ॐ तत् सत्
स्वरूप- चिंतन अर्थात् स्वरूप गीता
श्रावण शु.११ १८९६
स्वामी अत्यवस्थ असल्याचे कळल्यावर निर्माण झालेली आंदोलने.
प्रत्यक्ष निर्याण १५ ऑगस्ट १९७४ श्रावण वद्य १२ शके १८९६ गुरुवार सकाळी ९.
प्रत्यक्ष निर्याण १५ ऑगस्ट १९७४ श्रावण वद्य १२ शके १८९६ गुरुवार सकाळी ९.
ॐ
कृतज्ञता!
कृतज्ञता!
श्रावण शु. ११ शके १८९६! सोमवारचा दिवस ! मनाला फार हुरहूर लागून राहिली होती. बहुतेक स्वामी भक्त मिळेल त्या वाहनाने पावसला गेलेले. अत्यंत असहाय वाटले- कर्तव्यात लक्ष लागेना.
मनी उसळलेले कल्लोळ जाता येता उतरवीत गेलो. मन शांत शांत होऊ लागले.
मला पुण्यातच त्यांचा सहवास लाभण्याचा सुयोग असावा!
यात मांझे काहीच नाही! सर्व काही सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंदांचे!
लेखन समाप्ती कृष्णाष्टमीला! आणि साक्यांची संख्याही नेमकी १६२! सर्वच काही विलक्षण!
खरोखर श्रीगुरुलीला अतर्क्यच म्हणायला हवी. सर्व स्वामी भक्तांना ही स्वरूप गीता शांतिदायक, पुष्टिदायक उत्साह संवर्धक होऊ दे हीच श्रीस्वामी चरणी प्रार्थना!!
मी कृतज्ञ आहे!
ॐ तत्सत् सोऽहं हंस:
- श्रीराम बाळकृष्ण आठवले
+++++++++++++++++++
हरि:ॐ
"देह नव्हे मी "मनीं ठसू दे
स्वामी शिकवा आम्हां
"सोऽहं, सोऽहम्" ज्ञान होउं दे
धरितों अपुल्या चरणां! १
卐
ज्ञान माउली अपुल्या रूपें
पावस नगरा आली!
शिकवण ठरलें अवघे जीवन
देहिं अहंता नुरली!२
卐
शब्दाविण जप अम्हां शिकविला
चित्त कराया शुद्ध!
स्थिरावतां मन सोऽहं ध्यानी
नुरला कोणी बद्ध !३
卐
राम कृष्ण हरि मंत्र आपुला
उच्चारित राहूं !
सगुणीं तैसे निर्गुणिं अपणां
गुरुदेवा पाहूं !४
卐
देह विनाशी जाइल जावो
अम्हां आकळो आत्मा!
जो अज-अव्यय - सर्वव्यापी
तोच तोच परमात्मा!५
卐
स्व-रूप चिंतन करितां करितां
ऐसें तन्मय व्हावें !
मनासि मनपण उरलें नाहीं
हेच प्रत्यया यावें!६
卐
अश्रू आले जरि नयनांतुनि
परी तयांची दीप्ती!
कथील जगतां या बिंदूतही
दयासिंधुची वसती !७
卐
"जितकी भक्ती तितकी प्राप्ती"
सद्गुरुनी म्हटलेले!
सोऽहं साधन प्रखर व्हावया
प्रेरक तें ठरलेले!८
卐
अंतर्यामी येउनि स्वामी लिहवुनि
कांहीं घ्यावे!
लिहिता लिहितां मलाच नकळत
उन्मनपण लाभावें!९
卐
निजकर्तव्या द्यावी निष्ठा
चराचरावर प्रेम!
विरक्तिविषयीं दृढ अनुरक्ती
भावभरें द्या क्षेम !१०
卐
व्यक्तित्वाते वाहियले पदि
सांभाळा मज आतां !
उठता बसता रहा पाठिंशी
स्वामी स्वरूपनाथा!११
卐
देहीं कधिं मन नच गुंतावें
इतुकें द्यावें दान !
वैराग्याची हीच एकली
दिसो जगातें खूण!१२
卐
जायचेच जर म्हणतां आपण
जावें संतोषाने!
कृतार्थ झालें अवघे जीवन-
नरजन्माचे सोनें!१३
卐
अम्हां साधकां हसवा, रिझवा
जातांनाही स्वामी!
हृदयोंहृदयी यावे देवा-
निरंतरी परि स्वामी!१४
卐
पांचा भूतीं ऋण जे दिधले
आज भार का होते?
शिकविलेत तें कळुनी सगळे
थोडेही नच वळते!१५
卐
ज्ञानमाऊली घरां चालली -
आळंदीला दाटी!
भर माध्यान्हीं भानु मावळे
तमें ग्रासली सृष्टी!१६
卐
श्रावणातल्या अमृतधारा-
संपविती तापाला!
"अमृतधारा" तशा आपुल्या
संजीवक हृदयाला!१७
卐
जगदंबेचा कुमर लाडका
साद घालतो "आई!"
तीही त्याला धरूनि हृदयीं
पान्हा पाजत राही!१८
卐
'दत्त-अंश' जो अपुल्या
मधला हाच देतसे बोध !
सुख-निधान तर वसे अंतरीं
तुझा तूंच घे शोध!१९
卐
कां बावरसी ? विव्हळ होसी ?
खुळ्याच माझ्या जीवा !
हे शिकलासी परमार्थी का ?
शांत शांत हो जीवा !२०
卐
मी नच गेलों, विश्वी भरलों
डोळे मिटुनी पाही !
सोऽहं सोऽहं तुला आंतला
देइल याची ग्वाही!२१
卐
तूं म्हणजे मी, मी हि तोच तूं
यासि म्हणावें ज्ञान !
अद्वैताचा घेई अनुभव करी
सुधारस पान !२२
卐
उघडी डोळे, हांस जरासा
प्रसन्न मुद्रा व्हावी !
तूं स्वरूप, आनंद तूंच ही
वृत्ती तनि बाणावी!२३
卐
देई प्रेमा, घेई प्रेमा
लूट लूट आनंद !
तुझ्याच हृदयीं प्रसन्न हांसे
आनंदाचा कंद !२४
卐
मतिमंदचि जो शोक करी तो
देहाच्या अंताचा !
शोध घ्यायचा तुला परंतू
व्यापक चैतन्याचा! २५
卐
स्व-स्थ राहुनी अपुल्या स्थानीं
भजनीं रंगुनि जावें!
दया-क्षमा-शांतींनी तेव्हां
अंतरि वसण्या यावें!२६
卐
स्वीकारावी स्वामी आपण
भावफुलांची माला!
शब्द आपुले रस हि आपला
गंध आगळा आला ! २७
卐
मार्दव द्या हो, द्या निर्मलता
हिमालयाचे स्थैर्य!
भक्त आपला संकटांतही
सदैव राखो धैर्य!२८
卐
तोल मनाचा मुळि न सांवरे
द्या श्रद्धाबल स्वामी !
मलिन मानसा निर्मल करण्या
अम्हां गुंतवा नामीं!२९
卐
मन हे वेडें किति भिरभिरतें
अगणित गोते खातें!
पाऱ्याहुनिही अधिक निसटतें
केवळ फरफट होते!३०
卐
आत्मा अमुचा कधि न खचावा
हिंमत ऐसी यावी !
शीलरक्षणा प्रगाढ भक्तचि
प्राण पणाला लावी ! ३१
卐
वासुदेवमय विश्व आपणां
कसें जाहले स्वामी?
मरणावरही उत्कट प्रेमा
कैसा केला स्वामी!३२
शरण शरण मी आलो अपणां
चरणिं ठाव द्या स्वामी!
कुरवाळा मुख, स्नेह दृष्टिनें-
रिघा अंतरी स्वामी!३३
卐
ताटी उघडा स्वरूपनाथा
कितितरि दाटी झाली!
एकदांच तरि द्या दर्शनसुख
'मुक्ता' दारी आली!३४
卐
निज देहाचा मोह मिटू दे
वितरा आत्मानंद !
अनुग्रहाने मनास जडु दे
सोऽहं सोऽहं छंद!३५
卐
स्वरूप ज्ञानदा, स्वरूप ज्ञानदा'
समीकरण हे रुजलें!
ज्ञानाईने मुक्त करांनीं
ज्ञानधनासी लुटलें!३६
卐
जीवितवैभव तुमचें अवघे-
काय तुम्हांसी द्यावें?
गुरुस्वरूपा, ईशस्वरूपा
"दर्शन" कैसें घ्यावे?३७
卐
सोऽहं सोऽहं प्रेमसूत्र परि
तुम्हीच हाती दिधले!
हृदय बंदिशालेंत आपणां
स्थानबद्ध जणु केले!३८
卐
'स्पर्श' हि आपण, दृष्टी आपण
'रस' झाला गुरुवर्या !
'श्रवण' हि आपण, गंध हि आपण
सर्व सर्व गुरुवर्या !३९
卐
चैतन्याहुनि भिन्न दिसे जे
तो सगळा आभास!
आत्मारामचि असे विनटला
दिसे ज्ञाननयनांस!४०
卐
सूत्ररूप आदेश असे जो
महावाक्य त्या म्हणती !
जप ना करणे कधी तयाचा
तशी बनावी वृत्ती!४१
卐
नव्हें देह मी, विश्वरूप मी
उंच उंच विहरावें !
नच दुर्बळ मी, नव्हे रुग्ण मी
तट सारे लंघावे !४२
卐
देहासक्ती दुःख देतसे
मनास करिते मूढ
"स्वरूप-गीता" परि उकलिते
जें जें गमतें गूढ !४३
卐
आत्म-पणे नांदणे आपणां
सर्व ठिकाणी ठावें !
जन्म न ज्या त्या मृत्यू कैसा
वृथा कष्टि कां व्हावें?४४
卐
पुन्हा पुन्हा ही कढत आसवे
पाझरताती गाली!
छे! छे! गंगा तनामनाच्या
मळास सगळ्या क्षाळी!४५
卐
कृतज्ञ आम्ही स्वामी अपुले
सावध ऐसें केलें!
ध्यान- ध्येय-ध्याता ही एकच
सहजपणे दाखविलें!४६
卐
स्वामी! स्वामी ! अंतर्यामीं
"रामकृष्ण हरि" स्वामी!
स्वामी ! स्वामी! 'सोऽहं, सोऽहम्
भाव हि आपण स्वामी!४७
卐
मऊ मेणाहुनि करा अम्हांतें,
वज्राहुनही वज्र!
देहभाव विच्छिन्न कराया
द्या सोऽहं तरवार!४८
卐
सोऽहम् खड्गहि असे आगळे
नच तोडी परि सांधे!
सूत्र असे जरि, कधीहि ना परि
जिवास मोहीं बांधे!४९
卐
जो जो बुडला येथे तरला
अशी भक्तिची गंगा!
जो गहिवरला तो तर फुलला
आवडला श्रीरंगा!५०
卐
तापहीन मार्तण्डहि आपण
चंद्र अलांच्छन स्वामी!
निशिदिनि बरसा प्रकाशधारा
चकोर झालो आम्ही!५१
卐
रामकृष्ण हरि! रामकृष्णहरि!
राम कृष्ण हरि गाऊ!
अम्ही गोपिका "स्वरूप - कृष्णा"
भावफुले पदि वाहूं!५२
कृपावंत सद्गुरु लाभला-
स्वरूपनाथा तुम्ही!
असंख्य लहरी आम्ही उसळत्या
नीलगगनि शशि तुम्ही!५३
卐
उठता बसता, ज्ञाना ध्याता
ज्ञानदेव जणु झाला!
वात्सल्याने, हळुवारपणे
घास भरविले बाळा!५४
卐
विदेहत्व देहीच पावला
पर-तत्त्वा देखियले!
भोग-मोक्ष अर्पिले हरीला
ऋणी तयासी केले!५५
卐
आत्म-ज्ञानी अमर जाहला
कधी न काळा भ्याला!
पुनः पुन्हा लावियला ओठां
आत्मसुधेचा प्याला!५६
卐
माझे माझे म्हणुनि वाहिले
शिरावरी जर ओझे!
दुःखच आपण मोल देउनी
विकत घेतले चोजें!५७
卐
प्रारब्धाची फेड न चुकते
सत्पुरुषा ही जगती!
शांत, दांत तो स्वस्थ निरंतर
रमे सदा एकांती!५८
卐
लेखणीतुनी झरति अक्षरे
ती तर अपुले बोल!
मंत्रमोहिनी घालुनि भारुनि
जिवा आणती डोल!५९
卐
उणे न काही अपणालागी
निवांत ठायी बसता!
अद्वयत्व खंडिता न हलके
मधुर द्वैत अनुभविता!६०
卐
प्रातः संध्या, सायं संध्या
स्वरूप-चिंतन झाले!
कृपा आपली उदार ऐसी
मजला अपुला म्हटले!६१
卐
नेति, नेति जर वेद बोलले
तिथे काय मी बोले?
शुक मी केवळ अपुला स्वामी
वदविलेत ते बोले!६२
卐
सर्वस्वाचे दान कराया
दान वृत्ति द्या आम्हां!
अहंपणाचा बंध तोडण्या
तीक्ष्ण शस्त्र द्या आम्हां!६३
卐
स्वरूप-महिमा गाता गाता
शब्दावाचुनि अडले!
मनास आला मोहक थकवा
मौनच मग आवडले!६४
卐
स्वामी अपुले चरण पाहता
काळाचे भय सरले!
देहाचा संबंध कोठला?
अलिप्तपण ते कळले!६५
卐
आले अश्रू लाज न आम्हां
हांसू नाचू गाऊ!
अत्र-तत्र - सर्वत्र आपणा
गुरुकृपेने पाहूं!६६
卐
दुःखी कष्टी खिन्न न होणे
विषयलाग तोडावा!
अनित्य जे ते होते जाते
बोध ठसावा बरवा!६७
卐
विवेक आणिक वैराग्याचे
स्वामी द्यावे दान!
कोण मी असे? करू काय मी?"
याचे व्हावे भान!६८
卐
रामकृष्ण तुम्ही, रामतीर्थ तुम्ही
अक्कलकोट निवासी!
कबीर आपण, मीरा आपण
रामभक्त श्री तुलसी!६९
卐
सोऽहं, सोऽहं, दिड् दा, दिड् दा
दिड् दा, सोऽहं सोऽहम्!
हृदयतंत्री ही गाऊ लागली
सोऽहम् सोऽहम् सोऽहम्!७०
卐
गुरुदेवा हे कळून आले
सद्गुरु नसतो देह!
शुचितेचे ते, आनंदाचे
प्रसन्न हसरे गेह!७१
卐
सद्गुरु असते तत्त्व आगळे
सुदृढ करि जे सत्त्व!
सद्गुरु असते स्थान असे
ज्या स्वयंसिद्ध तीर्थत्व!७२
卐
स्वरूपेश, ज्ञानेश, महेशा
शिकविलेत हे तत्त्व!
अजर-अमर मी, आनंदी नित
लक्ष्य हेच पूर्णत्व!७३
卐
भक्तीलागी ओढ लागली
सहजपणे ज्ञानाची!
ज्ञानाला ही कळली गोडी
मधु-मधुरा भक्तीची!७४
卐
हृदयामधि ज्या होत्या खंती
सनया त्या झाल्या!
"स्वरूप-गीता" प्रेमभराने
आळवित्या झाल्या!७५
卐
स्वरूप-देवा स्वरूप-सुमने
स्वरूप होउनि वाहू!
स्वरूप-सूर्या स्वरूप - नदिचे
स्वरूपार्घ्य वाहू!७६
卐
आत्म वस्तु जी असते केवळ
तिथे काय बोलावे?
स्वयंसिद्ध जे त्याविषयी का
वृथाच शंकित व्हावे?७७
卐
बावरते मन, झरती लोचन
कंठ किती तरी दाटे!
आत्मबुद्धिला स्वरूपनाथा
फुटू न द्यावे फाटे!७८
卐
वाणी मजला होत अनावर
कशास घालू आळा?
सजतो जर हा गेंद फुलांचा-
कशास गुंफूं माळा?७९
卐
चंद्र चांदणे पांघरितो परि
एकपणा लोपेना!
भक्त पूजितो जरि भगवंता
अद्वयत्व, खंडेना!८०
卐
येथे कोणी गावे कोणा
पूजावे तरि कोणी?
जरी उसळले तरी मिसळते
पाण्यामध्ये पाणी!८१
卐
चुकतो आम्ही, ठेचकाळतो
क्षणैक विव्हल होतो!
ध्येयध्रुवावर दृष्टि ठेवुनी
पथ पुढचा परि क्रमितो!८२
卐
जरी गुंतलो देही आम्ही
बुडालोच संदेही!
समाधान मग कुठले लाभे
भाव-भक्ति जर नाही!८३
卐
समस्त जावुनि दोष आमुचे
चित्त करा हो शुद्ध!
कधी थोपटा कधी धोपटा
तरीच होऊ सिद्ध!८४
卐
धोपटाल परि कैसे आम्हां?
लोण्याहुनि मऊ तुम्ही!
अन्य देह जरि पोळत तापे
झणि कळवळता तुम्ही!८५
卐
हे हिमगौरा, गुणगंभीरा
मुसावल्या सौंदर्या!
तुझ्याच प्रतिमा असति उमटल्या
जितक्या अमुच्या चर्या!८६
卐
परा शांति देतसा भाविका
गौरव किति वानूं?
ब्रह्मरूप जाहल्या आपणां
घरी कसे आणू?८७
卐
भावविवश का होतो आम्ही?
मन सुस्थिर का नाही?
आपण असला परीस तरीही
लोह न आम्ही काही!८८
卐
परीस ज्याते स्पर्श करी ते
लोह होतसे सोने!
संत ज्या परी सहजचि स्पर्शे
सपदि संत हो तेणे!८९
卐
स्थूलांतुनि सूक्ष्मांत पदोपदि
प्रवास अपुला चाले!
"स्वागत करितो, अंतरि यावे"
भाविक प्रेमें बोले!९०
卐
अम्हीच बनलो स्वरूप ज्या क्षणि
विश्व विष्णुमय झाले!
आम्हीच बनलो "स्वरूप" तत्क्षणि
मरण अमरपण ल्याले!९१
卐
द्वैताचा आभास मावळे
अद्वय उदया आले!
मलयानिल वाहता रुणझुणा
चंदन गंधित झाले!९२
खूण मौन जरि असली तरिही
वटवट अमुची चाले!
खटपट सगळी शांतीसाठी
म्हणून मन बडबडले!९३
卐
बोलविता धनी असे वेगळा
हेंच जाणुनी बोलू!
सूत्रे विधिकरि अम्हीं बाहुल्या
हांसू नाचू डोलू !९४
卐
प्रवेश अमुचा स्व-रूपी होता
ठायी बसू निवांत !
ज्योत प्रीतिचि राहिल तेवत
सुमंद आणि प्रशांत!९५
卐
आम्ही अपुले, आपण अमुचे
झालो एकाकार!
सोऽहं सोऽहं ध्वनी अनाहत-
दुमदुमवी प्राकार!९६
卐
आघाताने अशा तीव्रतर
सुख-फल हाती आले!
रडणे झाले सुखद सुखदसे
स्मित सुमनांचे झेले!९७
卐
आत्म-रूप सर्वत्र दिसूं दे
दिव्या दृष्टी द्यावी!
कंटकपथिं चालतां अम्हांसी
कंटक सुमनें व्हावी!९८
卐
स्वरूप - साक्षात्कार होउ दे
देहाहंकृति जावो !
अपुल्या चरणी अवखळ मानस
लडिवाळासम राहो!९९
卐
शिरावरी जरि आले घाले
हासत हासत साहूं!
गळ्यांत पडले पुष्पहार तरि
तटस्थतेने पाहू!१००
卐
सद्गुरू असता उभा पाठीशी
कशास करणें खंत ?
दाखवीतसे अंतरांतला
प्रसन्न श्री-भगवंत!१०१
卐
गंगेमाजी जलौघ मिळतां
गंगा होउन राही!
आम्हीं मिळलो तसे स्व-रूपी
भिन्नभाव मग नाही!१०२
卐
असू शरीरी, नसू शरीरी
देह- बंध ना आम्हां!
घटात जे जल, सागरि ते जल
एक एक परमात्मा!१०३
卐
हंसच आम्ही परमविवेकी
क्षीर तेवढे घेतो!
नीर न मोही क्षणभर आम्हां
सार तेवढे घेतो!१०४
卐
किति सांगावे, किति बोधावे
शिवे न कधि कंटाळा!
देतां वाढे आत्म-बोध परि
देहबुद्धिसी टाळा!१०५
卐
काया गेली म्हणाल कोणी
रडाल धाई धाई!
हसेन दाटुनि करुणा पोटी
माय कधी का जाई?१०६
卐
ज्ञान-माउली गेली कां कधिं?
ती आहे सुखरूप!
तसे पहावे मला अंतरी
भोगा शांति अमूप!१०७
卐
अपुले असते अपुल्या पाशी-
हवी कशाला काशी?
गंगा-यमुना झरती नयनीं
संगम हो हृदयाशी!१०८
卐
"आनंदाचे लाडू खातों!"
तुकया सांगे जगतां!
देहासी कां कवटाळुनि मग
ध्यानि न घेत अनंता!१०९
卐
रडे लेकरू मातेला तधि
येत अनावर भरते!
हसे लेकरू तदा माउली
प्रसन्न गाली हसते!११०
卐
वदनावरती शरद - पौर्णिमा
सदा सदा विलसावी
अज्ञानाची अमा-काजळी
सदा सदा निरसावी!१११
卐
जनी जनार्दन, मनी दयाघन
नयनी श्रावण यावा!
ऊन कोवळे, सरसर शिरवे
हवा वचनि ओलावा!११२
卐
गीता-मुरली श्रीकृष्णाची
पुन्हां पुन्हां ऐकावी!
सोऽहंचा स्वर पडतां कानी
विवेक वाणि फिटावी!११३
卐
जीव तळमळे, सुशांत 'शिव ' परि
निवांत ठायी बैसे !
जिवा-शिवांचे मीलन होतां
अमृतधारा वर्षे!११४
卐
पूजितसे परि मी कवणाला?
माझी पूजा चाले!
मीच आजला माझ्या कानी
माझे गाणे श्रवले!११५
卐
एकान्ताची मला आवडी
अंतर्मुख मी होतो!
डोळे मिटुनी हृदयस्थासी
श्रीविष्णूसी बघतो!११६
卐
मी ध्रुव, झालो, नारायण मी
नारद मुनिवर तो मी
प्रल्हादहि मी कयाधु माय हि
नारसिंह ही तो मी!११७
卐
दाता आणिक याचक बनता
आपण एकचि वेळीं!
हसत पहावे जगी वाढते
कैसी खेळीमेळी!११८
卐
यन्त्रालय मी, रुग्णालय मी
विद्यालय ही झालो!
रणाङ्गण तसे व्यासपीठ ही
न्यायालय मी झालो!११९
卐
दुष्टावा का जगात चाले ?
प्रेमभाव का लोपे?
दृष्टी बदला - जाणवेल की
देव कधी नच लोपे!१२०
卐
सद्भावासी करु आवाहन -
कृतज्ञतेसी पूजू!
आपण मनिच्या तिमिरासंगे
सावध होउनि झुंजू!१२१
卐
भगवंताच्या इच्छेवाचुनि
पान न एकहि हाले!
माय शिकविते म्हणुनि लेकरू
अर्धस्फुट से बोले!१२२
卐
दुःखी होता आपण अपुल्या
मनास द्यावा धीर!
तोल जर सुटे हात देउनी
मनास करू सुस्थिर!१२३
卐
सागर आपण, लहरी आपण
चंद्र तशी शशिकिरणें!
मायहि आपण, अर्भक आपण
एकपणे अनुभविणे!१२४
卐
कशास आता रुसवा-फुगवा?
उणे दुणे काढावे?
देता घेता प्रेम स्वर्णमय
उदंड से वाढावे!१२५
विषयांतर ही मना मोहवी
बरवा "विषय" त्याग
मुक्त हिंडणे शिकवित जीवा
ईश्वरीय अनुराग!१२६
卐
भंडाऱ्यावर जाउनि गावा
श्री तुकयाचा गाथा!
ओवी गाता ज्ञानेशाची
"नम्रोन्नत" हो माथा!१२७
卐
करणी केली कुणी म्हणावी?
मीरा वेडी झाली!
कोण साधिका मुरली होउनि
श्रीहरिच्या करि आली?१२८
卐
वेड शहाणे असते हरिचे
वेडे गाणे स्फुरते!
वेड भक्तिचे जिवा लागतां
मानस शिवमय होते!१२९
卐
सागरपृष्ठावरी उसळती
लाटांवरती लाटा!
दृष्टी फुटतां अंधालागी
उलगडताती वाटा!१३०
卐
धनंजयाची नसे न्यूनता
एकमेव भगवंत!
कुरुक्षेत्र प्रतिचित्ती असते-
माधव गीता गात!१३१
卐
कान हवा परि हे ऐकाया,
हवी तीव्र जिज्ञासा!
पार्थ हि आपण, माधव आपण
लक्ष देउनी परिसा!१३२
卐
देहोऽहं ची सरता भ्रांती
सोऽहं सोऽहं स्फुरते !
अहं हि अलगद गळून पडता
"तो केवळ" हे उरते!१३३
卐
थकवा आला जरी तनाला
मन राही उत्साही!
जो थकतो तो नव्हेस तू रे
तूंच आपणा पाही!१३४
卐
मरण आपुलें पाहुनि डोळा
शंभू फुलुनी आला!
मरण-सोहळा परी तयाचा
सार सांगुनी गेला!१३५
卐
शरीर मृण्मय दिसते चिन्मय
आत्मसूर्य जधि तळपे!
आत्मसूर्य परि तया सोडिता
ठायीच ठायी करपे!१३६
卐
तथागतांच्या मुद्रेवरचे
मंद हास्य जे ते मी!
येशू ख्रिस्ताच्या नयनींचे
कारुण्य हि जे ते मी!१३७
卐
गोळ्या घुसल्या शरीरात जधि
'रामा' चिंतित होतो!
"क्षमा तयांना.. असे अनंता
तेव्हां प्रार्थित होतो!१३८
卐
फास फळीवर उभे राहूनी
मीच चुंबिले फांसा!
अनंत मरणे जगुनि घडविले
भारतीय इतिहासा!१३९
卐
सुवासिनींच्या कुंकुमतिलकामध्ये -
माझा वास!
प्रसन्न शैशव जे हसते ते-
माझा सर्व विलास!१४०
卐
हताश होणे शोभत नाही
पौरुष प्रेमी मनुजा!
दया जयाच्या हृदयीं वसते
क्षमा तयाची तनुजा!१४१
रहस्य भगवद्गीतेचे मी
कथितो या शब्दांत!
"देहोऽहं नच सोऽहं, सोऽहं"
वागविणे ह्रदयात!१४२
卐
ईशकारणी पडली तनु जर
सतेज कांचन झाले!
झिजता झिजतां खोड चंदनी
अधिक सुगंधित झाले!१४३
卐
नमितों योगी थोर विरागी
स्वरूप - आनंदाते
कृतज्ञतेने लेखणि माझी
शिकवण त्याची लिहिते!१४४
卐
हात जोडितो स्वरूप नाथा
करुनि घेतली सेवा!
झरत आंसवे तीर्थोदक ते
प्राशिन मी गुरुदेवा!१४५
卐
शरीर पडतां धरणीवरती
'स्वरूप-गीता' गावी!
आत्मानंदी रमती सगळे
अशी प्रचीती यावी!१४६
卐
' जो हसला तो अमृत प्याला'
ऐसे कविवर वदती!
अनुभविता मग मोदसोहळा
कोडी सगळी सुटती!१४७
卐
लहान बीजांतुनी विकसतो
कैसा हा वटवृक्ष?
थक्कित होउनि कर जुळती त्या
म्हणती जया अलक्ष!१४८
卐
स्वरूप ध्याता, स्वरूप झालो
स्वरूप सगळे बोले!
स्वरूप वक्ता, स्वरूप श्रोता
स्वरूप प्रेक्षक झाले!१४९
卐
अमृतधारा तुझी शांतिदा
देते जीवन-सार!
गाथा संजीवनि तव नेते
भवोदधीच्या पार!१५०
卐
तुझ्या कृपेसी अंत नसे गे
ठाव दिलासी चरणी!
घन अंधारी झळकविलासी
तू ज्ञानाचा तरणी!१५१
卐
असाच येवो गुरुभक्तीसी
कृपावृष्टिने पूर!
अंतर्बाह्य मी व्हावे चिन्मय
बदलो सगळा नूर!१५२
卐
हात जोडुनी उभा राहिलो
क्षणभर डोळे मिटले!
पसरूनि कर तू मज छातीशी
घट्ट घट्टसे धरले!१५३
ज्ञानांजन तू घालुनि नयनी
शिकविलेस संगीत!
बहरुनि आली अंतःकरणी
उदात्त मंगल प्रीत!१५४
卐
कार्पण्यासी उरला नाही
अंतःकरणी थारा!
नुरे अहंपण, सरे खिन्नता
छिन्न भिन्न हो कारा!१५५
卐
असे वाटते मिरवावे शिरि-
तुझ्या कृपेचे ओझे!
जन्मोजन्मी ऋणी असावे
तुझाच डिंडिम वाजे!१५६
卐
कृतार्थ झाली कविता शक्ती
कृतार्थ झाले गान!
कृतार्थ झाली असे लेखणी
कृतार्थ झाले कान!१५७
卐
'तू जे गाशी मला पोचते'
कोणी कानी बोले!
सुचेल तैसे लेखन झाले
पारायणही घडले!१५८
卐
अभ्यासाविण यश ना मिळते
श्रद्धेवाचुनि दृष्टी!
गुरुकृपादृष्टीने तत्क्षणि
झाली हिरवी सृष्टी!१५९
卐
विवेक भास्कर उगवो म्हणुनी
स्वरूप-गीता स्फुरली!
विनम्रतेने आनंदाने
तये लेखणी धरली!१६०
卐
"स्वरूप-गीता" तुला अर्पिली
हे स्वरूप-आनंदा!
सोऽहं महिमा तुवा लिहविला
धरुनी माझ्या हाता!१६१
卐
स्थिरावले मन तुझ्या कृपेने
लेखन येथे सरले!
अधिक काहि बोलवे न म्हणुनी
मौन मनाने वरिले!१६२
ॐ
तत् सत्
No comments:
Post a Comment