Sunday, March 13, 2022

ॐ नमो भगवते वासुदेवाय!



ॐ नमो भगवते वासुदेवाय!ध्रु.

वसुदेवाचा बाळ अवतरे कारागारात
धन्य देवकीमाता त्याची करुणा साक्षात
नर नारायण हो करणीने करु या स्वाध्याय!१

जेथे जावे तिथले व्हावे झाला गोपाळ
माय यशोदा तिचाच कृष्णा होता लडिवाळ
गोधन पुढती घालुन कान्हा वनांतरी जाय!२

हरि वाजवितो अशी बासरी तनमन वेडावे
स्थळकाळाचे भान सरावे नयन मिटुन घ्यावे
गात्रे वळती आत चाटती कृष्णाचे पाय!३

मी राधा मी कृष्ण पार्थ मी मी सगळे काही
स्थिरचर व्यापुन दशांगुळे ही उरतो तो मी ही
दुःख नि चिंता असा इथुनी काढतात पाय!४

कर्तव्याचा क्रमांक पहिला हे ध्यानी घ्यावे
आचरणाचे सुमन हरिपदी प्रेमे अर्पावे
प्रसाद भोजन तीर्थहि पावन नित्याचे तोय!५

मोह न शिवला कधी जयाला ऐसा श्रीकृष्ण
वत्स होउनी गीतादुग्धहि पिउ या धारोष्ण
अखंड चालू वाट दूरवर दिसे जरी ध्येय!६

खचू न द्यावे मना कधीही गीतासंदेश
समाधान फल कर्माचरणी श्रीहरि संदेश
देह न मी हे कळून पुरते पडो सुखे काय!७

रच यिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२१.०६.२००१

No comments:

Post a Comment