Monday, March 14, 2022

भारतमाते महन्‍मंगले, तुझ्या मंदिरी आलो

भारतमाते महन्‍मंगले, तुझ्या मंदिरी आलो 
अमृतडोही बुडलो! ध्रु. 

इथली माती इथला कणकण 
त्‍यात हरवले माझे मीपण 
तीर्थस्‍वरूप झालो! १ 

अंखड भारत अखंड भारत 
या ध्‍यासाची मजला सोबत 
धुंद फुंद मी झालो! २ 

समर्पणाचा निश्‍चय स्‍फुरला 
या मातीचा टिळा लाविला 
अध्‍यात्‍मच मी जगलो! ३ 

सगळ्यांची तू भारतमाता
कर्तव्‍याची तू सुरसरिता 
पुरता मी पालटलो! ४ 

संस्‍काराचे केंद्रच मंदिर 
ॐकाराचा येथे जागर 
धन्‍य पुजारी झालो! ५

राष्‍ट्र जगतसे हौतात्‍म्‍याने 
भगवंताच्‍या आशीर्वचने 
उजळत उमलत फुललो! ६ 

समाज जैसा तैसे मंदिर 
जैसे मंदिर तैसे स्थिरचर 
शुभसंस्‍कारे घडलो! ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
१५.१२.१९८७

No comments:

Post a Comment