ॐ राम कृष्ण हरि गात राहु दे वाचा
मनुजा तू घेई घुटका बोधसुधेचा!ध्रु.
मनुजा तू घेई घुटका बोधसुधेचा!ध्रु.
महाराजा रुचला दासबोध हा ग्रंथ
ते नित्य सांगती समजावून मग अर्थ
ते स्फुरण जसे की प्रवाह त्या गंगेचा!१
नरदेह असे तो सार्थक करुनी घ्यावे
नामा न सोडता रामा जोडुन घ्यावे
कर विचार काही शांतपणे आत्म्याचा!२
सांभाळ आचरण सुखदुःखा कारण ते
तू जसे वागशी तसे होत असते ते
जर शुद्ध आचरण संभव ना रोगाचा!३
जे आपण देतो तेच मिळे आपणाला
द्वेषास द्वेष फळ, प्रेम मिळे प्रेमाला
घे धांडोळा तू प्रतिपळ आचरणाचा!४
जे देवे दिधले त्यात मान संतोष
नित शुभच चिंतुनी कर सद्गुणपरिपोष
तू कृतज्ञ राही नेहमीच रामाचा ! ५
परमार्थ साधणे हाच आपला धर्म
अनुकूल त्यास जे तेवढेच कर कर्म
काळजी सोड आवडता हो रामाचा!६
करितसे वृत्तिला संथ तोच रे संत
जो सहन करी तो भगवंतास पसंत
हो विशाल सागर मनुजा तू शांतीचा!७
तू हाव मनाची मोडुन टाकी आधी
मग क्रोध न येई, लागे सहजसमाधी
साधना करुन हो मालक निजदेहाचा!८
करणीने अंत:करण जिंकता येते
वडिलांची सेवा श्रीहरिला आवडते
पुंडलीकवरदा प्रसन्न हो नित्याचा!९
गुर्वाज्ञा म्हणुनी लावत जा रे ध्यान
चित्प्रकाश बघ तू, दृष्टी होत समान
संसार न आपला समज तोच रामाचा!१०
जो स्वरूपात स्थिर स्वस्थ त्यास म्हणतात
आनंद त्यास दे जन्मभराची साथ
पावसी गुरुपदा भरवसाच रामाचा!११
श्वासात ओवणे नाम हाच सत्संग
सद्वस्तुस्मरणे आपलासा श्रीरंग
प्रभु करी त्यात कल्याण बोध संताचा!१२
अनुभव घे वाढव वाढव रे परमार्थ
परमात्मा स्वामी सेवक तू निभ्रांत
जगि धन्य खरा जो चाकर रघुनाथाचा!१३
हो मरणाआधी मननाने तू मुक्त
जो विभक्त नाही देवापासून, भक्त
साधक हो अंती अधिकारी मोक्षाचा!१४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
९/९ आणि १०/९/१९९८
No comments:
Post a Comment