Saturday, June 13, 2020

तात्या, इथे कसा तू?

कळवळले मन बोलुनि उठले-
तात्या इथे कसा तू? ध्रु.

दृष्टिभेट तर क्षणभर झाली
मने मनांशी बोलुनि गेली
बाबा लावुनि हात कपाळी इतुके उच्चारी -
तात्या इथे कसा तू? १

प्रश्न भेदतो अंतःकरणा
काय वाटले, कुणा कल्पना
शब्दांची सुरि धार चावरी ऐसी मर्मच्छेदी
तात्या इथे कसा तू? २

बाबा पाठी विजनी आलो
बंधू दिसता भरुनि पावलो
बाबाच्या शिरि निर्दय दंडा - काय नियतिचा हेतू?
तात्या इथे कसा तू? ३

कळवळला तो मला पाहुनी
मीही गेलो पुरा वाहुनी
मातृभूमि जणु बंधुमुखातुनि मजसी हे विचारी
तात्या इथे कसा तू? ४

कुठे कुणाचे नाते नसते
वेडे मन उर बडवुनि घेते
विफल यत्न मम स्थिरावण्याचा एक मानसी किंतू
तात्या इथे कसा तू? ५

मज अवतारी पुरुष मानले
आज तयाचे स्वप्न भंगले
नागिण डसली अग्रज चित्ता एकच प्रश्न छळी
तात्या इथे कसा तू? ६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment