गीता तू वाचत जा, गीता तू ऐकत जा
कृष्ण कृष्ण म्हणत म्हणत अर्जुन तू होउन जा! ध्रु.
कृष्ण कृष्ण म्हणत म्हणत अर्जुन तू होउन जा! ध्रु.
मन प्रसन्न जग प्रसन्न जगण्याची शीक कला
विघ्न तुच्छ करिल काय वाढव रे आत्मबला
शर्थीने झुंज देत हरिभजनी रंगुन जा!१
ओघे जे येत काम संधि समज सेवेची
आनंदे साध स्वये उन्नति तू आत्म्याची
यश येवो वा अपयश द्वंद्वांना लघुनि जा!२
आचरण्या तत्त्व असे चिंतुनि जे सापडले
सापडले चर्चेतुन पटले ते मनि रुजले
भिन्न मते दिसत जरी मेळ घालण्यात मजा!३
देह येत जात तसा त्याचा तुज मोह नको
मरणे हे स्वाभाविक त्याचा तुज शोक नको
आत्म्याचा कर विचार 'तो तर मी' घोकत जा!४
श्रीगीता हरिमुरली सूर तुझ्या भवताली
सोऽहं तर चालतसे केवळ तू मन घाली
तेहि वळे आत कसे हरिकिमया जाणत जा!५
मी माझे विसरून जा विश्वात्मक तू व्हावे
सर्वात्मक मीच स्वतः घोकावे उमजावे
श्लोक श्लोक गीतेचा आनंदे विवरत जा!६
भारून जा उत्साहे, चपळ तुझे चरण करी
मुक्तपणे गुणगुण तू संजीवक स्वरलहरी
हाच पुनर्जन्म तुझा श्रीरामा जाणत जा!७
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२५/०९/१९९८
No comments:
Post a Comment