रामकृष्ण हरी! रामकृष्ण हरी!रामकृष्ण हरी! रामकृष्ण हरी!ध्रु.
भंडाऱ्याच्या डोंगरी भजन तुकोबा करी
इंद्रायणिच्या अंतरि उठती लहरीवर लहरी
त्या ही करती भजन हरीचे सुमधुर मंजुळ स्वरी!१
शब्द रोकडे भाव नेटका आळवितो देवा
पांडुरंग हा सुखे चाखतो भक्तीचा मेवा
अहंपणावर चिरा ठेवुनी तुका गर्जना करी!२
भळाळत्या वाऱ्यात ठाकुनी पाचारी या, या
भक्तिदुकानी या माझ्या हो भक्तिदुकानी या
भरणी आली मुक्त पेठा उधार घ्या सत्वरी!३
रामनाम हे दुकान माझे देवावर ओझे
आळस झटका, वाटतो तुम्हा द्रव्य हे फुकाचे
अध्यात्मासह शुद्ध आचरण प्रकटे सह्यावरी!४
जळो ढोंग ते लाजिरवाणे भाव हवा भोळा
भक्तीसाठी देवा कंठी पंचप्राण गोळा
वेदांचे ते सार सांगते संतांची वैखरी!५
पोथ्यापुराण ग्रंथांमाजी देवधर्म कोंडला
अभंग गाता मोकळ्या स्वरी पाशमुक्त झाला
विठ्ठलनामी साठवलेली स्वर्गामृतमाधुरी!६
मउ मेणाहुन कधी तुकोबा वज्रभेद करती
कडक शब्द आसूड ओढती धर्मबाजिवरती
वाद न जिंकित मने जिंकते संताची थोरी!७
शुद्ध आचरण सोपी भक्ती तत्त्व शुद्ध कथिले
नकळत जगती उपासनेने दैवी बळ प्रकटले
धर्मजागृती, ईश्वरसेवा अशी तुकोबा करी!८
टाळमृदंगी रणवाद्यांचे बोल निघू लागले
परमार्थाचे पराक्रमाशी मधुमीलन झाले
जातिबंधने तटतट तुटली सह्याद्रीशिखरी!९
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment