्ती करता नाम घेतो किंवा मी नाम घेतो ही अहंकाराची भावना बाळगतो. या उपाधीमुळे आपल्या प्रगतीला बरेच अडथळे येतात म्हणून नामाकरिताच नामस्मरण व तेही सद्गुरु आपल्याकडून करवून घेतात या भावनेने करावे. त्या योगाने अहंकार नष्ट होऊन शरणागती येईल.
शरणागतीला रामनाम हाच रामबाण उपाय आहे. भवसागर तरून जाण्यास नाम हेच साधन आहे. मनुष्यप्राणी भवसागरात गटांगळ्या खात आहे. समुद्रातून तरून जाण्यास जशी नाव, तसं भवसागरातून तरून जाण्याला भगवंताचे नाव आहे. फक्त संसाररूपी समुद्राचे पाणी नामरूपी नावेत येऊ देऊ नये. म्हणजेच कोणत्याही प्रापंचिक अडचणीमुळे नामात व्यत्यय येऊ देऊ नये. तसेच नामाचा उपयोग संसारातील अडचणी दूर होण्याकरताच व्हावा ही बुद्धी न ठेवता नामा करिताच नाम घ्यावे म्हणजे नावेत पाणी न शिरता सुखरूपपणे पैलतीराला म्हणजे भगवंतापर्यंत पोहोचता येते. वाईट विचार मनात येतील त्यावेळी भगवंताचे नाव घेतले तर त्या विचारांची मजल पुढे जाणार नाही.

Tuesday, January 21, 2025

नामस्मरण करा घराचे सुंदर मंदिर करा

 ॐ 

नामस्मरण करा घराचे सुंदर मंदिर करा 
महाराज ही नामी शिकवण रामच आणा घरा!ध्रु.

प्रेम दिल्याने प्रेम वाढते अपुली कामे करू 
मना उलटता नाम होतसे अनुभव गाठी धरू 
समंजसपणा वर्षभर जणू दिपवाळी दसरा!१ 

जो जो भेटे राघव समजा पाहुणचार करू 
प्रेमे बसवू भोजनास त्या तृप्त तयाला करू 
अन्नदान तर यज्ञच छोटा आग्रहपूर्वक करा!२

ओवी वाचा श्लोक म्हणा हो वाणी सुधारेल 
नमस्कार सूर्यास घालता आरोग्य नांदेल 
प्रपंच अवघा श्रीरामाचा जाण जरा ही धरा!३ 

मी माझे चे फेकू ओझे गोपगडी होऊ 
सद्‌गुरु राम नि कृष्ण भाव हा जागृत नित ठेवू 
रामराज्य ये घरोघरी तर स्वप्नच साकारा!४ 

बाळ गणूचे निमित्त केवळ ब्रह्मच चैतन्य 
तुकामाय जे वदले त्याचा आशय जनमान्य
कवि श्रीरामा महाराज हो निजहृदयासि धरा!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
०३.०६.१९९७
(गोंदवलेकर महाराजांवरील काव्यातील एक काव्य.)

Monday, January 20, 2025

रामा, ध्यास तुझा लागु दे!

रामा, ध्यास तुझा लागु दे!ध्रु.

तळमळ वाढो, वाढो भक्ती
हवी वाटु दे तुझीच प्राप्ती
वेड तुझे लागु दे!१

' मी रामाचा ' वदु दे वाचा
विसर पडू दे निज देहाचा
विश्वात्मक होउ दे!२

निवांत मजसी बसता यावे
मानस माझे विषयि विटावे
तव रंगी रंगु दे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २९९ (२५ ऑक्टोबर) वर आधारित काव्य.

ईश्वराची प्राप्ती व्हावी ही मनापासून तळमळ लागली पाहिजे. ज्यास अशी तळमळ लागली त्याचे निम्मे काम झाले. ज्याप्रमाणे मोठी इमारत बांधताना तिचा पाया अगोदर बळकट असावा लागतो, त्याप्रमाणे खरी तळमळ लागली म्हणजे पुढील कार्य होण्यास फार अडचण पडत नाही व हे होण्यास भाग्य लागते. आपण मनाने रामाचे आहोत असे ठरवून देहाने प्रपंच करावा म्हणजे प्रपंच न बिघडता उलट चांगला होतो.  माझ्याकडे इतके जण येतात पण एकाने तरी मला रामाची प्राप्ती करून द्या म्हणून विचारले आहे काय? मी आलो आहे, तो तुमचे विषय पुरविण्यास आलो आहे काय? समजा, एक जण चोरी करायला निघाला व वाटेत त्यास मारुतीचे देऊळ लागले. तेथे त्याने जाऊन मारुतीला नवस केला की मला जर आज चोरीत यश आले तर मी तुझे देवळावर सोन्याचा मुकुट चढवीन; तर आता सांगा त्या मारुतीने काय द्यावे? त्याने त्याच्या नवसास पावावे असे तुम्हाला वाटते काय? जर नाही, तर तुम्ही विषय मागितले व मी दिले नाहीत तर मला दोष का देता? आपणास नवस करायचा असेल तर असा करावा की ' मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद दे, म्हणजे समाधान राहील, व दुसरे काही मागण्याची इच्छाच होऊ नये. ' म्हणजे मग आपणास त्याचे होऊन राहता येईल.

Sunday, January 19, 2025

दोन अक्षरात कथा श्रीमहाराजांची नाम राम, राम नाम भूमिका तयांची!

ॐ 

दोन अक्षरात कथा श्रीमहाराजांची
नाम राम, राम नाम भूमिका तयांची!ध्रु.

नामास्तव अवतरले ब्रह्म भूवरी 
चैतन्यच रसरसले ते खरोखरी 
अन्नदान नित्य घडो प्रेरणा तयांची!१

नाम सदा स्मरत चला काळजी नको
जे घडले हितकर ते खंत ही नको
श्वास श्वास जपत नाम सत्यकथा त्यांची!२ 

खेडे बहु आवडते गरीब ही तसे 
शेती त्या आवडते राबणे तसे 
नाम अन्न, नाम उदक आवड त्यांची!३
 
घर मंदिर व्हावे हे बोध तयांचा 
नाम हेच राम खचित शोध तयांचा
क्षण न कधी दवडावा रीति तयांची! ४ 

गोंदवले नोंदवले खोल स्पष्टसे
प्रतिमा ती नामरूप अंतरी ठसे
समाधान फलश्रुती श्रवणभक्तिची!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
१८.०८.१९९७
(गोंदवलेकर महाराजांवर आधारित काव्य)

Saturday, January 18, 2025

आत्मसुखाचा अनुभव देण्या अवतरली गीता!

हरि: ॐ तत् सत्
 

आत्मसुखाचा अनुभव देण्या अवतरली गीता!ध्रु.

अपुल्या ठायीं अनुभव घेणे 
अनुभव घेतो हेहि विसरणे
सिद्धांताशी साधुनि देण्या सहजी समरसता!१

शब्दाविण संवाद करावा 
स्वानंदाचा अनुभव घ्यावा
स्वरूपस्थिती असते कैशी बोधितसे गीता!२

परमानंदु भोगत राही 
इंद्रियांस तर वार्ता नाही 
जीभ चाखते जणु अपुली चव भोगित अद्वैता!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
२८/१२/१९७३

खालील ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे मधील प्रवचन क्रमांक ५ वर आधारित काव्य.

हे शब्देवीण संवादिजे। 
इंद्रियां नेणतां भोगिजे।
बोला आदि झोंबिजे । प्रमेयासी ॥१:५८

Tuesday, January 14, 2025

जय जगदंबे माते। करि करुणा गे माते!

।। जय माताजी ।।

जगदंबा ! सगळ्यांची आई ! भक्ताने तिची मानसपूजा आरंभिली ! "जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते "तिच्याच पदी अर्पिलें-
जगदंबेचे लेकरू म्हणत आहे -

++++++++

जय जगदंबे माते। करि करुणा गे माते!ध्रु.

सुवर्णमंडप सजला इथला
रत्नखचित आसन घे तुजला
आसनस्थ हो, मानसपूजा स्वीकारी माते!१

स्नान घातले उष्ण जलाने 
तुज लेवविली विविध भूषणे
कुंकुमलेपन केले सुंदर स्मितवद‌ने माते!२ 

केस धुपवुनी वेणी घातली 
चंदनचर्चित काया सजली 
छत्र, चामरे, दर्पण तुजला अर्पियली माते!३ 

त्रिभुवनजननी कृपा असू दे 
शिरि मायेचे छत्र असू दे 
नामस्मरणी रात्रंदिन मज रंगू दे माते!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०४.१२.१९७३

Thursday, January 9, 2025

नाम घ्यायाचे! नाम घ्यायाचे!

नाम घ्यायाचे! नाम घ्यायाचे!
नाम घ्यायाचे! नाम घ्यायाचे!ध्रु.

विकल्प उठले
बरेच झाले
काय त्यात भ्यायाचे!१

नाम घेतले
चित्त क्षाळले
सार्थक जगि आल्याचे!२

विकार जाई
विवेक येई
स्वागत करु या त्याचे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०९.०१.१९७९

गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक ९ (९ जानेवारी) वर आधारित काव्य.

मनुष्य नाम घेऊ लागला की विकल्पांना असह्य होते, आणि आता हा नाम घेऊ लागला, आता आपली धडगत नाही, अशा धास्तीने त्यांची चळवळ चालू होते, आणि मनुष्याला नामापासून परावृत्त करण्याचा ते प्रयत्न करतात. विकल्प हे अती सूक्ष्म आहेत. त्यांचे उच्चाटन करायला त्यांच्यापर्यंत पोहोचणारा आणि तितकाच सूक्ष्म असा उपाय पाहिजे. तो उपाय म्हणजे भगवंताचे नाम.  
नाम घेऊ लागल्यावर विकल्प येऊ लागले तर गांगरून न जाता, हे सुचिन्ह आहे असे समजून, विकल्पांच्या उच्चाटनाची गुरुकिल्‍ली मिळाली अशा जाणिवेने, जास्त आस्थेने नाम घेण्याचा निश्‍चय करावा. विकल्प जाऊन भगवंताचे संकल्प उठू लागले की आपले काम झाले. आपण रस्त्याने चाललो की नको ती माणसे भेटायचीच; पण आपण आपले चालणे चालू ठेवावे. तसे, विकल्प आले तरी आपण आपले नाम सोडू नये. नामच शंकांचे निरसन करेल व विकल्पांनाही हळूहळू पायबंद घालील.

Wednesday, January 8, 2025

नियमाने घेता नाम, येते पाठोपाठ प्रेम!

नियमाने घेता नाम, येते पाठोपाठ प्रेम!ध्रु.

'मुखी नाम कसे येई ?' प्रश्न विचारावा चित्ता 
मूल आणि प्रेमपान्हा ये न वेगळे करता 
भावभरल्या भक्तासी भगवंत देती क्षेम!१

स्वरी आर्तता आणावी जशी मयूराची केका
हाक जाऊन पोचावी निमिषार्धी देवलोका 
त्वरे धावणे वाटेल दयाघनास स्वधर्म!२

जेथे नाम तेथे प्रेम जेथे प्रेम तेथे नाम
जेथे राम तेथे भक्त जेथे भक्त तेथे राम 
सारा जन्मच होईल नाम घेता सुखधाम!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०७.०१.१९७४

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ७ (७ जानेवारी) वर आधारित काव्य.

नामात प्रेम कसे येईल? असा प्रश्न करण्याऐवजी मुखी नाम कसे येईल? असा प्रश्न करणे बरोबर होईल. मुखी नाम येण्याला वास्तविक आडकाठी कोणाची आहे? तर दुसरी कोणाची नसून आपली स्वतःचीच आहे. वास्तविक एकदा नाम घेण्याचे ठरवून सुरुवात केली की झाले. नाम घेणे हे आपले काम आहे, त्याचे पाठोपाठ येणे हा प्रेमाचा धर्मच आहे. नाम व त्याचे प्रेम ही एकमेकांना सोडून राहू शकत नाहीत. नामात प्रेम का येत नाही? त्याचे उत्तर नाम घेत नाही म्हणून. म्हणजे एखाद्या आईला पोटी जन्माला आलेल्या मुलाबद्दल जसा कळवळा असतो तसा नामाबद्दल आपल्या ठिकाणी कळवळा नसतो. आपण नाम किती आस्थेने घेतो हा प्रश्न स्वतःला विचारणे जरूर आहे. एखाद्या बाईला फार दिवसांनी मूल झाले तर त्याच्या बाबतीत तिची जी स्थिती होते ती नामाचे बाबतीत आपली होणे जरूर आहे.

Monday, January 6, 2025

नाम आळवीता तोषताहे राम! आत्माराम!

रूपाआधी नाम, रूपा अंति नाम 
नाम आळवीता तोषताहे राम! आत्माराम!ध्रु.

रूपाचे ते ध्यान राहो वा न राहो
नामाच्या उच्चारे फोडायचा टाहो
म्हणू राम राम! स्मरू रामनाम!१

नामस्मरणाचा अट्टाहास ठेवा
साधकासि नाम अनमोल ठेवा
अरूपासी रूप देत असे नाम!२

रूपास व्यापते, मना शांतवीते
भाव फुलवीते - भाविका भारते
रत्न रामनाम! रत्न रामनाम!३

रचयिता :  श्रीराम बाळकृष्ण आठवले 
०६.०१.१९७४

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ६ (६ जानेवारी) वर आधारित काव्य.

नाम घेत असता रूपाचे ध्यान आवश्यक आहे का? वास्तविक नाम आणि रूप ही भिन्न नाहीतच. नाम तेचि रूप, रूप तेचि नाम, नाम रूप भिन्न नाही नाही! नाम हे रूपाच्या आधीही आहे व नंतरही उरते. नाम रूपाला व्यापून असते. रूप अस्तित्वात येण्यापूर्वी नाम होते. व रूप गेल्यानंतरही नाम आज शिल्लक आहे. तेव्हा नाम घेणे हे मुख्य आहे. नाम घेत असताना रूपाचे स्मरण सूक्ष्म रूपाने असते. ध्यानी येत नाही म्हणून अडून बसू नये. भगवंताचे रूप तरी निश्चित कुठे आहे? एक राम काळा तर एक राम गोरा असतो.  एक राम लहान तर एक मोठा असतो.  एक राम उग्र तर एक सौम्य असतो. पण सर्व रूपे एका रामाचीच असतात. भगवंत स्वतः अरूप आहे; म्हणून जे रूप आपण त्याला द्यावे तेच त्याचे असते. यासाठी आपण कोणत्याही रूपामध्ये ध्यान केले तरी चालते.

Sunday, January 5, 2025

रामनामाविना राम भेटेच ना!

रामनामाविना राम भेटेच ना!
राम भेटेच ना!ध्रु.

प्रपंच कैसा आहे कळते 
भगवंताची प्राप्ती होते 
साद नच घालता माय धावेच ना!१

नामासम आधार न दुसरा 
नामाधारे व्याधी विसरा 
ध्यास नच लागता सिद्धि लाभेच ना!२

नाम आपुला स्वभाव व्हावा 
रामनाम श्रांतास विसावा 
नामस्मरणाविना देव गवसेच ना!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१२.०१.१९७४

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १२ (१२ जानेवारी) वर आधारित काव्य.

राम राम म्हटल्या शिवाय राम भेटणे शक्य नाही. व्यवहारातही हाच आपला अनुभव आहे. बाकी सर्व केले पण नाम नाही घेतले तर काही उपयोग होत नाही. म्हणून नाम घेणे जरूर आहे. नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी. अशा नामालाच निष्ठेचे नाम असे म्हणतात. ते नाम मंगलात मंगल व अत्यंत पवित्र आहे. भगवंताच्या नामाची गरज दोन तऱ्हेने आहे; एक प्रपंचाचे स्वरूप कळण्यासाठी आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी. भगवंताची तळमळ लागेपर्यंत नामाची जरूरी आहे; नंतर भगवंतावाचून आपल्याला दुसरा आधार नाही म्हणून नाम घ्यायला पाहिजे आणि शेवटी भगवंताच्या दर्शनानंतर नाम सवयीने आपोआप येते. जो नामस्मरण करील व अनुसंधान ठेवील त्याला भगवंताची जिज्ञासा आपोआप उत्पन्न होईल. नामाकरिता नाम घ्या की त्यात राम आहे हे कळेल. नाम घेत असता, जे घडेल ते चांगले व आपल्या कल्याणाचे आहे असा भरवसा ठेवावा. जसे इमारतीच्या पायालाही दगड व कळसालाही दगडच असतो, तसेच साधकांना व सिद्धांनाही नाम हेच साधन आहे. आपले जीवन देवाच्या हाती आहे व देव नामाच्या स्वाधीन आहे हे पक्के लक्षात ठेवा.

Saturday, January 4, 2025

नाम कसे घ्यावे..

कसेहि घ्या - कुठेहि घ्या
कितीहि घ्या नाम!ध्रु.

इंद्रिये मना -
मन मग पवना
जोडत आत्माराम!१

स्वयेच गावे
अन् ऐकावे
मधुर मधुर नाम!२

उठता बसता
जाता येता
घ्या हो अविराम!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
०४.०१.१९७९

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ४ (४ जानेवारी) वर आधारित काव्य.

नाम कसे चालेल हे ध्येय ठेवावे; व त्याला मदत होईल व्यत्यय येणार नाही अशा तऱ्हेची कोणतीही बैठक असावी. बैठकीला फार महत्त्व देऊ नये. नामस्मरणात खंड न होईल हे ध्येय ठेवून त्याला अनुकूल अशी ज्याच्या त्याच्या प्रकृतीधर्माप्रमाणे कोणतीही बैठक ठेवावी. वास्तविक नाम कसे घेऊ हे विचारणे म्हणजे पेढा कसा खाऊ म्हणून विचारण्यासारखे आहे. पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो, तसे नाम कसेही घेतले तरी ते आपले काम करतेच करते. नाम कसेही घेतले तरी घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडील. म्हणून कसेही करून नाम घ्यावे.

Wednesday, January 1, 2025

नाम देवाजीचे नाव!

नाम देवाजीचे नाव!ध्रु.

नाम साध्य नि साधन
नाम सगुण निर्गुण
भवसागर तरण्या नाव!१

नाम जोडी जीव शिव
नाम लेणे हो कोरीव
नाम दृढ करी भाव!२

नाम आनंद साधन
नामाअंगी देवपण
देत रामाचरणी ठाव!३

याचा आरंभ सगुणी
याचा शेवट निर्गुणी
भक्तीचे दुसरे नाव!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०१.०१.१९७४

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १ (१ जानेवारी) वर आधारित काव्य.

नाम म्हणजे भगवंताचे नाव. देवाच्या कोणत्याही नावात फरक नाही. नाम हा जीव आणि शिव यांमधील दुवा आहे. नाम हे साध्य आहे व साधनही आहे. नाम सगुण आहे आणि निर्गुणही आहे. नामाचा आरंभ सगुणात आहे व शेवट निर्गुणात आहे. नाम हा सत्संगाचा पाया आहे व कळसही आहे. नाम म्हणजे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळीच आहे. देवाचे देवपण त्याच्या नामात आहे. पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे तसे नाम हे मनाचे जीवन बनले पाहिजे. आपली देहबुद्धी जसजशी कमी होईल तसतसे ते नाम व्यापक व अर्थगर्भ बनत जाते, आणि शेवटी नाम हे परमात्मस्वरूपच आहे असा अनुभव येतो. अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तु म्हणजे भगवंताचे नाव पाहिजे. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे. नामात एका आनंदा शिवाय दुसरे काही नाही.