Thursday, March 3, 2022

सिद्धयोगी गजानन महाराज भक्ति स्‍तोत्र



 
ॐ नमो जी विघ्‍नेशा। 
ज्ञानेशा हे योगेशा। 
स्‍तविण्‍यासी या सत्‍पुरुषा। 
शब्‍दोशब्‍दी त्‍वां यावे ।।१।। 
 
“श्रीगजानन विजय ग्रंथ”। 
भाविकचित्ती फुलवी वसंत। 
अनुभविता हे मोद अनंत। 
श्रावणझड ही थांबेना ।।२।। 
  
पंढरिचा श्रीदासगणू-। 
संतकवी गुण किती गणू? 
तापरहित प्रतिभाभानु। 
साहित्‍याच्‍या गगनी हा ।।३।।   

“श्रीगजानन, जयगजानन।”
मोहरु दे तन, मोहरु दे मन। 
रंगत जावो चरित्रगायन। 
गजानना तू कृपा करी ।।४।।   

पलंगावरी बसलेला। 
कैवल्‍याचा हा पुतळा। 
आवडला बहु आवडला। 
छंद जडे तद्भजनाचा ।।५।।  

चिलीम हाती धरलेली। 
अग्‍नीची जी खूण भली। 
दिगंबरा मूर्ती दिसली।
सिद्धयोगि हा नि:संग ।।६।।  

“गिन गिन गिनात बोते “। 
कोणी हळूच कानी वदते। 
नखाग्र नकळत ठेका धरते। 
विसर पडतसे जगताचा ।।७।।   

सुमने कोणी वाहियली। 
भक्‍तमानसी दरवळली।
धन्‍य धन्‍य ती झालेली। 
सार्थक त्‍यांच्‍या जन्‍माचे ।।८।।  
 
तव चरणी पडता काया। 
स्‍पर्शभास हो सुखवाया। 
माउलिची रे मधु माया। 
“गजानना” तव स्‍मरणात ।।९।। 
  
पांडित्‍याचा गर्व नको। 
दंभ नको, अभिमान नको। 
दुजेपणाचे नाव नको। 
“मीठभाकरी” भक्ति बरी ।।१०।।  

शिते वेचली आनंदे।  
ब्रह्म प्रकटले स्‍वच्‍छंदे। 
भक्त पाहती किती मुदे। 
तीच दिवाळी, तो दसरा ।।११।।  

तेज मुखावर मावेना।
लाजलाजतो रविराणा। 
सौम्‍य करुनिया निजकिरणां। 
पदारविंदा वंदितसे ।।१२।।   

धन्‍य ग्राम ते शेगाव। 
जेथ वसाया ये राव। 
भगवंता रुचला भाव। 
धाव घेतसे भक्‍तगृही ।।१३।।   

तव चरितासी नित गावे।
गजानना लिहवुनि घ्‍यावे।
तूचि मन्‍मना क्षाळावे। 
लाव उराशी गुरुराजा ।।१४।।   

कशी करावी तव पूजा? 
कोण एक अन् कोण दुजा? 
रुचत न तुज गाजावाजा। 
तुज स्‍मरण्‍याते मौन भले ।।१५।।   

आरंभी पुसतो कोऽहं?  
भ्रमे समजतो देहोऽहं
संत शिकविती वद सोऽहं 
सोऽहं मय होते सगळे ।।१६।।  
  
दासगणूची रसाळ वाणी। 
सिद्धयोग्‍याची अद्भुत करणी। 
शुभसंयोग येता घडुनी। 
उधाण ये आनंदाला ।।१७।।  

ऐसी बाणली बालवृत्‍ती।  
इतरेजन सांभाळिती।  
गंगाजलसम निशुद्धता ती।  
येत अनुभवा पुन:पुन्‍हा  ।।१८।।  

अत्‍यंत निर्भय, निरामय।  
सिद्धयोगी दयामय।  
क्षमा शांति यांचे आलय।  
समर्थस्‍वारी आहे हो ।।१९।।  

पाणी तरी तोच आहे।  
पिणारा ही तोच आहे।  
व्‍यवहारी नच गुंतुनि राहे।  
ऐसा योगी सोवळा ।।२०।।  

भावभक्ति नाणे घेई।  
तयावरी संतुष्‍ट राही।  
चित्त ज्‍याचे त्‍यास ग्‍वाही।  
श्रीसमर्थ त्‍याचे हो ।।२१।।  

कमलपत्राचिये परी।  
समर्थ अलिप्‍त निर्धारी।  
न ये कोणा त्‍यांची सरी।  
थोरवी ना वर्णवे ।।२२।।  

चरणीचे तीर्थ दिधले।  
जानरावाते जगविले।  
परदु:खाने कळवळले।  
श्रीगजाननमहाराज ।।२३।।  

कोणी करिता वृथा टवाळी।  
हासुनिया जरासे गाली।  
अपराधरूपी तृणास जाळी।  
कृपाग्नि सिद्धयोग्‍याचा ।।२४।।  

गजाननाची ऐसी महती।  
जन्‍ममरण फेरे चुकती।  
कोडी अवघड निमिषी सुटती।  
किमया करिती श्रीसंत ।।२५।।  

महिमा कधी न वाढावा।  
संग न कुठला बाधावा।  
जावे कुठल्‍याही गावा।  
एकांताची ओढ अशी ।।२६।।

शेगाव गाव भाग्‍यवंत।  
रत्‍न स्‍वये चालत येत।  
आता कीर्ति होत दिगंत।  
कस्‍तुरिगंधा शपथ नको ।।२७।।  

पाहतात जन अघोरी वृत्ती।  
खणाणून कर गणप्‍या उलटी।  
बरवी नव्‍हेचि आग्रह रीती।  
आचरणाने दाखविले ।।२८।।  

श्रीगजानन जीवन्मुक्त।  
वृत्ति बालोन्मत्त पिशाच्‍चवत।  
कधी गात कधी मौन धरत।  
रानोमाळहि भिरभिरती ।।२९।।  

उतरंडीतिल कानवले। 
कैसे अचूक आठवले ?
त्रिकालज्ञ हे संत भले।  
भक्तिभाव जे वाढविती।। ३०।।  

अन्‍न माधवे सोडियले।  
माधवास त्‍या भिववियले।  
भोगायासी हवी फळे।  
पळवाटेचे नाव नको ।।३१।।  

आसनस्‍थ हा शिव भासे।  
तेज अमित वदनी विलसे।  
सुवर्णकांती झळकतसे।  
अवधूत श्रीस्‍वामींची ।।३२।।  

करुणा कर रे गजानना।  
सुसह्य कर रे वेदना।  
चुको न मी अनुसंधाना।  
देहभावना लोपवि तू ।।३३।।  

भावशून्‍य मानस झाले।  
विषयखडक किति दडलेले।  
विस्‍मृतिचे चटके बसले।  
लज्‍जा गेली दिगंतरा ।।३४।।  

‘देह नव्‍हे मी’ उमगावे।  
मृत्‍युभये ना हडकावे। 
आत्‍मारामा चिंतावे।  
धुळाक्षरे म्‍यां गिरवावी ।।३५।।  

द्वाड गुरे मम गात्रांची।  
परवड करती जीवाची।  
जनी होतसे मग ची ची।  
लाज राख रे गजानना ।।३६।। 

द्रौपदिच्‍या हाकेसरशी।  
धावत आला हृषिकेशी।  
तैसा वाचव पतितासी।  
सन्‍मार्गावर त्‍या आणी ।।३७।।  

झरा खळाळो भक्‍तीचा।  
बांध फुटू दे अश्रूंचा।  
गजर घडो हरिनामाचा।  
‘मी’ ने विश्‍वा व्‍यापावे ।।३८।।  

सज्‍जनगडचा तू दास।  
भक्ताचे मनि तव वास।  
नित्‍य पुरविशी धीरास।  
गजानना रे गजानना ।। ३९ ।। 

आठव देवा बालपणी।  
नाम जपत जा निशिदिनी।  
तरीच येइल संकटि धावुनि।  
उपदेशाचा मथितार्थ ।।४०।।  

तुझी कृपा हो जयावर।  
साह्य करी त्‍या रमावर।  
भक्ति हवी परि अनावर।  
तेच चलन तुझिया राज्‍यी ।।४१।।  

लबाड कधि ना बोलावे।  
आत्‍मारामी रंगावे।  
कर्तव्‍यातहि प्रेम हवे।  
प्रेम हेच जीवनसूत्र ।।४२।।  

दिला शब्‍द नच मोडावा।  
प्राणपणे तो पाळावा।  
का करणे हेवादावा।  
आत्‍मतत्त्व विश्र्वी एक ।।४३।।  

जलाविना जन तळमळती। 
जीव तुझा ये काकुळती।  
झरे त्‍वरे झुळझुळती।  
विहीर भरली पाण्‍याने ।।४४।।  

प्रारब्‍धाचा जो भोग।  
सुखे भोगणे हा योग।  
कुढत बैसणे हा रोग।  
हासत जा, तू खेळत जा ।।४५।।  

सांग, अमर का कुणि झाले।  
जे आले, ते ते गेले। 
त्‍याविण ना कोठे अडले।  
ऐसी गति घटियंत्राची ।।४६।।  

द्वाड इंद्रिये जरि असली। 
शहाणीहि होतील भली।  
प्रेमळ बोला ती भुलली।  
आत्‍मा सारथि हो जेव्‍हा ।।४७।।  

का मळ येतो नित्‍य मनी?
जनी असुनि का नर विजनी? 
बल न पुरत आत्‍मोद्धरणी। 
धावा यास्‍तव देवाचा ।।४८।।  

गजानना! हे योगीराज!   
पूजा स्‍वीकारा महाराज!   
प्रसन्‍न व्‍हावे मजवर आज!   
तिमिरनाशना या गुरुराज ।।४९।।   

कुणी गांजिला गरिबीने।  
कुणी पीडिला व्‍याधीने।  
कुणी ग्रासला चिंतेने।  
माय तयांची तू होशी ।।५०।।  

घास घालुनी सुख देशी।  
पाठीवर कर फिरवीशी।  
व्‍यक्‍तीव्‍यक्‍तीतुनि दिसशी।  
करुणासागर हे मुनिराज ।।५१।।  

एकटा न मी, सकलांचा।  
बांधव मानवजातीचा।  
हक्‍क गा‍जविन सेवेचा।  
प्रेमातच मग कलह उरे ।।५२।।  

ऊस घेऊनि झोडपले।  
हासत सगळे सोशियले।  
वळ पाठीवर ना दिसले।  
आत्‍मबुद्धि ही कवचच की ।।५३।।  

ऊस घेउनी करि सगळे।  
क्रमाक्रमाने तू पिळले।  
आनंदे रस जन प्‍याले।  
आत्‍मानंदा तुळा नसे ।।५४।।  

ज्‍वाला करती नृत्‍य जरी।  
निर्भय तू त्‍यामाझारी।  
कुणी करावी बरोबरी ? 
योगीश्‍वर हे गुरुवर्या ।।५५।।  

भाळ टेकिले पदांवरी।  
शूळ न उरला राईभरी।  
तनातुनी उठल्‍या लहरी।  
कृतज्ञता नेत्री आली ।।५६।।  

आजवरी होतास कुठे?
हृदया हे कळले नव्‍हते।  
पुण्‍य न कधि वाया जाते।  
जाणवले हे जाणवले ।।५७।।  

चून भाकरी चाखावी।  
वृत्ति विरक्‍ती बाणावी।  
जनसंमर्दी देखावी।  
करुणामूर्ती श्रीहरिची ।।५८।।  

भाव जरी आला उदया।  
घर न लागते सोडाया। 
हरिहि लागतो खेळाया।  
भक्तजनांसी फुगडी हो ।।५९।।  

गजानना रे गजानना।  
स्मितवदना रे स्मितवदना।  
उरी लाव रे दीनजना।  
धाय कधीची मोकलितो ।।६०।।  

गिन गिन गिनात बोते बोल।  
बसल्‍या ठायी आणत डोल।  
देहादिक माया ही फोल।  
आत्मतत्त्व हे सत्त्व मिळे ।।६१।।  

कुणा कवीला लिहवीशी।  
कुणा गायका गावविशी।  
भाविकास तर नाचविशी।  
पदी घुंगुरे सोऽहंची ।।६२।।  

दासगणूंची ही किमया।  
वाचकास केले चिलया।  
देहबुद्धि नेली विलया।  
माय चांगुणा ते झाले ।।६३।।  

देवाघरचे ज्ञात कुणा ? 
दुवा कुणा वा दोष कुणा ? 
कधी कुठे ही हरिकरुणा।  
गंगौघापरि घे धाव ।।६४।।  

शेगावाचे बहु नाव।   
भक्तांची तिकडे धाव।  
कळवळुनी म्‍हणती पाव। 
ठाव देइ गे चरणांसी ।।६५।।  

दिली लेखणी तुझ्या करी।  
परमार्थासी तू विवरी।  
गिरविन मी शिकविल्‍यापरी।  
गजानना, श्रीगुरुराया ।।६६।।  

अवखळ मन सद्गुरुराया।  
फरफट जगि चाले वाया।  
शांति न पळ लाभते तया।  
सदया त्‍यासी वळवावे ।।६७।।  

करुणा तुझिया नयनांत।  
पाठीवर फिरतो हात।  
तूच माय तू मम तात।  
स्‍पर्शमिसे ओळख पटली ।।६८।।  

दयाघना रे गजानना। 
अम्‍ही लागलो तव भजना। 
सुख आले चालत सदना। 
तुझी पालखी पाहियली ।।६९।।
   
आत्‍मस्‍वरूप समजावे। 
विषयसुखासी त्‍यागावे।  
भजनानंदी रंगावे।  
अंत:करणा विमल करी।।७०।।
  
क्षुधा तृषा तू साहियली।  
जननिंदा वर सोशियली।  
सर्व वेदना पचवीली।  
नीलकंठ मजला गमशी ।।७१।।  

शिवसम योगी दिगंबर। 
वावरलासी धरेवर।  
अहेतुक दया जनांवर। 
तुवा माउली केलेली ।।७२।।  

शैशव मानव्‍याचे तू। 
सुमनाचे कोमलपण तू।
सुगंध-सौंदर्यहि तू तू। 
कोटि प्रणाम तुजला रे ।।७३।।  

आलो तुझिया दरबारी।  
गजानना हे गिरिधारी।  
भक्‍तजनांचा कैवारी।  
शेगावामधि विराजला ।।७४।।  

समाधिमंदिर निरखावे।  
कलश देखता हरखावे।  
आनंदाने लोळावे।  
पदधूली भाळी ल्‍यावी ।।७५।।  

स्‍मरणे चित्ताची शुद्धी।  
स्‍मरणे भक्तीची वृद्धी।  
नकोत मज ऋद्धी सिद्धी।  
भक्ति तुझी वाटे बरवी ।।७६।।  

श्रवण कराव्‍या तव लीला।  
त्‍याच पुरविती शांतीला।  
झरझर धारा नयनाला।  
परम विसावा चित्तास ।।७७।।   

निवास हृदयी राहू दे।  
डोळे मिटुनी पाहू दे। 
पोटभरी मज गाऊ दे।  
गजानना रे तव की‍र्ती ।।७८।।  

गजानना, हे अविनाशी।  
‘रामदास’ तू भक्‍तासी।  
विठ्ठलही तू कोणासी।  
भावचि झालासे देव ।।७९।।  

भरते आले प्रेमाचे।  
उन्‍मन होउनि मी नाचे।  
तुझे नाम गातो वाचे।  
श्री गजानन, जय गजानन ।।८०।।   

गाय चाटते चरणांसी।  
माय तिची सदया होसी।  
वरदहस्‍त तू धरितोसी।  
मनास माझ्या तसे करी ।।८१।।  

तुझी कृपा झालियावरी।  
करील व्‍याधी काय तरी ?
उगमी तिचिया दिसो हरी।  
स्‍वामिसमर्था दे दान ।।८२।।  

कृपामेघ तव बरसू दे।  
अनुसंधानी रंगू दे।  
अक्षयसुख मज लाभू दे।  
अध्‍यात्‍माचा छंद जडो ।।८३।।  

विसरुनि अपुल्‍या देहाला।  
चौखुरांमधे तू निजला। 
घोडा वठणीवर आला।  
सत्त्वाचा भास्‍कर उगवे ।।८४।।  

सूत्ररूप तव भजनाचा।  
अर्थ कसा उमजायाचा? 
अनावर तुझी तुज वाचा।  
गिण गिण गिणात बोते ।।८५।।  

तुझ्या सदनि वाटे यावे।  
क्षणभर निवांत बैसावे।  
तुजसी पुढती कल्‍पावे।  
कालगतीला लंघुनिया ।।८६।।  

गजानना, तू कुंभार। 
दे मातीला आकार।  
तुझ्या करांचा आधार।  
आम्‍हालागी तोच भला ।।८७।।  

नौकेमाजी तू बसता।  
दर्शनास आ‍ली सरिता।  
पैलतिरा तू पोचविता।  
यात्रिक झाले धन्‍य बहु ।।८८।।  

संत देव हा भाव असे।  
संत देव प्रत्‍ययो असे।  
संत देव हृदयात वसे।  
अवघी भूते भगवंत ।।८९।।  

गुरुचरणांची जोड हवी।  
प्रभुसेवेची ओढ हवी।  
दर्शनास नव दृष्टि हवी।  
इथे तिथे श्रीहरी दिसे ।।९०।।  

धाव पाव रे गजानना।  
पदी ठाव दे दीनजना।  
शरण शरण तुज गजानना।  
भवभय निरसी गजानना ।।९१।।  

भवभयहारक गजानना।  
सन्‍मतिदायक गजानना।  
पदनतवत्‍सल गजानना।  
ये सदना रे ये सदना ।।९२।।  

स्‍तोत्रा आपण परिसावे। 
भाविकास दर्शन द्यावे।  
लळे आगळे पुरवावे।  
ऐका इतुके दासाचे ।।९३।।   

देह जरी टाकुनि गेला।  
परमहंसरूपे दिसला।  
जो अनुभवितो तोचि भला। 
उद्धरला तो निमिषार्धी ।।९४।।  

देव भुकेला भावाचा।  
भक्त भुकेला देवाचा।  
देव भक्त या दोघांचा।  
रंगतसे नामी खेळ ।।९५।।  

दर्शन अपुले आनंद।  
ध्‍यान आपुले आनंद।  
स्‍मरण आपुले आनंद।  
प्रसाद अपुला आनंद ।।९६।।

टिळकां दिधली भाकर ती।  
प्रसाद म्‍हणुनी खाल्‍ली ती।  
कणे कणे दिधली शक्‍ती।  
“गीतारहस्‍य” अवतरले ।।९७।।  

अघटित माया तव देवा।  
करवुनि घेशी कशि सेवा। 
करील कोणी मम हेवा।  
“तुझाच मी” हे ज्ञान पुरे ।।९८।।  

जरी मुलाचा अपराध।  
माय न मानी लव खेद।  
भक्‍त तुझा घालत साद।  
मायमाउली समजूनी ।।९९।।  

अवधूता हे गजानना।  
वितर शांति माझिया मना।  
अवधूता हे गजानना।  
अमृतगोडी द्या भजना ।।१००।। 

सिद्धयोगी हा आवडला।
सुखदु:खाशी समरसला। 
सखाच गमला सकलाला। 
समर्थस्‍वामी शेगावी।।१०१।।   

अद्भुत लीला मोहविती। 
तत्त्व आगळे ठसवीती। 
आचरणी येते नीती। 
या लीलेते काय म्‍हणू? ।।१०२।।  

जानकिजीवन गजानन। 
देवकिनंदन गजानन। 
मनभावन श्रीगजानन।  
रिता ठाव त्‍या विना नसे।।१०३।।  

सगुणी निर्गुण चिंतावे। 
निर्गुणि सगुणा शोधावे। 
मना अंतरी वळवावे। 
नाम सदोदित येत मुखी ।।१०४।।  

विदेहत्‍व देही यावे। 
तिमिर आघवे लोपावे। 
मानस माझे धवलावे। 
सोऽहं दीपे गजानना ।।१०५।।  

गजाननाचे भजन करू। 
गजाननाते नमन करू। 
गजाननाचे ध्‍यान करू।
भवसागर हा पार करू ।।१०६।।  

गजानना घेता नाम। 
किंकर बनला ‘श्रीराम’। 
स्‍मरतो तुजला अविराम।  
जय गजानन गजर करी ।।१०७।।  

इह पर लोकी कल्‍याण। 
भक्‍तजनां न पडे वाण। 
स्‍तोत्राचे करुनी गान। 
लोटांगण हो घालू या ।।१०८।।  

।।ॐ सिद्धयोगी गजानन महाराजार्पणमस्‍तु।।     
 
रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
लेखन काल : ०६.१०.१९७५ ते ०८.१२.१९७५

No comments:

Post a Comment