Wednesday, June 17, 2020

विचारकलहा भिता कशाला?


सुधारक आणि केसरी यांच्‍यात अनेक प्रसंगी संघर्ष झडला – हल्‍ले प्रतिहल्‍ले झाले – आगरकर केवळ सुधारणावादी नव्‍हते – स्‍वराज्‍यवादीही होते तसेच टिळकांना सुधारणांचे वावडे नव्‍हते. किंबहुना संपूर्ण आगरकर त्‍यांच्‍या अनुयायांनाही पचनी पडणे कठिणच होते.  एकेकाळच्‍या जिवश्‍च कंठश्‍च मित्रांची भांडणे पाहून काही सामान्‍य जन दु:खी कष्‍टी होत त्‍यांना उद्देशून आगरकर म्‍हणतात

--------------------------------------

विचारकलहा भिता कशाला?  विचारकलहा भिता !
आत्‍मप‍रीक्षण खुल्‍या करतसे प्रगतीच्‍या वाटा ! ध्रु.

वाग्‍युद्धी जरी प्रहार झाले
फुलांपरी आम्‍हीच झेलले
तेजस्विनि ठिणग्‍या चमचमती चकमक की झडता १

बुद्धीची लावाच कसोटी
विकसित होवो व्‍यक्‍ती व्‍यक्‍ती
तर्क, पुरावे भूमिकेस या देती बळकटि अता २

रुग्‍णालागी पथ्‍य हवे
कटु हितकर नित वचन हवे
समाजचौकट जुनी फेकु करू विरोध लोकमता ३ 

कर्तव्‍यावर ठेवुनि निष्‍ठा
स्‍वजनांशीही लढू तत्त्वत:
मित्र तरीही न वैरि न कोणी वृथाच घाबरता ४

संघर्षातुन फुलते जीवन
देत चिकित्‍सा नवसंजीवन
स्‍वराज्‍य मिळण्‍यापूर्वी आणू रा‍बविण्‍या पात्रता ५

रुढींचे तोडण्‍यास बंधन
खुशाल सत्ता करो नियंत्रण
समाजोन्‍नती होता घडते ध्‍येयांची पूर्तता ६

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
३०.१.१९६८  ‍

No comments:

Post a Comment