।। श्रीशंकर ।।
श्रीशिवाच्या चिंतनातच रंगवावी भैरवी! ध्रु.
“शं करोति” म्हणुनि शंकर शांतरस हा बरसतो
‘सोड मोहा, विसर देहा साधना कर’ प्रेरितो
त्या गुरूला जोडुनी कर भक्त हे पद आळवी!१
योग्यता तव कळत ना तुज, कोण मी ठावे कुठे?
शोधशी जे आत दडले, आत वळशी तू कुठे?
चूक सहजच हसत खेळत साधका तो समजवी!२
अंतराळी, जळि, स्थळी वा मानवा तू विहरशी
आतले परि दार बंदच कुलुप तू नच काढशी
शोध भौतिक, सुखहि भौतिक ते न कोणा तोषवी!३
विजनि अथवा जनि असावे नाम स्मरता येउ दे
सुप्रभाती वा दिनांती रूप बघता येउ दे
कालभैरव तेज शांभव भक्तिमार्गी दाखवी!४
भस्मभूषित त्रिशुलधारी पुढति मागे जाणवो
षड्रिपुंना पुरुनि उरण्या आत्मबल ते वाढवो
साधना वाया न जाते बोट धरुनी चालवी!५
जो ‘अहम्’ तो मान चिलया दे बळी त्याचाच तू
चांगुणा हो, वा पती हो अन्न त्याचे शिजव तू
हातुनि जे जे घडे ते श्रीशिवार्पण गा कवी!६
जो स्वत:ला पूर्ण विसरे तोच झाला मोकळा
अन्नपाणी ज्या न स्मरते सूर त्याचा लागला
भैरवाला तोषवाया गाई होउन भैरवी!७
पर्वताची चढण चढता शांत शीतल वाटते
मी शिवाचा शिवही माझा जीवपण जणु लोपते
परमहंस नि स्वामीजींचे स्मरण नयनां बरसवी!८
नाम देहातून ओढुनि मन्मना विस्तारते
मीच शिव तो ना उपाधी कोठली मग राहते
योगबल ते काय असते शिवच ध्यानी आणवी!९
युद्धभूमी विश्व जैसे रंगभूमीही असे
जो युयुत्सु तोहि नटवर चिंतने हृदयी ठसे
ऊठ चल बस आसनी या म्हणुनि शिव मज बैसवी!१०
सर्व काही साध्य असते योग्य इच्छा बाळगी
प्राण लावुनि तू पणाला सोड जीवन खाजगी
विहर विश्वी राम बाळा आदिनाथच ऐकवी!११
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०३.०२.१९९६
No comments:
Post a Comment