Tuesday, November 12, 2024

संत नामदेव महाराज यांच्या चरित्रावर आधारित काव्य

पुंडलिकासाठी थांबला देव वाळवंटी! ध्रु.
 
देव आईबाप
सेविता सरे पापताप
भक्‍तीला भुलला भाबडा देव वाळवंटी! १
 
गावच ही काशी
श्रेय त्‍या एका भक्‍तासी
प्राणमोल दिधले खिळवला जागी जगजेठी ! २
 
परब्रह्म शिणले
विटेवर युगे युगे हसले
सानथोर सगळे मनोमनि हेच हेच वदती !  ३
 
१५-७-१९७७
 

दामाशेटाचं गोणाईशी लग्‍न झालं दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला. 
दामाशेटींना हरिभजनाचं वळण वाडवडिलांपासून मिळालेलं. पंढरपूर यात्रेचं गाव.  बाहेरगावी हिंडायला लागायचं नाही.  निष्‍ठेनं आपला उद्योग करावा आणि मुखी असावं देवाचं नाव. सकाळ संध्‍याकाळ रावळात दर्शनाला जावं पांडुरंगाचं श्रीमुख डोळेभरी पाहावं
 
पंढरीचा विठूत्‍याला भावभरे भेटू ! ध्रु.
 
विटेवरी उभा
कैसा चैतन्‍याचा गाभा
दर्शनाचे सुख जन पोटभर लुटू !१ 
 
सावळा सावळा
मनी भरुनि राहिला
बंधन हे गोड वाटे कधी न ये तुटू !२ 
 
दर्शन भोजन
तेच चित्‍तालागी स्‍नान
सुखाचे निधानत्‍याला पुन्‍हा पुन्‍हा भेटू !३ 



असा काळ चालला होता एकच सल होता. गोणाईची कूस उजवली नव्‍हती पोटी संतान नव्‍हतं. गोणाईने विचार केला की दीनांचा कैवारी केशीराज! जे मागायचं ते त्‍याला मागावं म्‍हणून ती रावळात गेली. देवाच्‍या पाया पडली आणि अगदी मनापासून त्‍याला म्‍हणाली
 
वेलीवर जसं फूल तसं मुल दे ! ध्रु.
 
तूच एक त्राता माझा
ऐक ऐक केशीराजा
द्यायचेच तर दान हेच हेच दे ! १
 
त्‍याच्‍या मनी भाव हवा
नामाचाच छंद हवा
दामवेद माझा बाळ नित्‍य घोकु दे ! २
 
हात जोडते जोडते
भीक मागते मागते
नवसाचे फळ मज आता लाभु दे ! ३
 
 卐
 
आई नाही बाबा नाही
देवाविण कोणी नाही ! ध्रु
 
बरी बसाया पायरी
तीच सोयरी धायरी
जनी तिथे ठेवी डोई ! १
 
नाव गाव सांगू काय
धरू विठ्ठलाचे पाय
तोच बाबा आणि आई ! २
 
दासी होईन होईन
सेवा करीन करीन
देवा ऐशी ऊब देई ! ३ 
 
 卐
 
म्‍हणे छोटा वीणेकरी
जय जय पांदुलंग हाली ! ध्रु
 
टाळ्या पिटत पिटत
वीणा छेडत छेडत
गर्जे पांदुलंग हाली ! १
 
लाल चुटुक पगडी
मूर्ति लोभस बोबडी
गाई पांदुलंग हाली ! २
 
हिररंगणी नाचता
रम्‍य शैशव हासता
विठू हासतसे गाली
नामा हासतसे गाली ! ३
 
 卐
 
देव जेवला हो
देव जेवला ! ध्रु
 
जेव ना रे देवा
ऐक ना रे देवा
बालहट्ट जगावेगळा ! १
 
अशी नाम्‍याची मात
खाली आला हात
हासला कसा सावळा 
 
हालला विठ्ठल
बोलला विठ्ठल
देव खरोखरी जेवला ! ३
 
 卐

नामयाचं लगीन
नामयाचं लगीन ! ध्रु
 
विठ्ठलाचा छंद
मुखे नाम ये गोविंद
हेच का लगीन १
 
देवासंगे बोले
नामा आनंदात डोले
पदी होत लीन ! २
 
विठू हाच पती
ऐसी नामा करी प्रीती
सदा भावलीन ! ३
 

नामा झाला वेडा
विठ्ठलाचा वेडा ! ध्रु
 
पाहावा विठ्ठल
स्‍मरावा विठ्ठल
कशाला ओढावा प्रपंचाचा गाडा ! १
 
नामा विठ्ठलाचा
विठ्ठल नाम्‍याचा
वाटते टाळावा विषयांचा राडा ! २
 
सुंदर ते ध्‍यान
हारपवी भान
नाम हे भोजन जेवतसे वेडा ! ३
 
 卐

प्रपंचाच्‍या संगे कोणा सुख झाले ?
मन नामयाचे विठ्ठलात रमले ! ध्रु
 
नामा हा उद्धव
ध्‍याई रमाधव
गोविंदाचे गुणीं मन हे वेधले !१
 
विटेवरी उभा
लावण्‍याचा गाभा
ध्‍यास सावळ्याचा मन ही सावळे !२
 
नाम विठ्ठलाचे
गान विठ्ठलाचे
सह‍जचि सुटले देहाचे ओवळे !३
 

नकोस पाहू माझी वाट
मी देवाचा झालो ! ध्रु
 
मनिं भरलासे विठू सावळा
व्‍यर्थ बोल तू तया लावला
घरास पुरता विटलो ! १
 
या ठायी तू मज सोडुन दे
विठाईकडे सोपवून दे
भेटीला तळमळलो ! २
 
हत्‍याराविणा जिवे मारले
मना माझिया नाहि जाणले
जलावीण तळमळलो ! ३  
 
 卐

मुखी नाम हाती वीणा
ऐसा करती संसार ! ध्रु
 
कोण आला कोण गेला
भान कोठले जीवाला?
सर्व विठूवरी भार ! १
 
नाही प्रपंचाची आस्‍था
धुंद होतात नाचता
घेती काळ्याचा कैवार ! २  
 
चाले विठ्ठलाचे गान
नाही लौकिकाचे भान
कोण पाळे शिष्‍टाचार ! ३
 
 卐

लोटक्‍यात घालून देव,  नामा सांभाळी विठ्ठला ! ध्रु
 
देव व्‍यापक व्‍यापक
परि मूर्तीचं कौतुक
देव रुपागुणांवेगळा हा प्रकार ध्‍यानि न्‍हाई आला ! १
 
नामा चालविता हट्ट
हृदिं धरी मूर्ति घट्ट
दिन रात कोठले भाननामा रावळी पडलेला ! २
 
वय वाढलं वाढलं
ज्ञान खुंटलं खुंटलं
जसा घाण्‍याचा बैल हो .. नामा सोडी न खुंटाला ! ३  
 
 卐

नामाचे मडके कच्‍चे  ! ध्रु
 
या या संतांच्‍या मेळी
कैसी असे खेळीमेळी
जाहले निदान रोगाचे ! १
 
थापटण्‍याचा आघात
देहभाव उसळुनि येत
लोटले प्रवाह अश्रुंचे ! २
 
भक्‍तीचा हा अवघड घाट
कोण गुरुविना दाविल वाट
गिरवणे पाठ नम्रतेचे ! ३
 
 卐
 
देव कुठे नाही ?
तो सकलां ठायी ! ध्रु
 
गुरु भेटला
देवच दिसला
देवच गुरु होई ! १
 
चरण धरले
पूजन घडले
नुरे अहं काही ! २
 
नयनी अंजन
भवभयभंजन
शुद्ध बुद्ध होई ! ३
 
 卐

आता उजाडले मज,
इथे हरी! तिथे हरी ! ध्रु
 
जग त्‍याने कोंदले
मनिं पुरते बिंबले
गुरुकृपा मजवरी ! १
 
देव खरा कळला
करुणाघन वळला
निजदेही पंढरी ! २
 
विठू न केवळ मंदिरी
चराचरी भरतसे हरी
सर्वव्‍यापी श्रीहरी !  ३
 
 卐
 
नामदेव कीर्तन करी –
पुढे नाचतसे श्रीहरी!ध्रु
 
वाजत पखवाज
नाद करित झांज
रमती वारकरी ! १  
 
राहवे न पोटी
धावला विठू वाळवंटी
भक्‍ती रिंगण धरी ! २  
 
जनी हि गलबलली
आपुली काया लोटियली
तना कोण सावरी ! ३
 
 卐

तुझं येडंबागडं लेकरू
हट्ट मी कोणापाशी धरु ध्रु
 
उन्‍ह तापले तहान लागे
दे जल मजला इतुके मागे
बघतो धरणे धरू ! १
 
प्राण जणू कंठांशी आले
निर्वाणीचे ठाण मांडले
म्‍हणतो भजना करू ! २  
 
घे जलरूपा तहान भागव
संगे ज्ञाना धर रे आठव
मिनत्‍या किति रे करू  ३
 
 卐
 
कीर्तन ऐसे रंगलं
देवानं देउळ फिरवलं ! ध्रु
 
नामा जरी पाठमोरा
देव ये सामोरा
अघटित अद्भुत घडलं ! १
 
अभिषेक गाभा-यात
महादेव भजनात
शिवरात्री शिव घडलं ! २
 
ज्ञान भक्‍तीचा संगम
गंगायमुना संगम
नागनाथास कीर्तन भावलं ! ३
 
 卐

वाटते उदास ज्ञानदेव जातो
ज्ञानदेव जातो – प्राणसखा जातो ! ध्रु
 
व्‍याकुळती प्राण
विठो तुझी आण
माध्‍यान्‍हीच सूर्य अस्‍ता कैसा जातो
 
खंत हीच वाटे
प्रेम कैसे आटे?
माऊलीच्‍या साठीं जीव पाखडतो ! २
 
मनी वेगळे हे
जगावेगळे हे
जिवाचा विसावा अज्ञातात जातो ! ३
 
 卐
 
ही भाग्‍याची वेळ नामया  -
ऊठ ऊठ झडकरी ! ध्रु
 
कुणी न येते
कुणी न जाते
नितनूतन अन् पूर्ण सनातन
आत्‍मतत्‍त्‍व धर उरीं ! १
 
नको खेद रे
खंत नको रे
निवृत्‍तीही ढळला जर का
स्थैर्य कवण पत्‍करी 
 
कर घे हाती
चाल संगती
ज्ञानीही जर करती खंती
जगबुड झाली खरी ! ३
 
 卐
 
गेल्‍या ईश्‍वरी विभूती
राहिल्‍या त्‍या कीर्ती ! ध्रु
 
पाहुणेच ते या जगती
अलिप्‍तता ऐसी चित्‍ती
जगत् परि करते खंती ! १
 
सांगतील ज्ञान ऐसे
कोण ज्ञानदेवा ऐसे
विवेकाच्‍या ज्‍योती ! २
 
मुक्‍ताईची गाता गाथा
वाणी वरते मूकता
नामा राहिला शेवटी ! ३
 
 卐

अभंग नामदेवाचा
गाता धन्‍य धन्‍य वाचा ! ध्रु
 
देवाशी खेळावे
देवाशी भांडावे
लागे लळा खेळियाचा ! १
 
भजनीं रंगावे
कीर्तनि नाचावे
छंद लावी नामाचा ! २
 
विठ्ठल ये कानीं
विठ्ठल ये नयनी
हा चमत्‍कार संतांचा ! ३
 
 卐
 
पांडुरंग भेटीसाठी पंचप्राण कंठी येती –
बळ सारे हारपले देह लोटोनियां देती!ध्रु.
 
भाववेडा नामदेव
स्‍मरू लागे ज्ञानदेव
अदृश्‍याची ओढ जीवाआतां पाहिजे विश्रांती ! १  
 
आता पावलो पंढरी
दिसे सावळा श्रीहरी
वृत्‍ती झाल्‍या अंतर्मुख नाही उरली आसक्‍ती ! २
 
आषाढाचा धुंद मास
लावी वेधु मानसास
मूळ आले माहेराचे बाहे चैतन्‍याची मूर्ती ! ३
 
चिरा पायरीचा व्‍हावे
संतें वरी पाय द्यावे
काय पाहिजे आणीकनको स्‍वर्ग नको मुक्‍ती ! ४
 
धाव पाव गे विठ्ठले
प्राण माझे व्‍याकुळले
आधारास दे गे हात हाका तरी मारू किती ! ५   
 
 卐
 
अरे पायरीच्‍या चिऱ्या 
तुला कोटिदां प्रणाम ! ध्रु
 
कथा अवघ्‍या अंगी गोड
केलिस विठ्ठलाची जोड
पायी बांधुनी घुंगरु
गासी देवाजीचे नाम ! १
 
वीणा तारा झांकारती
चिपळ्या साथ सुंदर देती
गासी नामाचा त्‍वां देव
भक्‍त कुळा तू ललाम ! २
 
नाचू कीर्तनाचे रंगी
ज्ञानदीप लावू जगी
अरे ज्ञानियाच्‍या सख्‍या
मोले घेतलास श्‍याम ! ३
 
 卐

विठ्ठल विठ्ठल नाम घेता नामदेव जागे
मन्‍मनी नामदेव जागे
असे जाणवे एका वेळी विठ्ठल पुढती मागे ! ध्रु
 
नामासाठी जो अवतरला
नामी रमला नामे तरला
भक्ति वेढिते देवाभवती चिवट रेशमी धागे ! १
 
भाव ओतला मूर्ति हालली
नाम्‍यासाठी दूधही प्‍याली
अगाध लीला देवाजीची पिढी पिढीला सांगे ! २
 
मनास नामे उलटे केले
आत वळविले आत रमवले
सोहं अनुभव येत भाविका सहज समाधी लागे 
 
 卐

नामया देशिल का सहवास ध्रु
 
संगे बोलू
संगे चालू
तीर्थे बघणे हीच मनीची
पुरवशील ना आस ?
 
नाना तीर्थे
विविध दैवते
श्रीहरि नटला परोपरींनी
त्‍या बघण्‍याचा ध्‍यास !२  
 
देह झिजू दे
देव दिसू दे
आलस्‍याचे सुख ते कसले
आयुष्‍याचा ऱ्हास!

 

No comments:

Post a Comment