ॐ
कथा ही भगवद्गीतेची!
कथा ही भगवद्गीतेची!
कथा ही भगवद्गीतेची
सर्वांगाचे कान करूनी ऐकुन घेण्याची
मोहनिरसनाची!ध्रु.
रणांगणावर सांगितलेली, शरण जाउनी ध्यानि घेतली
घनांधकारी पुरी हरवली कर्तव्याची वाट गवसली
आता कृती करायाची! १
आपण असतो निमित्त केवळ, कर्तृत्वाचा दावा पोकळ
मी कर्ता बडबड ही बाष्कळ, मलाच फळ समजूत वेडगळ
विद्या अलिप्त असण्याची!२
देह येतसे तसा जातसे त्याची चिंता कोण करतसे,
स्वरूपात ज्ञानी राहतसे, हजार जखमा तो साहतसे
झुंज ना सोडून देण्याची!३
कर्तव्याचे पालन करता तोष होतसे सदा अच्युता
काय फलाची उगाच चिंता कृष्णच कर्ता कृष्ण करविता
समाधि सहज साधण्याची!४
खचू न द्यावे मना कधीही नाम हरीचे अमृत होई
ते पवनाला जोडून देई, तो मी अनुभव निश्चित घेई
जगती असून नसण्याची!५
चालू क्षण साधावा आपण नाम स्मरु उजळाया जीवन
तने झिजावे जैसे चंदन सद्गुरूंना आत्मत्त्वे वंदन
साम्यता जगण्या यज्ञाची!६
योगेश्वर योगीश्वर होता ज्ञानाचा तो सागर होता
मेघासम तो उदार होता वेणूचा हळवा स्वर होता
मनाने तया भेटण्याची!७
विकारवश ना कधी व्हायचे विवेकास ना सोडायाचे
आपण अपणा पहावयाचे पाठ गिरवणे सोसायाचे
पुस्तिका ही आचाराची!८
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२५,२६ आणि २७ नोव्हेंबर २००१
No comments:
Post a Comment