।। श्रीगुरुदेवदत्त ॥
नसे असूया ती अनसूया
गुणा लंघिले ते मुनि अत्रि
दांपत्याने समाजपुरुषा सुपुत्र आपण दिधला हो
दत्तनाम हे तेव्हापासुन ज्याच्या त्याच्या ओठी हो
卐
श्रीगुरुदेवदत्त म्हणा हो ! श्रीगुरुदेवदत्त म्हणा!ध्रु.
तीन मुखे त्या त्रिविधा शक्ती
एके ठायी वसल्या असती
सहा करांनी सत्कृतिपूजन दत्तराज उजळवी मना!१
औदुंबर तरुतळी विराजे
वेष यतीचा त्यांना साजे
मस्तकातुनी विचारगंगा उसळुन पावन करी जनां!२
धेनु होउनी धरती आली
चार वेद ती श्वाने झाली
निःस्पृहता निरलसता यांच्या वर्तनात उमटती खुणा!३
कर्तृत्वाने प्रेमे ज्ञाने
समाज उठतो हात दिल्याने
वन्ही चेतवा राख फुंकुनी जनी जनार्दन दत्त म्हणा!४
नाते जोडू चराचराशी
आत्मतत्त्व जाणू अविनाशी
चंदनसम मज झिजावयाचे असे वाटु दे तना मना!५
श्रीगुरु करती जागृत शक्ती
आत्मश्रद्धा म्हणुन बलवती
खेडोपाडी घराघरातुन रंग चढतसे गुरुभजना!६
निमित्त केवळ मला व्हायचे
कर्म नि फल श्रीगुरुदत्ताचे
विरक्तीत ऐश्वर्य विराजे गुरुचरिती पटतील खुणा!७
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
६/११/१९९७ गुरुवार
No comments:
Post a Comment