कृष्ण कृष्ण म्हण! कृष्ण कृष्ण म्हण! ध्रु.
कारागारी जरी जन्मला
बंधामध्ये नसे गुंतला
अलिप्तता ती शिकणे आपण ! १
कर्तव्याला पुढे सरावे
फलाशेत ना कधि गुंतावे
अवघ्या आशा श्रीकृष्णार्पण ! २
कैसा जगला सांगे गीता
श्रीकृष्णाचे जीवन गीता
प्रेमाने कर गीतागायन ! ३
आत्मरूप ते ध्यानी धरता
जन्ममृत्युची कुठली चिंता
असशि वेगळा देहापासुन ! ४
असुनि नसावे नसुनि असावे
कृष्णापासुन समजुन घ्यावे
क्षणात एका मोहा झटकुन ! ५
मातांची जी माता गीता
घरोघरी तू पोचव आता
रहस्य सगळे पुरते जाणुन ! ६
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
११ जुलै १९९५
No comments:
Post a Comment