Saturday, March 12, 2022

का न लाभे समाधान? आड येतो अभिमान!


नाम अभिमानाचा नाश करते

आपण दुसऱ्याला सांगतो तेच आपण आपणास सांगावे. कर्तेपण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही. प्रत्येक कर्माचे वेळी त्याचे स्मरण करु या. नफ्याचे वेळी अभिमान उत्पन्न होतो. तोट्याचे वेळी दैव आठवते. मनुष्याचे हाती काही नाही, सर्व रामाचे हाती आहे. यश देणे न देणे तुझ्या हाती आहे. एकदा रामाच्या पायावर डोके ठेवून रामा मी तुझा झालो आणि तू माझा झालास असे अनन्यतेने म्हटल्यावर त्यापुढे होणारे आपले प्रत्येक कर्म हे त्याचेच होईल.
*******************

का न लाभे समाधान?
आड येतो अभिमान!ध्रु.

रामाविषयी प्रेम न वाटे
तळे मनाचे सगळे आटे
कंठ न फुटता स्फुरेल का कधि
कोकिळेस मधुगान!१

उचंबळे जळ असे भासले
हरिण धावले, भ्रमले थकले
सुखार्थ जे जन प्रतिपळ झटले
कण न गवसला सान!२

रामचि कर्ता राम करविता
मी माझे हे सर्व विसरता
अहंभाव कर्पुरसम विरता
ये करि सौख्यनिधान!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचने मधील क्र.२५६-१२ सप्टेंबर, या  प्रवचनावर आधारित काव्य)

No comments:

Post a Comment