ॐ नमः शिवाय
हे करुणाकर, पापतापहर,
निरंजना अवनीपाला!
सांब सदाशिव, सांब सदाशिव,
सांब सदाशिव पाव मला!ध्रु.
कधी स्मशानी तू वसतोसी!
नगाधिराजा तू भूषविसी
अशिव नाशिणे मदनदाहका
हे गंगाधर तव लीला!१
नागभूषणे कंठी रुळती
वेध लाविते निश्चल मूर्ती
चंद्रकोर भाळी तव झळके
हे उमावरा वेल्हाळा!२
तू नंदीला वाहन केले
हालाहलाते कंठी धरिले
हसत साहल्या सकल वेदना
तोषविलेसी जगताला!३
डम डम डम डम डमरू वाजे
त्रैलोक्यी तव महिमा गाजे
आदिनाथ तू, आदिगुरू तू
मुनिजन करिती स्तवनाला!४
स्मशानातली रुचे विभूती-
दिगंबरा तुज वरे विरक्ती
अर्धांगिनि शोभली पार्वती
रुचे तुला गायनी कला!५
त्रिशूलधारी, त्रिनेत्रधारी
भक्तजनांचा तू कैवारी
जे शिव मंगल ते रुचते तुज
कर्मफुले वाहिन तुजला!६
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
५.१/०७.०१.१९७६
No comments:
Post a Comment