Friday, June 5, 2020

कबीर..


कबीर म्हणतो माझा ईश्वर
माझा ईश्वर 'स्वामी' आहे
दुजा न कोणी देहातच तो
विदेहीपणे वसला आहे!

तो तर माझा एक एकला
रंग रूप ना जनात रमला
भार सर्वथा टाकुनि त्यावर
कबीर नामी रमला आहे!

उदार दाता ऐसा नाही
अंतर्यामी बसून राही
जे जे जवळी सगळे त्याचे
जाण कबीरा सदैव आहे!

मन जर माझे त्यांच्यामध्ये
त्याचे मनही माझ्यामध्ये
ऐसे समरस होता यावे
तळमळ तळमळ होते आहे!

फकीरीत जे नाम स्फुरते
अमीरीत ते नच आठवते
नामरसाचा प्याला प्राशुन
कबीर अंतरि रमला आहे!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१२.१२.१९८९

No comments:

Post a Comment