निष्ठावंत सुधारक आगरकर – फर्ग्युसन चे प्रिन्सिपॉल झाले – त्यांच्याच देखत नवी इमारत उभी झाली. त्यांना टिळकांची आठवण झाली. उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. अंतकाळ जवळ आला या विचाराने त्यांनी टिळकांच्या भेटीचा ध्यास घेतला. टिळकही हाक पोचताच धावत आले – मित्राचा हात हातात घेतला आणि जणू टिळकांचे प्रेमामृताने ओथंबलेले डोळेच बोलू लागले
----------------------------------------
मनास तुझिया लाभो शांती
श्रांत जिवा घे तू विश्रांती! ध्रु
परिस्थितीवर विजय मिळवशी
स्वार्थत्यागे जना दिपविशी
संकटांस तू मुळी न गणिसी
ताण कसा सोसणार कुडी ती ! १
हाती ते सन्मित्रा तव कर
उजळू दे तव मुखी प्रभाकर
खळाळु दे हर्षाचा निर्झर
कृतार्थ अश्रू तव जणु मोती ! २
शपथ सांगतो तुजला मित्रा
मैत्रीते नच गिळे तमिस्त्रा
पवित्रता जी तीर्थक्षेत्रा
तीच अनुभवी तुझ्या संगती ! ३
बुद्धिवादी तू कैसा वेडा
मला भासशी पूर्ण भाबडा
सरळ मनी राहीत ना तेढा
कर्तव्यास्तव साठव शक्ती ! ४
आज लाभला पूर्वजिव्हाळा
मधुरस्मृती होता क्षणि गोळा
मळा वसंती पुनरपि फुलला
संजीवक ठरण्यास्तव प्रीती ! ५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३१.१.१९६८
No comments:
Post a Comment