ही तरुण मने चेतली
होळी कशी प्रचंड ही पेटली! ध्रु.
होळी कशी प्रचंड ही पेटली! ध्रु.
दसऱ्याच्या शुभमुहूर्त ठरला
विदेशि कपडे झाले गोळा
तरुण मुलांचा जमला मेळा
वसने गुलालात रंगली!१
धगधगलेली जंगी होळी
देशभक्ति पुरणाची पोळी
युवकांनी सानंद भक्षिली
जाणिव स्वत्वाची झाली!२
वक्तृत्वे मैदान गाजले
जयजयकारे गगन कोंदले
सानथोर उत्साहे न्हाले
ज्वाला आभाळा भिडली!३
दिशा मिळाली पराक्रमाला
वाव लाभला कर्तृत्वाला
आपण उजळू भवितव्याला
साक्ष झणि चित्ताते पटली!४
स्वदेशि जे ते हृदयी धरणे
विदेशि ते पदतली तुडविणे
बहिष्कार शस्त्रास उपसणे
नौबत युद्धाची झडली!५
लोकमान्य अग्रणी लाभले
मागुति सादर आले चेले
उत्साहाते उधाण आले
म्हणावे हिजला दिपवाळी!६
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment