Saturday, March 12, 2022

मिठाचा सत्‍याग्रह

गांधीजींनी स्‍वराज्‍याची चळवळ खेडोपाडी पोचविली, अगदी सामान्‍य माणूसही निर्भय केला – राजकारणाला साधुत्‍वाची जोड दिली यातच गांधीजींचे मोठेपण आहे.  मिठावरील अन्‍याय्य कर दूर व्‍हावा म्‍हणून दांडीला पदयात्रा चालली – स्‍वयंसेवक आपला निर्धार व्‍यक्‍त करु लागले 
*************

प्रतिघासावर कर नच देऊ, अन्‍यायाते नच साहू 
मीठ आम्‍ही करु, मीठ आम्‍ही करु! ध्रु 

निसर्गदत्ता जी संपत्ती 
तिच्‍याचवर का पापी दृष्‍टी 
जुलुमी सत्ते घट पापांचा 
सत्‍वर लागसी तूच भरु!१

जगताच्‍या या वेशीवरती 
वदू जनांचे दु:ख संप्रती 
पदयात्रेचे पथिक होउनी
विश्‍वचालका नित्‍य स्‍मरु!२   

सागरास त्‍या भेटायाला 
मानवसरिता वाहु लागल्‍या 
स्‍वराज्‍य जोवर नाही लाभत 
सुखेनैव वनवास वरु!३   

पदयात्रा ही जेथुन जाइल
जणू मुक्त हो प्रदेश तेथिल 
संताचा संचार पाहता 
आनंदे डुलतील तरु!४   

सत्तांधा तू चालव लाठ्या 
स्‍वये साधशिल शासनहत्‍या 
कंसवधाते मोहनपंथा 
निर्धारे आम्‍हीच धरु!५   

सागरतीरी जमेल सागर 
उत्‍साहा नच उरेल आवर 
मीठ करातील मुळी न सोडू
रक्‍ते यज्ञिय स्‍नान करु!६  
 
सद्हृदयी चैतन्‍य मूळचे 
कृतीत का नच उतरायाचे 
स्‍वराज्‍ययज्ञाच्‍या यजमाना 
नम्रपणे वंदना करु!७   
  
रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

No comments:

Post a Comment