Saturday, June 20, 2020

कुठवर पाहू वाट?


आशेच्या या प्रशांत दीपीं
मिणमिण करिते वात
तुझी मी कुठवर पाहू वाट? ध्रु.

आजवरी मी स्वप्नमहाली
अनेक चित्रें उरि बाळगली
सत्य जगाची जाणिव नुरली
तुझ्यासाठी मी निशिदिनी झुरले - हाच काय अपराध?१

सुर्याविण कधि कमल फुले का?
सूत्राविण कधि बने मालिका?
स्नेहाविण कुणी ज्योति पाहि का?
तुझ्याविना मज अभागिनीला कोण असे जगतांत?२

असशी कोठे मला न माहित
रात्रंदिन मी तुलाच चिंतित
भैरवि बसते आज अलापित
ऐस कुठेही मला न चिंता राही तूच सुखात!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२२.५.१९५५

No comments:

Post a Comment