पराक्रमी अर्जुनाने आपल्या अनपेक्षित वागण्याने भगवान श्रीकृष्णांना विस्मयाचा धक्काच दिला.
अर्जुनाचे ते भाषण, त्याचा आविर्भाव यातून त्यांना हेच जाणवले- अर्जुनाचा हा केवळ शस्त्रत्यागच नाही तर तो स्वधर्मत्याग आहे.
भगवंताच्या दृष्टीने अर्जुनाचे ते वागणे केवळ अप्रयोजकपणाचे होते.
सोड हा मूर्खपणा! हातात धनुष्य बाण घे! आणि रणांगणात युद्धाला उभा राहा..
हे बजावताना भगवान श्रीकृष्णांच्या वाणीला खड्गाची धारच आली होती. अत्यंत निर्भीडपणाने आणि निःसंदिग्ध शब्दांत त्यांनी आपला संताप आणि अर्जुनाच्या शस्त्रत्त्यागाबद्दलची नापसंती
व्यक्त केली.
क्लैब्व्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप ॥३॥
卐
भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत -
सुचे कसा तुज षंढपणा
चल ऊठ ऊठ पार्था
तू पुरुषोत्तम तुलाच रचणे नवविक्रमगाथा
चल ऊठ ऊठ पार्था! धृ
तू शत्रुंजय, वीर धनंजय
मोहपंकि रुतलासी जणु हय
झटकून टाकी हे दुबळेपण
कर उन्नत माथा!१
शस्त्रत्यागे तुवा दिपविले
रणभूमीवर प्रवचन केले
शांतीपाठा तुझ्या ऐकता
संतोषेल पृथा!२
अकीर्तिकर मोहास सारुनी
कारुण्याचा मेघ वारुनी
भास्करसम तू तळप प्रतापे
सनाथ कर वसुधा!३
नाव ऐकता पळते अपयश
सकलसिध्दिही तुजलागी वश
जाणुनि हे ही हर्ष होत तुज
बृहन्नडा होता?४
युद्ध नव्हे हे राज्यासाठी
यज्ञ असे हा न्यायासाठी
क्षत्रिय असूनी रणा न उत्सुक
वरसि अधःपाता!५
स्वकीयकृत अन्याय रुचे जर
द्रोणांसम हो कौरव अनुचर
जन्मभरी तैनातच करता
नुरेल रणचिंता!६
उचल धनू ते टणत्कार कर
वीरवृत्ती वरेल सत्वर
पहिली वहिली नसे लढाई
सिद्ध होइ युद्धा!७
कौरव पक्षिय आप्त जाहले
पांडव सगळे परके ठरले ?
धन्य अर्जुना पारख तुझिही
सांभाळी या रथा!८
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment