Thursday, July 9, 2026

दरबारच भरला विठूचा!

तुकाराम ! तुकाराम ! तुकाराम ! तुकाराम ! 
दरबारच भरला विठूचा! ध्रु.

मृदंग बोले झांज झणझणे 
वीणा छेडत चाले गाणे 
भाव अनावर सहजच पडतो पाउस भजनाचा!१ 

ज्ञाना नामासंगे आला 
तुकाराम चिंतनी रंगला
सहजसमाधि तया साधली हा क्षण सोन्याचा!२ 

भक्तीतुन लाभते प्रेरणा 
विठ्ठलांत हरवला तुका, ना
दुजेपणाला वावच नाही प्रसंग गमतीचा!३ 

तू मी तो सगळेच तुकोबा
अंतरि भवती वसे विठोबा 
गंध चंदनी स्पर्श सुशीतल तुळशीपत्रांचा!४ 

मोहरूप आवली सारली 
विरक्ति ती सवयीची झाली
मन हो उन्मन चढुनच गेला गिरि भंडाऱ्याचा!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१७/४/१९९९
पहाटे ५

No comments:

Post a Comment